Urad Rate: उडीद पिकाच्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत

Team Agrowon

जळगाव जिल्ह्यात उडीद पिकाला (Urad Crop Damage) शेंगा न लागणे, दाणे बारीक असणे, अनावश्यक वाढ आदी कारणांमुळे सुमारे २० ते २५ टक्के पीक (Crop Damage) हातचे गेले आहे.

पिकावर शेतकऱ्यांनी मागील पंधरवड्यात रोटाव्हेटर फिरविला. परंतु या समस्येबाबत कृषी विभागाने (Agriculture Department) गांभीर्याने दखल घेतलेली नसल्याची माहिती आहे.

जिल्ह्यात तापी, गिरणा, अनेर नदीकाठी उडीद पीक असते. अनेक शेतकरी कांदेबाग केळी लागवडीपूर्वी बेवडसाठी उडीद पीक घेतात. यामुळे लागवड जिल्ह्यात बऱ्यापैकी असते.

यंदा पिकाची उगवण व वेळेत पाऊस आल्याने वाढही चांगली झाली. परंतु त्याला शेंगा न लागणे, दाणे बारीक राहणे किंवा शेंगा अत्यल्प असणे अशी समस्या तयार झाली.

सर्वच भागांत ही समस्या आहे. काही शेतकऱ्यांना पर्यायच नसल्याने त्यांनी पीक तसेच राहू दिले. तर काहींनी पिकावर रोटाव्हेटर फिरवून पुढे आगाप केळी, हरभरा, मका लागवडीचे नियोजन केले.

उडीद पिकातील या समस्येबाबत कृषी विभागाने पंचनामे करून पुढील कार्यवाहीसंबंधी नकार दिला आहे. फक्त पाहणी, पर्यटन कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केल्याचे समोर आले आहे.

याबाबत भरपाई मिळेल, की नाही हा संभ्रम आहे. कारण शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी पाहणी करताना या समस्येला बियाणे पुरवठादार दोषी आहेत, त्यांना बोलवा, असे सांगून हात झटकले आहेत.

काही भागात कृषी सहायक, पर्यवेक्षक पोचलेच नाहीत. मुजोरीदेखील झाल्याची माहिती आहे. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे.

बियाणे पुरवठा, उपलब्धता, त्याची गुणवत्ता, त्यामुळे होणारे नुकसान, चांगले परिणाम यासाठी कृषी विभागाची देखील जबाबदारी आहे. पण ही बाब न लक्षात घेता कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांनी याबाबत नामानिराळे होण्याचा प्रयत्न केला आहे.