
फ्युचर्स किमतीः सप्ताह २१ जून ते २७ जून २०२५
या सप्ताहात महाराष्ट्र शासनाने स्मार्ट प्रकल्पाच्या अंतर्गत हेजिंग डेस्क स्थापन केल्याची घोषणा केली. सध्या NCDEX मध्ये महाराष्ट्रातील प्रमुख पिकांपैकी कापूस, कपाशी, मका व हळद या पिकांचा तर MCX मध्ये कापूस व कपाशी यांचा फ्युचर्स व्यवहारांसाठी समावेश आहे.
यापैकी NCDEX मध्ये कापूस व मका यांचे व MCX मध्ये कपाशीचे व्यवहार जवळ जवळ शून्य आहेत. त्यामुळे या डेस्कतर्फे NCDEX मध्ये कपाशी व हळद तर MCX मधील कापूस यांच्या फ्युचर्स व्यवहार व हेजिंगसाठी या डेस्कची प्रशिक्षण व अंमलबजावणीसाठी मदत घ्यावी. यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत:
या वस्तूंच्या करार-नियमानुसार प्रत्येक करारासाठीची डिलिव्हरी युनिट्स मोठी आहेत (कपाशी ४ टन, मका १० टन, हळद ५ टन, कापूस प्रत्येकी १८० किलोच्या १०० गाठी). प्रत्येक शेतकऱ्यांकडे एव्हढा माल असेलच असे नाही. त्यामुळे शेतक-यांनी एकत्र यावे व हे सर्व व्यवहार मिळून करावेत.
हे व्यवहार प्रत्यक्ष डिलिव्हरीसाठी वापरणे शक्यतो टाळावे. त्यात खर्च जास्त आहे व आपल्या मालाचे स्पेसिफिकेशन व करारातील दिलेले स्पेसिफिकेशन यात मोठा फरक असू शकतो. फ्युचर्स व्यवहार फक्त हेजिंगसाठीच वापरावेत.
जेव्हा डिलिव्हरी वेळच्या फ्युचर्स किमती हमीभावापेक्षा (किंवा आपल्या अपेक्षित किमतीपेक्षा) पुरेसा अधिक असतील तेव्हाच हेजिंग करावे. यातील ‘पुरेसा’ हा शब्द महत्त्वाचा आहे. या मध्ये दर्जातील फरक, आपण ज्या मार्केट मध्ये विकतो त्या व फ्युचर्स डिलिव्हरी मार्केट मधील किमतीतील फरक, फ्युचर्स व्यवहार करताना येणारा सर्व खर्च, इत्यादी गोष्टींचा समावेश होतो. हे सर्व तपशील लक्षात घेण्यासाठी हेजिंग डेस्क व दलाल (जो फ्युचर्स व्यवहार करण्यासाठी आवश्यक असतो) यांची मदत घेणे अनिवार्य आहे.
फ्युचर्स व्यवहार करताना वेळ ही अतिशय महत्त्वाची बाब आहे. फ्युचर्स किमती क्षणा-क्षणाला बदलत असतात. योग्य वेळ निवडली तर चांगला फायदा होऊ शकतो. यासाठी स्पॉट व फ्युचर्स भावांवर सतत लक्ष ठेवणे, त्यांचा कल बघणे व त्यांचे विश्लेषण करणे आवश्यक ठरते.
हेजिंग केल्यामुळे निश्चित अधिक किंमत मिळते; पण त्याचबरोबर हे लक्षात घेतले पाहिजे की बाजारात डिलिव्हरीच्या वेळी जास्त किंमत झाली तर त्याचा फायदा मिळत नाही. हेजिंगचे उद्दिष्ट किमतीतील चढ-उतारांपासून स्वतःचे संरक्षण करणे व जेवढा अधिक व योग्य भाव मिळणे शक्य आहे तो आधीच ठरवणे; चढ- उतारांपासून फायदा मिळवणे हे नाही. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये असा फायदा-सुद्धा मिळू शकतो. मात्र वरील वस्तूंसाठी ऑप्शन ट्रेडिंग सध्या उपलब्ध नाही.
फ्युचर्स भाव लक्षात घेऊन खरेदी-दाराबरोबर फॉरवर्ड डिलिव्हरी करार करता येतील. अशा करारातील किंमत ठरवताना फ्युचर्स भाव हा वस्तुनिष्ठ आधार ठरतो. प्रगत देशातील बहुतेक शेतकरी या मार्गाचा वापर करून फॉरवर्ड डिलिव्हरी करार करतात व भावासंबंधी आश्वस्त होतात. तेथे त्यामुळे स्पॉट व्यवहार आपल्या तुलनेने फारच कमी होतात.
२७ जून २०२५ रोजी संपलेल्या सप्ताहात किमतीमधील सविस्तर चढ-उतार खालील प्रमाणे आहेत.
कापूस/कपाशी
MCX मधील कापसाचे स्पॉट भाव (राजकोट, यवतमाळ, जालना) या सप्ताहात ०.१ टक्क्यांनी वाढून रु. ५४,३०० वर आले आहेत. जुलै फ्युचर्स भाव ०.३ टक्क्यांनी घसरून रु. ५३,०४० वर आले आहेत. सप्टेंबर भाव रु. ५५,००० वर आलेले आहेत. ते स्पॉट भावापेक्षा १.३ टक्क्यांनी अधिक आहेत.
NCDEX मधील कपाशीचे स्पॉट भाव (राजकोट, प्रति २० किलो, २९ मिमी) गेल्या सप्ताहात रु. १,५४५ वर आले होते. या सप्ताहात ते ०.४ टक्क्याने घसरून रु. १,५३९ वर आले आहेत. नोव्हेंबर फ्युचर्स ०.५ टक्क्यांनी घसरून रु. १,५७९ वर आले आहेत. ते स्पॉट
भावापेक्षा २.६ टक्क्यांनी अधिक आहेत. एप्रिल फ्युचर्स रु. १,६१९ वर आले आहेत.
कापसाचे हमीभाव मध्यम धाग्यासाठी प्रति क्विंटल रु. ७,७१० व लांब धाग्यासाठी रु. ८११० आहेत. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमीभावापेक्षा कमी आहेत. अमेरिकेतील कापसाचे भाव या सप्ताहात ६.३ टक्क्यांने वाढले.
मका
NCDEX मधील खरीप मक्याच्या स्पॉट किमती (गुलाबबाग) गेल्या सप्ताहात रु. २,२७५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी वाढून रु. २,३०० वर आल्या आहेत. जुलै फ्युचर्स किमती २.३ टक्क्यांनी वाढून रु. २,३०८ वर आल्या आहेत. ऑक्टोबर फ्युचर्स रु. २,३४४ वर आहेत. स्पॉटपेक्षा हा भाव १.९ टक्क्यांनी अधिक आहे. मक्याचा नवीन हमी भाव रु. २,४०० आहे. सध्याचे स्पॉट व फ्युचर्स भाव हमी भावापेक्षा कमी आहेत.
हळद
NCDEX मधील हळदीच्या स्पॉट किमती (निजामाबाद, सांगली) गेल्या सप्ताहात त्या १.१ टक्क्यांनी घसरून रु. १४,३१५ वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या पुनः ०.६ टक्क्यांनी वाढून रु. १४,४०२ वर आल्या आहेत. ऑगस्ट फ्युचर्स किमती १.२ टक्क्यांनी घसरून रु. १४,०९४ वर आल्या आहेत. ऑक्टोबर किमती रु. १४,५४४ वर आल्या आहेत. स्पॉट भावापेक्षा त्या १.० टक्क्यांनी अधिक आहेत. सांगली मधील (राजापुरी) स्पॉट भाव १.१ टक्क्यांनी वाढून रु. १६,०३८ वर आला आहे.
हरभरा
हरभऱ्याच्या स्पॉट किमती (अकोला) गेल्या सप्ताहात रु. ५,८०० वर आल्या होत्या. या सप्ताहात त्या २.६ टक्क्यांनी वाढून रु. ५,९५० वर आल्या आहेत. नवीन हंगामासाठी हमीभाव रु. ५,६५० जाहीर झाला आहे. बाजार भाव हमीभावापेक्षा अधिक आहे.
मूग
मुगाची स्पॉट किंमत (मेरटा) १.९ टक्क्यांनी घसरून रु. ७,१७५ वर आली आहे. मुगाचा हमीभाव रु. ८,७६८ जाहीर झाला आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा बराच कमी आहे. नवीन पिकाची आवक वाढती आहे.
सोयाबीन
गेल्या सप्ताहात सोयाबीनची स्पॉट किंमत (अकोला) रु. ४,४४४ वर आली होती. या सप्ताहात ती याच पातळीवर आहे. सोयाबीनचा हमीभाव रु. ५,३२८ आहे. नवीन पिकाची आवक आता कमी होऊ लागली आहे. हमीभावापेक्षा बाजारभाव कमी आहे. अमेरिकेतील सोयाबीनचे भाव या सप्ताहात ०.९ टक्क्यांनी कमी झाले.
तूर
गेल्या सप्ताहात तुरीची स्पॉट किंमत (अकोला) रु. ६,५५३ वर आली होती. या सप्ताहात ती २.१ टक्क्यांनी वाढून रु. ६,६८८ वर आली आहे. तुरीचा हमीभाव रु. ८,००० आहे. आवक कमी होऊ लागली आहे. सध्याचा भाव हमीभावापेक्षा कमी आहे.
(सर्व किमती प्रति क्विंटल; कापसाची किंमत प्रति खंडी (३५५.५६ किलो); कपाशीची किंमत प्रति २० किलो.)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.