हरभऱ्याच्या बाजारभावात वाढ
1. गेल्या काही हंगामापासून हरभरा पीक शेतकऱ्यांसाठी तोट्याचे ठरत आहे. हमीभावापेक्षा कमी भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांसाठी हा आतबट्ट्याचा धंदा ठरलाय. पण आता पहिल्यांदाच हरभऱ्याच्या किंमती वाढल्या आहेत. मागील काही दिवसांमध्ये हरभऱ्याचे भाव सतत वाढत आहेत. दिल्लीमध्ये हरभरा अनेक महिन्यांनंतर पहिल्यांदाच प्रति क्विंटल पाच हजार रूपयांपर्यंत पोहोचलाय. पुढील तीन महीने हरभऱ्याची मागणी किमान १५ लाख टन एवढी राहण्याचा अंदाज आहे. व्यापाऱ्यांकडे हरभऱ्याचा स्टॉक खूपच कमी शिल्लक राहिलाय. त्यामुळे मागील हंगामाच्या अखेरच्या या तीन महिन्यात किमती अजून सुधारून हमीभावाच्या जवळ जाण्याची शक्यता आहे. यंदाच्या रब्बी हंगामात हरभरा लागवड घटण्याची शक्यता आहे. त्यामुळेही हरभऱ्याचे भाव वाढण्याची शक्यता आहे. परंतु नाफेडकडे सुमारे २५ लाख टन हरभऱ्याचा स्टॉक आहे. त्यामुळे पुढील दोन-तीन महिन्यांमध्ये हरभरा बाजारात तेजी आली तरी दर हमीभावापेक्षा फार वर जाण्याची शक्यता नाही. तसेच दर ४,७००-४,७५० च्या खाली घसरण्याचीही शक्यता नाही. यंदाच्या रब्बी हंगामात हरभऱ्याऐवजी राजमा, इतर नगदी पिके किंवा भाजीपाला लावणे फायद्याचे ठरेल, असा तज्ज्ञांचा सल्ला आहे.
मक्याच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ
2. छिंदवाडा हे मध्य प्रदेशमधील मार्केट मक्यासाठी प्रसिध्द आहे. हे मक्याचं बेंचमार्क मार्केट आहे. या मार्केटमधल्या भावावरून मक्याचा कल लक्षात येतो. छिंदवाडा मार्केटमध्ये मक्याच्या किंमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात किंमती १.३ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल २,२०० रूपयांवर आल्या होत्या. या सप्ताहातसुद्धा त्या २,२०० रूपयांवर स्थिर आहेत. डिसेंबर डिलिवरीच्या फ्युचर्स किंमती २,२१० रूपयांवर आल्या आहेत. फेब्रुवारी फ्युचर्स किंमती २,२३४ रूपयांवर आहेत. मक्याचा हमीभाव १,९६२ रूपये आहे. यंदा मक्याचं विक्रमी उत्पादन होण्याची शक्यता आहे. परंतु पशुखाद्य, स्टार्च उद्योगाकडून तसेच इथेनॉलसाठी मक्याला वाढती मागणी राहील, असा तज्ज्ञांचा होरा आहे.
युक्रेनच्या शेतकऱ्यांचा कडधान्यांकडे कल
3. रशियाबरोबर सुरू असलेल्या युध्दात होरपळणाऱ्या युक्रेनच्या शेतकऱ्यांचा कडधान्य पिकांकडे कल वाढण्याची शक्यता आहे. युक्रेनमध्ये खतांचा तुटवडा आहे. वाटाणा आणि इतर कडधान्य पिकांना खतांची गरज कमी भासते. त्यामुळे पुढील हंगामात युक्रेनचे शेतकरी कडधान्य पिकांचा पेरा वाढवण्याची शक्यता आहे. युक्रेनमधील कडधान्य उद्योग बहुतांश करून निर्यातकेंद्रीत आहे. रशिया-युक्रेन युध्दामुळे या उद्योगाला मोठा फटका बसलाय. २०२१ च्या हंगामातील बहुतांश कडधान्य युध्द सुरू होण्यापूर्वीच निर्यात करण्यात आले आहे. युध्द सुरू झाल्यामुळे २०२२ मधील कडधान्य लागवडीवर मात्र प्रतिकूल परिणामा झाला. आधीच्या वर्षीच्या तुलनेत पेरा निम्म्याने घटला. आता पुढच्या हंगामात कडधान्य पेरा वाढण्याची शक्यता आहे. २०२२ पूर्वी युक्रेनमधल्या कडधान्यांची टर्की, पाकिस्तान, मलेशिया आणि युरोपियन युनियनला निर्यात होत असे. परंतु युध्द सुरू झाल्यानंतर मात्र बहुतांश माल थेट युरोपियन युनियनला गेला आहे.
हळदीची झळाळी वाढणार
4. हळदीसाठी देशात प्रसिध्द असलेल्या निजामाबाद मार्केटमध्ये हळदीच्या किंमती नोव्हेंबर महिन्यात वाढत होत्या. गेल्या सप्ताहात त्या १.५ टक्क्यांनी वाढून प्रति क्विंटल ७,५१५ रूपयांवर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १ टक्क्यांनी घसरून ७,४४१ रूपयांवर आल्यात. डिसेंबर फ्युचर्स किंमती ७,१५६ रूपयांवर आल्या आहेत. एप्रिल फ्युचर्स किमती ७,९४० वर आल्या आहेत. हळदीमध्ये किंमतवाढीचा कल दिसून येत आहे.
उत्तर भारतात लवकर गहू पेरणीचा फायदा होणार की तोटा?
5. देशात या आठवड्यातही गहू लागवडीत (Wheat Sowing) वाढ झालीय. कृषी मंत्रालयाच्या (Union Ministry Of Agriculture) २५ नोव्हेंबरपर्यंतच्या आकडेवारीनुसार देशातील गहू पेरा १०.५ टक्के वाढलाय. देशात यंदा आतापर्यंत १५२ लाख ८८ हजार क्षेत्रावर गव्हाची पेरणी (Wheat Cultivation) झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत १३८ लाख ३५ हजार हेक्टर क्षेत्रावर गहू पेरा झाला होता. प्रमुख गहू उत्पादक राज्यांपैकी मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक क्षेत्र वाढलं आहे. त्या पाठोपाठ राजस्थान, पंजाब, बिहार, गुजरात आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे. फक्त हरियाणामध्ये गहू पेरा घटलाय. यंदा हवामान गहू लागवडीसाठी अनुकूल आहे. लवकर पेरणी गहू पिकाच्या पथ्यावर पडली आहे.
सुरूवातीला लवकर पेरणीमुळे गहू लागवडीत उत्तर प्रदेश खूपच आघाडीवर होता. परंतु आता गहू लागवडीचा वेग काहीसा कमी झालाय. राज्याच्या काही भागांतील शेतकऱ्यांनी गव्हाऐवजी मोहरी लागवडीकडे मोर्चा वळवलाय. उत्तर प्रदेशमध्ये यंदा आतापर्यंत ३५ लाख ६८ हजार हेक्टरवर गव्हाची लागवड झालीय. गेल्या चार वर्षांतील ही सर्वाधिक लागवड आहे. महाराष्ट्रातही अनेक शेतकऱ्यांनी गव्हाला पसंती दिलीय. गव्हाचा वाढता पेरा लक्षात घेता यंदा बंपर उत्पादन होण्याची आशा पल्लवित झालीय. त्यामुळे सरकारला गव्हाचा साठा करण्यासाठी खरेदीचा मार्ग मोकळा होईल. सध्या सरकारकडे असलेला गव्हाचा साठा गेल्या १५ वर्षांतील सगळ्यात कमी आहे. गव्हासह एकूण रब्बी पिकांच्या लागवडीत ७.२१ टक्के वाढ झाली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.