Banana : केळीचे दर पडले की पाडले?

राज्यात केळीला जुलै महिन्यात २४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र मागील १५ दिवसांपासून केळीचे दर निम्म्यावर आलेत.
Banana
BananaAgrowon
Published on
Updated on

पुणेः राज्यात केळीला (Banana) जुलै महिन्यात २४०० रुपयांपर्यंत दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र मागील १५ दिवसांपासून केळीचे दर (Banana Rate) निम्म्यावर आलेत. मागणी घटल्यानं दर कमी झाल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितलं. पण श्रावणात मागणी कशी काय कमी झाली? व्यापाऱ्यांनी ठरवून दर पाडले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Banana Production)

Banana
Banana : खानदेशात केळी दर व्यापाऱ्यांनी पाडले

केळी उत्पादनात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. राज्यात जळगाव जिल्ह्यात केळी लागवड अधिक आहे. त्यानंतर नांदेड आणि इतर जिल्ह्यांत पिकांचा विस्तार झालाय. यंदाचं वर्ष केळी पिकासाठी कसोटीचं ठरलं, असचं म्हणावं लागेल. कारण उन्हाळ्यात मार्च आणि एप्रिल महिन्यात अतिउष्णता होती. गेल्या १२२ वर्षातील सर्वाधिक उष्णता या काळात राहिली. त्यामुळे केळी पिकाला मोठा फटका बसला. राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या बागा या उन्हात वाळल्या. तर अनेक बागांना पाण्याचा ताण बसला. त्यामुळं फळधारणेला अडचणी निर्माण झाल्या.

Banana
Banana Rate : नांदेडमध्ये व्यापाऱ्यां‍नी पाडले केळीचे भाव

जून महिन्याच्या प्रारंभी दोन वादळं आली. या वादळांमुळं केळीची झाडं उन्मळून पडली. काही गावांतील संपूर्ण बागा आडव्या झाल्या. घडांचेही नुकसान झाले. तर जुलै महिन्यात सलग १० ते १२ दिवस पाऊस झाला. या सर्व संकटांमुळं यंदा उत्पादकता घटली. जळगावसह नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी यंदा केळी उत्पादनात २५ ते ३० टक्क्यांनी घट झाल्याचं सांगितलं.

केळी उत्पादनात घट झाल्यानं जुलै महिन्यात काढणी झालेल्या केळीला चांगला दर मिळाला. प्रतिक्विंटल २००० ते २४०० रुपये दर होते. उत्पादन घटल्याने दर चांगले होते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला. तसंच पुढं श्रावण महिना असल्यानं दरात आणखी वाढ होण्याची आशा होती. मात्र श्रावण महिना सुरु झाला, मागणीही वाढली पण दरात मोठी घट झाली. सध्या राज्यात केळीला १२०० ते १३०० रुपये प्रतिक्विटंलचा दर मिळतोय.

राज्याच्या केळीला देशभरातून मागणी असते. राज्यातून राजस्थान, दिल्ली, उत्तर प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आदी राज्यांत केळी पाठवली जाते. इतर राज्यांच्या तुलनेत जळगावच्या केळीला मागणी आणि दरही चांगला असतो. तसंच श्रावणात स्थानिक मागणीही असते. त्यामुळं या काळात दरवर्षी केळीला चांगला दर मिळतो. पण यंदा दरात अचानक मोठी घट झाली. मात्र किरकोळ बाजारात कमी उत्पादन आणि वाढलेल्या मागणीच्या नावाखाली ६० ते ७० रुपये प्रतिडझन असा दर मिळतोय. पण इकडं मागणी नाही म्हणून शेतकऱ्यांना लुटलं जातंय, असा आरोपही शेतकऱ्यांनी केलाय.

आधीच नैसर्गिक संकटामुळं केळीच्या उत्पादनात मोठी घट झाली. त्यातच आता केळीचे दर पडल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. शेजारच्या मध्य प्रदेशात केळीला चांगला दर मिळत असताना राज्यातील शेतकऱ्यांना मात्र ठरवून कमी दर दिला जातोय, असा शेतकऱ्यांचा आरोप आहे. स्थानिक प्रशासनानं या प्रश्नात लक्ष घालावं, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली.

मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथील बाजारापेक्षा राज्यात केवळ १०० रुपयांपर्यंत दर कमी असतात. मात्र सध्या बोर्डावर २२०० रुपये दर असताना जळगावात केवळ १२०० ते १३०० रुपये दर मिळतोय. सध्या मागणी वाढली, पुरवठाही कमी आहे, मग दर का पडले? व्यापारी खोटी कारण सांगून लोकल कमिशन एजंट्सना हाताशी धरून दर पाडत आहेत.
पंकज पाटील, केळी उत्पादक, मचला, जि. जळगाव
हंगामाच्या सुरुवातीला केळीला २२०० रुपयांपर्यंत दर होता. मात्र आता गुजरातचीही केळी बाजारात येत आहे. गुजरातमध्ये केळीला १३०० रुपयांपर्यंत दर मिळत आहे. त्यातच केळीला उत्तरेतील राज्यांतून मागणीही घटली. त्यामुळं सध्या ९०० ते १३०० रुपयांपर्यंत केळीला दर मिळतो आहे.
शाकीर शेख, केळी व्यापारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com