
डाळिंबाचं उत्पादन घटणार
1. देशात दरवर्षी सुमारे ८० ते ९० हजार हेक्टरवर डाळिंबाचा मृग बहार धरला जातो. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून पाऊस, अतिवृष्टी आणि कीड-रोगांचा डाळिंबाला फटका बसतोय. त्यामुळे यंदाच्या हंगामात डाळिंबाचा मृग बहार धरण्याचं प्रमाण ५० टक्क्यांनी घटलंय. सध्या डाळिंबावर काही प्रमाणात तेलकट डाग रोगाचा प्रादुर्भाव दिसून येतोय. तसंच पाऊसही सुरुये. त्यामुळं यंदा डाळिंब उत्पादन २० टक्क्यांपर्यंत कमी होऊ शकतं. तसेच डाळिंब उशिरा बाजारात येण्याची शक्यता आहे. सध्या डाळिंबाला ६ हजार ते ८ हजार रुपये क्विंटल दर मिळतोय. हा दर पुढील काही दिवस टिकून राहील, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केलाय.
केळीचे दर अद्यापही दबावातच
2. राज्यात केळीचे दर आजही निचांकी पातळीवर आहेत. व्यापाऱ्यांनी संगनमत करून दर पाडल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. व्यापारी केळीला फलकावरील जाहीर झालेले भाव देत नाहीत. शेतकऱ्यांची कोंडी करून दर्जेदार केळीलाही कमी भाव देत असल्याचा आरोप होत आहे. सध्या केळीला फलकावर प्रति क्विंटल १९५० ते २००० रुपये भाव जाहीर झाला. मात्र स्थानिक व्यापारी १००० ते ११०० रुपये दराने शेतकऱ्यांकडून केळी खरेदी करत आहेत. प्रशासनाने यात लक्ष घातल्यास शेतकऱ्यांना दोन हजार रुपये दर मिळू शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
मक्याचे दर तेजीत राहण्याचे संकेत
3. देशात तसेच आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या मक्याचे दर तेजीत आहेत. मक्याला सध्या अनेक वर्षांतील विक्रमी दर मिळतोय. त्यामुळे चालू खरिपात मका लागवड वाढण्याचा अंदाज होता. मात्र तसं होताना दिसत नाही. १२ ऑगस्टपर्यंत देशात मका लागवड केवळ अर्धा टक्क्याने अधिक होती. तर युरोप आणि अमेरिकेतही मका पिकाला दुष्काळाचा फटका बसतोय. भारतात अतिपावसानं कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढतोय. त्यामुळे मका उत्पादन कमी राहण्याचा अंदाज व्यक्त होतोय. देशातील बाजारांमध्ये मक्याला सध्या २४०० ते २७०० रुपये क्विंटल दर मिळतोय. मक्याचा दर पुढील दोन महिनाभरात आणखी सुधारु शकतो, असं जाणकारांनी सांगितलं.
उडदाचे दर काहीसे नरमले
4. मागील काही महिन्यांपासून बाजारात उडदाची आवक कमी होत होती. त्यामुळं उडदाचा भाव मजबुत स्थितीत होता. मात्र आता देशांतर्गत बाजारात उडदाची आवक वाढण्याचे संकेत आहेत. तसचं बर्माचा नवीन उडीद सप्टेंबर महिन्यात बाजारात दाखल होईल. तसंच देशातही काही बाजारांमध्ये उडदाची आवक सुरु झालीय. आवक वाढण्याची चाहूल लागताच उडदाच्या दरावर दबाव आलाय. बाजारात सध्या उडदाला ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये क्विंटल दर मिळतोय. बाजारातील आवक वाढल्यास दर काहीसे कमी होऊ शकतात. मात्र यंदा उडदाला खुल्या बाजारात हमीभावापेक्षा अधिक दर मिळेल, अशी शक्यता जाणकारांनी व्यक्त केलीय.
तुरीचे दर कितीने नरमले ?
5. देशातील बाजारांमध्ये मंगळवारी तुरीचे दर (Tur Rate) ३०० रुपयांपर्यंत नरमले होते. सरकारनं स्टाॅकिस्ट आणि व्यापारी यांच्याकडील साठ्याची (Tur Stock) माहिती देण्याची सूचना राज्यांना केली. त्याचा परिणाम तुरीच्या बाजारावर (Tur Market) जाणवत असल्याची माहिती जाणकारांनी दिली. देशात उत्पादन (Tur Production) घटल्यानं यंदा पुरवठा कमी आहे. त्यातच सणांमुळं तुरीला मागणी वाढली. त्यामुळं बाजार समित्यांमध्ये तुरीच्या दरात तेजी आली. तसचं चालू खरिपात तुरीची लागवड १२ टक्क्यांनी कमी झाली. सततच्या पावसाचाही तूर पिकाला फटका बसतोय. त्यामुळे यंदाही तूर उत्पादन कमी राहण्याची शक्यता व्यक्त होतेय. त्याचा परिणाम म्हणून तूर दराला आणखीच मजबुती मिळाली.
सणासुदीच्या काळात तूर डाळ महागण्याची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली. मागील दीड महिन्यात देशात तूर डाळीचे दर १५ टक्क्यांनी वाढले. त्यामुळं सरकारनं दर नियंत्रणासाठी हालचाली सुरु केल्या. त्यामुळे तुरीचा दर सरासरी ८ हजार रुपयांवरून ७ हजार ७०० रुपये क्विंटलपर्यंत घसरला. बाजारातील जाणकारांच्या मते देशात तुरीचा साठाच कमी आहे. त्यामुळे दर कमी होणार नाहीत. मात्र दुसरीकडं तुरीचे दर कमी झाले नाही तर सरकार स्टाॅक लिमिटही लावू शकते. या स्टाॅक लिमिटमुळं बाजारात लगेच दर कमी होणार नाहीत. मात्र शेतकऱ्यांचा माल बाजारात आल्यानंतर भाव नरमतील, स्टॉक लिमिट त्यादृष्टीने शेतकऱ्यांसाठी नुकसानकारक आहे, असंही जाणकारांनी सांगितलं. याचा अर्थ नवीन माल येईपर्यंत तुरीचे दर तेजीत राहण्याचा अंदाज आहे. मात्र सरकारनं स्टाॅक लिमिट लावलं नाही तर ऐन हंगामातही तुरीला चांगला दर मिळेल, असं जाणकारांचं म्हणणं आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.