
ज्वारीचे (Jowar) मूळ हे आफ्रिकेत सापडते. आफ्रिकेतून ज्वारी आशिया आणि नंतर भारतात पोचली. ज्वारी कमी पाण्यात येणारे पीक आहे. इतर धान्य पिकांच्या तुलनेत ज्वारी अधिक दुष्काळ सहनशील धान्यपीक आहे. ज्वारीला मक्याच्या (Maize) तुलनेत खत आणि पाणी कमी लागते. त्यामुळे विविध देशांमध्ये आणि प्रामुख्याने कमी पावसाच्या भागांमध्ये ज्वारीचे प्रमाण अधिक आहे. भारताच्या दृष्टीने विचार केला तर उत्पादनात वाढ मात्र लागवडीखालील क्षेत्रात घट अशी स्थिती मागील सहा दशकांमध्ये झाल्याचे दिसते.
पूर्वेकडील देशांमध्ये पशुखाद्यात ज्वारीचा मोठ्या प्रमाणात वापर होतो. धान्य पिकाचा विचार करता मका, भात, गहू आणि बार्लीनंतर ज्वारीचे उत्पादन घेतले जाते. म्हणजेच धान्य पिकात ज्वारी पाचव्या क्रमांकावर आहे. आफ्रिकेतील नायजेरिया, इथोपिया आणि सुदान तसेच चीन आणि भारतात ज्वारीचा जास्त वापर होतो. उत्तर आणि दक्षिण अमेरिकेतही मानवी आहारात ज्वारी वापरली जाते. अमेरिकेच्या कृषी विभागाच्या मते, जगात आफ्रिकेतील देशांमध्ये ज्वारीचे जास्त उत्पादन घेतले जाते. जागतिक पातळीवर मानवी आहारात होणाऱ्या वापरापैकी ज्वारीचा ४० टक्के आफ्रिकेतील देशांमध्ये होतो.
भारतातील वापर आणि उत्पादन
भारतात ज्वारी हेच मुख्य धान्य पीक आहे. पुर्वी ज्वारीचा पेराही जास्त होता. १९६० मध्ये भारतातील ज्वारी उत्पादन ९८ लाख १४ हजार टन ज्वारी उत्पादन झाले होते. देशातील ज्वारी उत्पादनाने १९८९ साली विक्रमी टप्पा गाठला होता. या वर्षात भारताने १२९ लाख टन ज्वारी उत्पादन घेतले होते. ते १९९२ मध्ये १२८ लाख टनांवर पोचले. त्यानंतर उत्पादन सतत घटत गेले. १९९६ मध्ये ज्वारी उत्पादन १०९ लाख टनांपर्यंत घसरले. त्यानंतर सतत घटच होत गेली.
२००७ साली ७९ लाख टन आणि मागीलवर्षी ४४ लाख टनांवर उत्पादन थांबले.. म्हणजेच १९८९ च्या तुलनेत २०२१-२२ मध्ये ज्वारी उत्पादनात ५६ टक्क्यांनी घट झाली. परिणामी ज्वारी उत्पादनाबरोबरच देशातील ज्वारीचा वापरही कमी होत गेला. हरित क्रांतीनंतर देशात गहू आणि भात हे मुख्य अन्नधान्य बनले. आहारातील ज्वारीचा वापर कमी होत गेला.
ग्रामीण भागात ‘गरिबाचे अन्न’ अशी ज्वारीची ओळख मागील सहा दशकं राहिली. मात्र अलीकडे आरोग्याच्या दृष्टीने सजग झालेल्या शहरी वर्गात ज्वारी खाण्याचे प्रमाण वाढले आहे. देशातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेतील गहू वाटपानेही ज्वारीला ग्रामीण मानवी आहारातून कमी केले आहे. भारतात १९६० साली ९४ लाख ज्वारीचा वापर झाला होता. तो १९८९ मध्ये १२७ लाख टनांपर्यंत वाढला. मात्र नंतरच्या काळात ज्वारीचा वापर कमी होत गेला. गेल्या हंगामातील ज्वारीचा वापर ४४ लाख ५० हजार टनांपर्यंत घसरला. १९८९ मधील ज्वारी वापराशी तुलना करता वापर ६५ टक्क्यांनी कमी झालेला दिसतो.
भारतातील उत्पादन
आणि वापर (लाख टन)
वर्ष उत्पादन वापर
२०१३ ५५.४ ५२
२०१४ ५४.५ ५१
२०१५ ४२.३ ४६
२०१६ ४५.७ ४५
२०१७ ४८ ४६
२०१८ ३५ ३५.५
२०१९ ४८ ४५
२०२० ४८.२ ४५.५
२०२१ ४२.५ ४४.५
२०२२ ४४* ४४.५*
(स्रोत युएसडीए)
राज्यात पेरणीला उशीर
राज्यात रब्बी ज्वारी पेरणीत सोलापूर, नगर, सांगली, कोल्हापूर, जळगाव, नाशिक ही महत्त्वाचे जिल्हे मानले जातात. मात्र यंदा परतीचा पाऊस जास्त दिवस रेंगाळल्याने या जिल्ह्यांमध्येही रब्बी पेरणीला उशीर झाला. तसेच थंडी पाहिजे त्या प्रमाणात नाही. त्यातच मागील हंगामात फेब्रुवारी महिन्यापासून उष्णता वाढली होती. मार्चमध्ये तर विक्रमी तापमान राहिले होते. सध्याच्या तापमानाचा अंदाज घेता यंदाही अशीच काहीशी परिस्थिती राहू शकते, असा अंदाज काही हवामानविषयक जाणकार व्यक्त करत आहेत. असे झाल्यास ज्वारीच्या उत्पादकतेवर परिणाम होऊ शकतो.
राज्यनिहाय ज्वारी उत्पादन
देशात ज्वारी उत्पादनात महाराष्ट्र आघाडीवर असून जवळपास ३० ते ३५ टक्के उत्पादन होते. मात्र मागील हंगामात महाराष्ट्राने देशातील ४२ टक्के उत्पादन घेतले. महाराष्ट्रासह कर्नाटक, तमिळनाडू, राजस्थान आणि आंध्र प्रदेशात रब्बी हंगामात ज्वारीचा पेरा जास्त असतो. मागील हंगामात कर्नाटकने २३.८० टक्के उत्पादन घेतले. तर तमिळनाडूत १२.३८ टक्के आणि राजस्थानमध्ये १०.८३ टक्के उत्पादन झाले.
राज्यनिहाय उत्पादन (लाख टन)
राज्य उत्पादन
महाराष्ट्र १८
कर्नाटक १०
तमिळनाडू ५.२
राजस्थान ४.५५
आंध्र प्रदेश ३.८९
दरवाढ कायम राहण्याचा अंदाज
ज्वारीच्या दरात ऑक्टोबर महिन्यापासून वाढ होत गेली. सप्टेंबर महिन्यात ज्वारीला सरासरी २ हजार ४०० ते ३ हजार २०० रुपयांपर्यंत दर होते. मात्र मागील दोन महिन्यांमध्ये ज्वारीच्या दरात क्विंटलमागे सरासरी ५०० रुपयांची सुधारणा झाली आहे. सध्या बाजारात खरिपातील ज्वारीची आवक होत आहे. मात्र तरीही ज्वारीला सरासरी प्रतिक्विंटल ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर मिळत आहे. त्यातच खरिपातील उत्पादन कमी राहिल्याचा अंदाज, रब्बी पेरणीला होणारा उशीर आणि वाढती मागणी यामुळे यंदा ज्वारीचे दर तेजीतच राहण्याचा अंदाज आहे, अशी शक्यता ज्वारी बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केली.
ज्वारीचे वाढते महत्त्व
जागतिक पातळीवर आता कमी पावसात येणाऱ्या आणि पौष्टिक पिकांना महत्त्व दिले जात आहे. कोरोनाकाळात लोकांना ज्वारी, बाजरीसह इतर भरडधान्याचे महत्त्व कळाले. त्यामुळे या पिकांना मागणी वाढले. त्यामुळे संयुक्त राष्ट्रसंघाने २०२२-२३ हे वर्ष भरडधान्य वर्ष जाहीर केले आहे. त्यापूर्वी २०१८ वर्षे देशात भरडधान्य वर्ष म्हणूनही साजरे केले गेले. भरडधान्यामध्ये ज्वारीला जास्त महत्त्व वाढणार आहे. सध्या जागतिक पातळीवर शेतीपिकामध्ये मक्याचे सर्वाधिक उत्पादन होते. मात्र मक्याला जास्त अन्नद्रव्य लागते. त्यामुळे जमिनीच्या सुपिकतेवर परिणाम होतो, असे मानले जाते. त्यामुळे मक्याला पर्याय म्हणून काही देशांमध्ये ज्वारीकडे पर्याय म्हणून पाहिले जात आहे. तसे इथेनॉलसाठी ज्वारीच्या काही जाती विकसित करण्यात आल्या आहेत. मानवी आहारातही पौष्टिक धान्य म्हणून ज्वारीचा वापर वाढत आहे.
मूल्यवर्धन साखळीची गरज
ज्वारी लागवडीतून शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी ज्वारीकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळे ज्वारीपासून ‘रेडी टू इट’ आणि ‘रेडी टू कुक’ यासारख्या पदार्थांची निर्मिती होणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्वारीचे मूल्यवर्धन वाढवत येईल. त्यातून शेतकऱ्यांना किफायतशीर दर मिळू शकतो. अलीकडे ज्वारीपासून नूडल्स ते पिझापर्यंत विविध पदार्थ बनवले जात आहेत. मात्र त्यासाठी लागणारी सक्षम अशी मूल्यसाखळी उभी राहिलेली नाही. अर्थात यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने पुढाकार घेणे आवश्यक आहे. अन्यथा केवळ भरडधान्य वर्षे साजरे करण्याला फारसा अर्थ उरत नाही.
जागतिक उत्पादन
जागतिक ज्वारी उत्पादनाचा आढावा घेतल्यास मागील पाच वर्षात उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले. २०१२ मध्ये जागतिक ज्वारी उत्पादन ७१७ लाख टनांवर होते. ते २०२१-२२ मध्ये ६१५ लाख टनांवर आले. जगातील एकूण ज्वारी लागवडीपैकी तब्बल ९० टक्के क्षेत्र हे विकसनशील देशांमध्ये आहे. त्यातही आफ्रिका आणि आशियात प्रामुख्याने ज्वारीची लागवड होते. आफ्रिका आणि आशियात मानवी आहारात ज्वारीचा जास्त वापर होतो. तर अमेरिका, चीन आणि इतर विकसित देशांमध्ये ज्वारीचा वापर हा पशुखाद्य आणि जैवइंधनासाठी होतो. मागील वर्षी अमेरिकेत सर्वाधिक ज्वारी उत्पादन झाले. मागील हंगामात जागतिक पातळीवर ६५२ लाख टन ज्वारीचे उत्पादन झाले होते. त्यापैकी ११४ लाख टन उत्पादन अमेरिकेने घेतले. तर नायजेरियात ६८ लाख टन उत्पादन झाले. इथोपियात ५२ लाख टन, सुदान ५० लाख टन आणि मेक्सिकोत ४७ लाख टन तसेच भारतात ४४ लाख टन ज्वारीचे उत्पादन झाले. गेल्यावर्षीचा विचार करता भारत जागतिक ज्वारी उत्पादनात पाचव्या क्रमांकावरून सहाव्या क्रमांकावर गेला आहे.
देशनिहाय २०२१-२२
मधील उत्पादन (लाख टन)
देश उत्पादन
अमेरिका ११४
नायजेरिया ६८
इथोपिया ५२
सुदान ५०
मेक्सिको ४७
भारत ४४
अर्जेंटिना ३७
चीन ३०
ब्राझील २७
(स्रोत युएसडीए)
जागतिक उत्पादनातील वाटा
जगात अमेरिकेने मागील दोन वर्षांपासून नायजेरियाला उत्पादनात मागे टाकले. आता नायजेरिया दुसऱ्या क्रमांकावर आहे. मागील हंगामात जगातील एकूण ज्वारी उत्पादनापैकी तब्बल १७.४८ टक्के ज्वारी उत्पादन अमेरिकेने घेतले. तर नायजेरियात १०.४२ टक्के उत्पादन झाले. अमेरिका आणि नायजेरिया या दोन्ही देशांमध्ये जागतिक उत्पादनाच्या जवळपास २८ टक्के उत्पादन होते. अर्थात त्यामागे पशुखाद्याची गरज भागविणे आणि अन्नधान्याची निकड पूर्ण करणे हे दोन महत्त्वाचे उद्देश आहेत.
जागतिक उत्पादनात
विविध देशांचा हिस्सा (टक्के)
देश हिस्सा
अमेरिका १७.४८
नायजेरिया १०.४२
इथोपिया ८
सुदान ७.६६
मेक्सिको ७.२०
भारत ६.७४
जागतिक पातळीवर वापर
जगात मानवी आहार, पशुखाद्यासोबत उद्योगातही ज्वारीचा वापर वाढला आहे. आफ्रिका आणि आशियातील देशांमध्ये मानवी आहारातील वापर जास्त आहे. तर चीन, अमेरिका आणि ब्राझील या देशांमध्ये ज्वारीचा वापर पशुखाद्यात जास्त होतो. तसेच अमेरिका, ब्राझील, अर्जेंटिना आणि इतर विकसित देशांमध्ये जैव इंधनासाठी ज्वारी वापरली जाते. जागतिक पातळीवर ज्वारी वापराचा विचार करता चीनचा प्रथम क्रमांक लागतो. चीनमध्ये मागील हंगामात सर्वाधिक १०८ लाख टन वापर झाला. त्यानंतर नायजेरियात ६८ लाख टन ज्वारी वापरली गेली. मात्र चीनमध्ये पशुखाद्यात जास्त वापर झाला तर नायजेरियात मानवी वापर जास्त होता. तर भारतात ४४.५ लाख टन ज्वारीचा वापर झाला. ज्वारी वापरात भारत सहाव्या स्थानावर आहे. तर भारतात मानवी आहारातच जास्त वापर होतो.
भारतातील स्थिती
देशाच्या विचार करता खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात ज्वारी उत्पादन घेतले जाते. खरिपातील ज्वारी काढणी पूर्ण झाली आहे. खरिपात यंदा गेल्यावर्षीपेक्षा लागवड काहीशी कमी होऊन १४ लाख २३ हजार हेक्टरवर पोचली होती. मात्र देशातील खरिपाचे सरासरी क्षेत्र जवळपास २० लाख हेक्टर आहे. म्हणजेच सरासरीपेक्षा पेरा ५ लाख ७७ हजार हेक्टरने कमी झाला होता. केंद्राने यंदा उत्पादन ४४ लाख टनांवर पोचण्याचा अंदाज व्यक्त केला. खरिपात ३० लाख टन उत्पादनाचं उद्दिष्ट ठेवले होते. गेल्या खरिपातील ज्वारी उत्पादन १६ लाख होते.
सरकारने पहिल्या अंदाजात जवळपास १७ लाख टनांवर उत्पादन स्थिरावेल असे म्हटले आहे. पण यंदा उत्तर भारतातील महत्त्वाच्या खरीप ज्वारी उत्पादक राज्यांमध्ये सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाचा मोठा फटका बसला. त्यामुळे खरिपातील उत्पादन कमी राहण्याचा अंदाज आहे. देशात आता रब्बीचा पेरा सुरु आहे. आत्तापर्यंत १९.४४ लाख हेक्टरवर पेरा झाला. गेल्यावर्षी याच काळात एवढाच पेरा झाला होता. सध्या गेल्यावर्षीऐवढे क्षेत्र दिसत असले तरी पुढील काळात क्षेत्र कमी राहू शकते, असा अंदाज जाणकार व्यक्त करत आहेत. कारण गव्हाला सध्या चांगला दर आहे. त्यातच नोव्हेंबरमधील पावसाने ज्वारी पेरणीला यंदा उशीर होत आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.