
Market Bulletin :
हरभरा दर टिकून
हरभरा लागवडीच्या काळात असलेली भावातील तेजी आता कमी झाली. हरभरा बाजारात हमीभावाच्या आसपास विकला जात आहे. सरकारने यंदा हरभऱ्यासाठी ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. तर बाजारात सध्या ५ हजार ३०० ते ५ हजार ८०० रुपयांच्या दरम्यान भाव मिळत आहे.
देशातील काही बाजारात नव्या हरभऱ्याची एन्ट्री झाली. आणखी दोन आठवड्यानंतर बाजारात मालाची आवक वाढायला सुरुवात होईल. त्यानंतर १५ दिवसांमध्ये आवकेचा दबाव वाढेल. त्यावेळी हरभरा भाव हमीभावाच्या खाली जाऊ शकतात. पण सरकारही यंदा खरेदीत उतरणार आहे. त्यामुळे हरभरा बाजारालाही आधार असेल, असे अभ्यासकांनी सांगितले.
पपईच्या दरात सुधारणा
पपईची मागणी मागील काही आठवड्यांपासून कायम आहे. देशभरातून राज्यातील पपईला उठाव मिळत आहे. तसेच यंदा पपईचे पीकही चांगले असल्याचे शेतकरी सांगत आहेत. सध्या पंजाब, हरियाना, काश्मीर, उत्तर प्रदेश, राजस्थान आदी भागातील खरेदीदार राज्यात पपईची खरेदी करत आहेत.
यामुळे पपईच्या भावात वाढ दिसून आली. पपई भाव मागील काही आठवड्यांमध्येच क्विंटलमागे ५०० रुपयांनी वाढलेले दिसत आहेत. सध्या पपईला सरासरी १७०० ते १८०० रुपयांचा भाव मिळत आहे. यंदा पपई पिकाचे नुकसान झाल्याने पपईची आवक आणखी काही आठवडे कायम राहू शकते, असा अंदाज पपई बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
लसणाचे भाव नरमले
देशातील काही बाजारात लसणाची आवक सुरु झाली. नव्या मालाची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. लसणाला उठावही चांगला आहे. मात्र वाढत्या आवकेबरोबर भावातही चढ उतार दिसून येत आहेत.
लसणाचे भाव मागील काही दिवसांमध्ये क्विंटलमागे २ ते ३ हजाराने कमी झाले आहेत. सध्या लसणाला प्रतिक्विंटल सरासरी १३ हजार ते १६ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. पुढील काळात लसणाची आवक आणखी वाढण्याचा अंदाज आहे. त्याचा परिणाम दरावर दिसून येईल, असा अंदाज व्यापारी व्यक्त करत आहेत.
सोयाबीनमध्ये चढ उतार
आंतरराष्ट्रीय बाजारात सोयाबीन आणि सोयापेंडच्या भावात आज सुधारणा पाहायला मिळाली. आज दुपारपर्यंत सोयाबीनचे वायदे १०.५२ डाॅलर प्रतिबुशेल्सपर्यंत पोचले होते. तर सोयापेंडचे वायदे ३०४ डाॅलर प्रतिटनांपर्यंत वाढले होते. देशात सोयाबीनमधील मंदी कायम आहे. सोयाबीनचा भाव एकाच पातळीदरम्यान दिसत आहे.
बाजारातील आवक काहीशी कमी दिसत असली तरी दरावर त्याचा परिणाम दिसत नाही. देशातील सोयाबीनची भावपातळी आजही ३ हजार ९०० ते ४ हजार १०० रुपयांच्या दरम्यान होती. तर प्रक्रिया प्लांट्सचे भाव ४ हजार ३५० ते ४ हजार ४५० रुपयांच्या दरम्यान होते. देशातील बाजारात सोयाबीन भाव आणखी काही आठवडे दबावातच राहू शकतो, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला.
कापूस स्थिरावला
कापसाच्या भावावरील दबाव कायम आहे. त्यामुळे कापसाचे बाजारभावही स्थिर दिसत आहे. कापसाची बाजारातील आवक रोज दीड लाख गाठींच्या दरम्यान आहे. तर उद्योगांची खरेदी गरजेपुरती सुरु आहे. सीसीआयला सध्याही चांगला कापूस मिळत आहे. सध्याही कापूस दर हमीभावाच्या खालीच आहेत.
कापसाला आजही सरासरी ७ हजार ते ७ हजार ३०० रुपयांचा भाव मिळाला. कापसाची बाजारातील आवक आणखी काही आठवडे कायम राहण्याचा अंदाज आहे. तर मार्चपासून बाजारातील आवक कमी होऊन कापूस दरात काहीशी सधारणाही होऊ शकते, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.