Green Gram : देशात यंदा मुगाची लागवड का वाढली?

मूग हे खरिपातील महत्त्वाचं पीक आहे. भारत हा जगातील ७० टक्के मूग उत्पादन करतो. तसेच मुगाचा वापरही भारतातच अधिक होतो. त्यामुळे मुगाची आयातही केली जाते. भारतात मागील काही वर्षांपासून मुगाची लागवड स्थिर आहे. उत्पादनात काहीशी वाढ झाली. मात्र ही वाढ अपेक्षेपेक्षा कमी आहे. त्यामुळे देशात मूग बाजाराची काय स्थिती आहे? याचा हा घेतलेला आढावा...
Green Gram Cultivation
Green Gram CultivationAgrowon

मूग हे पीक मूळचे भारतीय मानले जाते. मूग हे कमी कालावधीचे पीक आहे. मुगाची लागवड (Green Gram Cultivation) मुख्यतः आशिया खंडात होत होती. मात्र नंतरच्या काळात आफ्रिका आणि अमेरिकेतही मुगाची लागवड वाढली. जगात साधारणपणे ४० ते ४३ लाख टन मूग उत्पादन (Green Gram Production) होते. जागतिक मूग उत्पादनात भारताचा वाटा (India's Share In Green Gram Production) जवळपास ७० टक्के आहे. यावरूनच मूग उत्पादनात भारताचं महत्त्व लक्षात येते. देशात मुगाचे ६५ ते ७५ दिवसांचे वाण (Green Gram Verity) उपलब्ध आहेत. कमी कालावधीचे पीक असल्याने मुगाला भातपट्ट्यातही (Paddy Belt) पसंती मिळते. कारण मुगाखालील क्षेत्र लवकर रिकामे होऊन रब्बीच्या लागवडी करता येतात.

देशात खरीप हंगामात मूग हे महत्त्वाचं कडधान्य पीक आहे. तसं पाहिलं तर देशात मुगाची खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामातही लागवड होते. मात्र मुगाचे सर्वाधिक उत्पादन खरिपातच होते. खरिपातील मुगाची लागवड जून आणि जुलै महिन्यात होते. खरिपात राजस्थानमध्ये सर्वाधिक लागवड होते. त्यानंतर कर्नाटक आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो. रब्बी हंगामातील लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबरच्या दरम्यान होते. रब्बीत मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि ओडिशा या राज्यांत मुगाची लागवड केली जाते. उन्हाळी मुगाची लागवडही मार्च आणि एप्रिल महिन्यात होते. उत्तर प्रदेश, पंजाब, हरियाना, बिहार, पश्‍चिम बंगाल, गुजरात, मध्य प्रदेशातही उन्हाळी मूग लागवड वाढत आहे. उन्हाळ्यात ऊस, गहू, बटाटा, हरभरा आदी पिके काढून हरभऱ्याची लागवड केली जाते.

Green Gram Cultivation
मूग, उडदाची लागवड का घटतेय?

खरीप कडधान्य उत्पादन ः

देशात रब्बीच्या तुलनेत खरिपातील कडधान्य उत्पादन कमी असते. पावसाचे प्रमाण कमी-जास्त झाल्यावर खरिपातील कडधान्य उत्पादनात चढ-उतार होतात. २०१६-१६ मध्ये खरिपातील कडधान्य उत्पादन ५५ लाख ३० हजार टन झाले होते. या वर्षी दुष्काळ असल्याने उत्पादनात मोठी घट झाली होती. त्यानंतरच्या वर्षात मात्र विक्रमी ९५ लाख ८० हजार टनांपर्यंत उत्पादन पोहोचले. मात्र त्यानंतर उत्पादनात घट होत गेली. मागील हंगामात ८२ लाख ५० हजार टन उत्पादनाचा अंदाज सरकारने व्यक्त केला.

देशातील खरीप कडधान्य उत्पादन (लाख टन)

वर्ष…उत्पादन

२०१५-१६…५५.३

२०१६-१७…९५.८

२०१७-१८…९३.१

२०१८-१९…८०.९

२०१९-२०…७९.२

२०२०-२१…८६.२

२०२१-२२…८२.५

Green Gram Cultivation
Future Market:मका, मूग, तुरीच्या किमतींत वाढ

पीकनिहाय खरीप उत्पादनाची स्थिती

खरिपात तूर, मूग आणि उडीद ही महत्त्वाची कडधान्ये पिके आहेत. मात्र खरिपातील या तीनही पिकांचे उत्पादन मागील काही वर्षांत कमी-जास्त राहिल्याचं लक्षात येतं. २०१५-१६ या वर्षात दुष्काळी स्थिती असल्याने सर्वच पिकांचे उत्पादन कमी होते. त्यानंतर मात्र उत्पादनात वाढ होत गेली. तुरीचं सर्वाधिक उत्पादन २०१६-१७ या वर्षात झाले होते. तर मुगाचं सर्वाधिक उत्पादन २०२०-२१ च्या हंगामात झाले. उडदाच्या उत्पादनाने २०१७-१८ मध्ये उच्चांक गाठला होता.

खरिपातील पीकनिहाय उत्पादन (लाख टन)

वर्ष…तूर…मूग…उडीद

२०१५-१६…२५.६…१५.९…१९.५

२०१६-१७…४८.७…२१.७…२८.३

२०१७-१८…४२.९…२०.२…३४.९

२०१८-१९…३३.२…२४.६…३०.६

२०१९-२०…३८.९…२५.१…२०.८

२०२०-२१…४३.२…३०.९…२२.३

२०२१-२२…४३.५…२८.५…२७.६

देशातील एकूण कडधान्य उत्पादनात वाटा (टक्क्यांत)

हरभरा…५०.३७

तूर…१५.६७

मूग…१०.२७

उडीद…९.७१

मसूर…५.१८

इतर…८.५०

देशातील मुगाची लागवड

देशातील मूग लागवड आणि उत्पादन मागील काही वर्षांपासून स्थिर आहे. देशात वर्षाला २७ ते ३० लाख टनांच्या दरम्यान मुगाचा वापर होतो. तर उत्पादनही या दरम्यान राहते. त्यामुळे भारताला मूग आयातही करावा लागतो. सरकारने मुगाच्या हमीभावात वाढ करून लागवडीला प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला. मात्र हमीभावाने खरेदीचा अभाव आणि कमी दर यामुळे मुगाचे लागवड क्षेत्र वाढले नाही. देशात २०१५-१६ मध्ये मूग लागवडीखालील क्षेत्र सुमारे २९ लाख हेक्टर होते. २०२१-२२ या वर्षात मुगाची लागवड २९ लाख २६ हजार हेक्टरवर झाली. म्हणजेच मागील सात वर्षांत मुगाखालील क्षेत्रात नगण्य वाढ झाली.

देशातील मूग लागवड (लाख हेक्टर)

२०१५-१६…२९.१

२०१६-१७…२९.०५

२०१७-१८…२१.३४

२०१८-१९…२९.५२

२०१९-२०…२९.३८

२०२०-२१…२५.२९

२०२१-२२…२९.२६

देशातील मूग उत्पादनाची स्थिती

देशातील मूग उत्पादनात मागील काही वर्षांत चढ-उतार दिसून आले. देशातील मूग उत्पादन २०१५-१६ मध्ये १५ लाख ९० हजार टन झाले होते. त्यानंतरच्या वर्षात उत्पादन २७ लाख ७० हजार टनांवर पोहोचले. मात्र त्यानंतर उत्पादनात पुन्हा घट झाली. पुढे २०२०-२१ मध्ये उत्पादनात जवळपास ६ लाख क्विंटलने वाढ झाली. या वर्षात ३० लाख ९० हजार टन मूग उत्पादन झाले. मात्र मागील हंगामातील उत्पादन ३० लाख ६० हजार लाख टनांवर स्थिरावले आहे.

देशातील मूग उत्पादन (लाख टन)

२०१५-१६…१५.९

२०१६-१७…२७.७

२०१७-१८…२०.२

२०१८-१९…२४.९

२०१९-२०…२५.१

२०२०-२१…३०.९

२०२१-२२…३०.६

हमीभावातील वाढ कशी राहिली?

खरीप कडधान्यांमध्ये मूग आणि उडदाच्या तुलनेत तुरीची लागवड जास्त होते. इतर पिकांमध्ये तुरीचे आंतरपीक घेतले जाते. सरकारने मागील काही वर्षांपासून मुगाच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी हमीभावात वाढ केली. खरिपातील कडधान्याच्या हमीभावाचा विचार करता मुगाला जास्त हमीभाव मिळाला. २०१५-१६ मध्ये मुगाचा हमीभाव तूर आणि उडदाच्या हमीभावापेक्षा २२५ रुपयांनी अधिक होता. मात्र २०२२-२३ मध्ये तूर आणि उडदाच्या तुलनेत मुगाचे हमीभाव तब्बल १,१५५ रुपयांनी जास्त आहेत. थोडक्यात, इतर कडधान्यांच्या तुलनेत मुगाचा हमीभाव सर्वाधिक वाढला.

खरिपातील महत्त्वाच्या कडधान्य हमीभावातील वाढ (रुपये/प्रति क्विंटल)

वर्ष…मूग…तूर…उडीद

२०१५-१६…४८५०…४६२५…४६२५

२०१६-१७…५२२५…५०५०…५०००

२०१७-१८…५५७५…५४५०…५४००

२०१८-१९…६९७५…५६७५…५६००

२०१९-२०…७०५०…५८००…५७००

२०२०-२१…७१९६…६०००…६०००

२०२१-२२…७२७५…६३००…६३००

२०२२-२३…७७५५…६६००…६६००

मूग आयातीची स्थिती

भारतात मूग उत्पादनात चढ-उतार असल्याने मुगाची आयातही होत राहिली. भारतात प्रामुख्याने म्यानमार, टांझानिया आणि केनियातून मुगाची आयात होते. देशात २०२१-२२ मध्ये सर्वाधिक मूग आयात झाली. कोरोनानंतर जागतिक बाजारात शेतीमालाची टंचाई भासत होती. मात्र वापर वाढला होता. त्यामुळे अनेक शेतीमालाचे दर वाढले. भारताचा विचार करता तेलबिया आणि कापसाच्या दराने विक्रमी पातळी गाठली. या शेतीमालाचे दर आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीत होते. मात्र कडधान्य आफ्रिका आणि म्यानमार स्वस्त दरात उपलब्ध होते. त्यामुळे सरकारने मुगाची विक्रमी आयात केली.

भारताची मूग आयात ( टन)

२०१५-१६…१५८,७००

२०१६-१७…९५,२३८

२०१७-१८…८७,८००

२०१८-१९…९४,२००

२०१९-२०…६९,४३९

२०२०-२१…८१,८४२

२०२१-२२…१,६१,३८०

नैसर्गिक आपत्तींचा फटका

देशात मुगाची लागवड मॉन्सून दाखल झाल्यानंतर जून आणि जुलै महिन्यात होते. तर काढणी सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात होते. मात्र मागील काही वर्षांत सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात पावसाचे प्रमाण वाढले आहे. मुगाचं पीक काढणीला येण्याच्या काळात पाऊस होतो. त्यामुळे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गुजरात या राज्यांमध्ये मुगाचं लागवड क्षेत्र घटले. या राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यांत पावसाचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे यापैकी काही राज्यांतील शेतकऱ्यांनी मागील पाच वर्षांपासून सोयाबीनला पसंती दिली आहे. महाराष्ट्रात मागील तीन वर्षांपासून काढणीला आलेला मूग हातचा जात आहे. पावसामुळे काढणी शक्य होत नसल्याने मोठं नुकसान होत आहे.

यंदा मूग लागवड का वाढली

देशात खरिपातील कडधान्य लागवड यंदा घटली. ५ ऑगस्टपर्यंत कडधान्याखालील क्षेत्र अडीच टक्क्यांनी कमी झाले. यात तूर १०.४२ टक्के आणि उडीद ६ टक्क्यांनी कमी झाला. मात्र दुसरीकडे मुगाची लागवड अडीच टक्क्यांनी वाढली. मागील वर्षी ५ ऑगस्टपर्यंत ३० लाख २३ हजार हेक्टरवर मुगाची लागवड होती. मात्र यंदा ३० लाख ९९ हजार हेक्टरपर्यंत पोहोचली.

देशात यंदा राजस्थानमध्ये मुगाची लागवड २ लाख २४ हजार हेक्टरने वाढली. मागील वर्षी राजस्थानमध्ये १८ लाख हेक्टरवर मूग होता. मात्र महाराष्ट्रात मुगाचं क्षेत्र जवळपास एक लाख हेक्टरने घटलं. मागील वर्षी महाराष्ट्रात ३ लाख ६२ हजार हेक्टरवर मूग लागवड होती. आंध्र प्रदेशात एक हजार हेक्टर आणि तेलंगणात २७ हजार हेक्टर क्षेत्रात मुगाची लागवड कमी झाली. मात्र कर्नाटकात लागवड ४ हजार हेक्टरने वाढली. खरिपात इतर पिकांची लागवड कमी झाल्यानंतरही मुगाला मात्र शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचं दिसतं. याचे महत्त्वाचे कारण म्हणजे मुगाच्या हमीभावात सरकारने केलेली मोठी वाढ. त्यातच सरकारने यंदा मुगाच्या आयातीवर निर्बंध घातलेले आहेत. त्यामुळे यंदा मुगाला शेतकऱ्यांनी पसंती दिल्याचे जाणकारांनी सांगितले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com