
सध्या भारतीय मक्याची (Indian Maize) मागणी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाढली आहे. युरोपियन युनियनला (EU) भारताकडून मक्याचा अधिकाधिक पुरवठा व्हावा, अशी अपेक्षा आहे. कारण भारतीय मका हा नॉन जीएम (GM) म्हणजे जनुकीय बदल न केलेला असतो. भारतात कापूस वगळता इतर जीएम पिकांना परवानगी नाही.
"आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत भारतीय मक्याची मागणी वाढली आहे. युरोपियन युनियकडून ही मागणी सुरू आहे. युरोपला हा मका खाद्यान्नासाठी हवा आहे. पण त्यांना सध्याच्या किंमती जास्त वाटतायत,'' असे एका बाजार विश्लेषकाने सांगितले.
व्हिएतनाम, मलेशिया आणि श्रीलंकेसारख्या देशातूनही भारतीय मक्याला मागणी वाढण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.
खरीप मक्याची आवक सुरू झाली आहे. ऑक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात मक्याचे भाव जवळपास २२०० रूपये प्रति क्विंटलवर पोहोचले होते. गेल्या वर्षी याच कालावधीत दर १६५० रूपयाच्या आसपास होते.
केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार यंदा (२०२२-२३) मक्याचे विक्रमी २३.१० दशलक्ष टन उत्पादन होण्याची शक्यता आहे. गेल्या वर्षी २२.६३ दशलक्ष टन उत्पादन झाले होते.
गव्हाच्या किंमती तेजीत आल्यामुळे मक्याचे दर वाढले आहेत. मार्च-एप्रिलमध्ये उष्णतेची लाट आल्यामुळे गव्हाच्या पिकाला फटका बसला. त्यामुळे गहू उत्पादन घटल्याने किंमती वाढल्या आहेत. त्याचा थेट परिणाम मक्याच्या किंमतींवरही झाला आहे.
महाराष्ट्रात मक्याची आवक सुरू झाली आहे. कर्नाटकात मात्र पावसामुळे आवक उशिरा सुरू होईल, डिसेंबरमध्ये मका बाजारात येईल, असे बाजारविश्लेषकांनी सांगितले. बिहारचा रब्बी हंगामातील मका बाजारात आल्यानंतरच देशाच्या पूर्व भागातील आवक वाढेल, असे त्यांनी सांगितले.
दरम्यान बांगलादेशने मका निर्यातीसाठीचे नियम बदलल्याने छोट्या व्यापाऱ्यांना निर्यातीसाठी अडचणी येत आहेत. तैवानमध्ये सुद्धा भारतीय मक्याची निर्यात केली जाते. पण त्यांचं निर्यातीचं धोरण खूप कडक आहे. त्यांना अॅफ्लाटॉक्सिन आणि ओलावा चालत नाही. त्यामुळे अनेक निर्यातदार तैवानमध्ये मका पाठवायला उत्सुक नाहीत, असे बाजार विश्लेषकांनी सांगितले.
केंद्र सरकारने मका निर्यातीसाठी प्रोत्साहन दिलं तर भारत जागतिक बाजारपेठेत मोठा निर्यातदार देश म्हणून पुढं येईल, असं मत त्यांनी व्यक्त केलं.
पण देशांतर्गत बाजारपेठेत पोल्ट्री फिडसाठी आणि स्टार्च उद्योगासाठी मक्याची मागणी वाढत असल्याचं जाणकारांनी सांगितलं. दोन वर्षांपूर्वी देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी मका आयात करावा लागला होता. त्यामुळे केंद्र सरकारला या गोष्टीकडेही लक्ष द्यावे लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले.
जागतिक बाजारपेठेत मक्याचा पुरवठा करणारे प्रमुख देश आहेत युक्रेन आणि रशिया. त्यांच्यात युध्द सुरू असल्याने मक्याची पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे युरोपियन युनियनची मक्याची मागणी पूर्ण करण्यासाठी भारताला मोठी संधी आहे. परंतु अंतराच्या दृष्टीने ब्राझील किंवा अर्जेंटिना सारखे देश युरोपियन युनियनला जवळ आहेत. त्या तुलनेत भारतातून होणारी निर्यात महाग पडते, याकडे विश्लेषकांनी लक्ष वेधले.
221 words / 1627 characters
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.