MSP for Farmers : तूर, हरभऱ्याला हमीभावाचा आधार

Tur and Chana MSP : सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावात असताने तूर आणि हरभऱ्याने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती. साहजिकच शेतकऱ्यांना यंदाही त्याच तेजीची अपेक्षा आहे. मात्र नवी तूर बाजारात दाखल होताच तुरीचा बाजार पडला. हरभऱ्याने तर पेरणी संपत नाही तोच मान टाकली.
Tur and Chana
Tur and ChanaAgrowon
Published on
Updated on

Commodity Market Update : सोयाबीन आणि कापसाचे भाव दबावात असताने तूर आणि हरभऱ्याने शेतकऱ्यांना चांगली साथ दिली होती. साहजिकच शेतकऱ्यांना यंदाही त्याच तेजीची अपेक्षा आहे. मात्र नवी तूर बाजारात दाखल होताच तुरीचा बाजार पडला. हरभऱ्याने तर पेरणी संपत नाही तोच मान टाकली. बाजारातील या परिस्थितीमुळे खरंच तूर आणि हरभरा उत्पादकांनी यंदा चिंता करण्याची गरज आहे का, याची सर्व बाजूंनी चर्चा करणे आवश्यक आहे.

तुरीचे दर सध्या दबावात आहेत. मागील हंगामात तुरीला प्रति क्विंटल १२ हजार रुपयांचा भाव शेतकऱ्यांनी पाहिला. यंदाही त्यांना याच भावपातळीची अपेक्षा आहे. पण देशातील बाजारात जेव्हा तुरीचा पहिला लाॅट दाखल झाला तेव्हापासूनच तुरीमध्ये मंदी सुरू झाली. तुरीचा भाव तब्बल २५०० रुपयांनी तुटला. तुरीचा भाव तुटण्यामागे प्रामुख्याने वाढलेल्या क्षेत्रासह नव्या हंगामाची सुरुवात, हेच कारण सांगता येईल. तुरीच्या भावात गेल्या दोन हंगामांपासून तेजी आहे. यंदाही लागवडीच्या काळात तुरीचा भाव तेजीत होता. त्यातच यंदा पाऊसमानही साथ देणारे होते. सहाजिकच यंदा पेरा वाढला. गेल्या हंगामात जवळपास ४१ लाख हेक्टरवर असणारे तुरीचे पीक यंदा ४६ लाख हेक्टरपर्यंत विस्तारले. थोडक्यात, लागवडीत १४ टक्क्यांची वाढ झाली.

चालू हंगामात आतापर्यंत तरी अपवाद वगळता तुरीसाठी पोषक हवामान राहिले. त्यामुळे वाढलेल्या लागवडीसह उत्पादन वाढीचीही शक्यता आहे. सरकारच्या अंदाजानुसार मागील हंगामात देशात जवळपास ३४ लाख टन तूर उत्पादन झाले होते. यंदा ३५ लाख टन उत्पादन होण्याचा प्राथमिक अंदाज सरकारने व्यक्त केला आहे. मागील हंगामात उद्योग आणि व्यापारी सरकारच्या अंदाजाशी सहमत नव्हते.

त्यांचा अंदाज सरकारच्या अंदाजापेक्षा कमी होता. तेव्हा ३० लाख टनांवर उत्पादन स्थिरावल्याची चर्चा बाजारात होती. तुरीच्या भावावरून या चर्चेला जोर मिळाला होता. यंदा मात्र काहीसं उलट चित्र दिसत आहे. सरकारच्या प्राथमिक अंजापेक्षा प्रत्यक्ष उत्पादन जास्त राहील, असा खासगी क्षेत्राचा अंदाज आहे. कारण लागवड १४ टक्क्यांनी जास्त आहे. त्यामुळे उत्पादनातील वाढ केवळ एक लाख टनांची नसेल तर त्यापेक्षा जास्त राहील, अशी चर्चा बाजारात आहे.

Tur and Chana
Tur Rate : तूर दर आठवड्यात २००० रुपयांनी घसरले

त्यामुळे हंगाम सुरू होताच बाजारात मोठी पडझड दिसली. पोषक हवामान आणि १४ टक्क्यांनी वाढलेली लागवड यामुळे उत्पादन किमान १० ते १५ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज सध्या बाजारात व्यक्त केला जात आहे. म्हणजेच हा अंदाज खरा ठरला तर उत्पादन ३८ ते ४० लाख टनांच्या दरम्यान राहील, असा त्याचा अर्थ होतो.

बाजाराची दिशा आणि विक्री नियोजन

सध्या तुरीचा भाव अनेक बाजारात प्रति क्विंटल ७ हजार रुपयांपर्यंत कमी झाला. पण सध्या बाजारात येणाऱ्या नव्या तुरीमध्ये ओलावा अधिक आहे. तसेच जो जुना माला बाजारात येत आहे, त्यातही बहुतांशी माल कमी गुणवत्तेचा आहे. तो माल या भावपातळीवर विकला जात आहे. चांगल्या गुणवत्तेचा माल आजही ७ हजार ५०० ते ८ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे.

तसेच तुरीची आता कुठे आवक सुरू होत आहे. तुरीच्या आवकेचा दबाव फेब्रुवारीच्या मध्यापासून वाढायला सुरुवात होईल. त्या वेळी साहजिकच तुरीचा भाव हमीभावापेक्षा कमी होण्याची शक्यता आहे. मात्र ही भावपातळी जास्त दिवस राहणार नाही. कारण सरकारही यंदा मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करेल. सरकारकडे तुरीचा शिल्लक साठा उपलब्ध नाही.

केंद्र सरकारने यंदा तुरीसाठी ७ हजार ५५० रुपये हमीभाव जाहीर केला. त्यामुळे आवकेचा दबाव वाढला तरी बाजाराला हमीभावाचा म्हणजेच ७ हजार ५५० रुपयांचा आधार राहील. परिणामी, फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात तुरीचा बाजारात ७ हजार ५०० ते ८ हजारांच्या दरम्यान राहू शकतो. मार्चनंतर तुरीच्या भावात सुधारणा दिसू शकते.

तसेच बाजारातील तुरीची आवक कमी झाल्यानंतर बाजार ८ हजार ५०० रुपयांकडे वाटचाल करू शकते. ऑफ सीझनमध्ये तूर ९ हजारांचाही पातळी गाठू शकते. तुरीमध्ये स्टाॅकिस्ट सक्रिय झाल्यानंतर मात्र ९ हजार ५०० रुपयांचीही पातळी दिसू शकते. पण त्यासाठी कदाचित ऑगस्टपर्यंत वाट पाहवी लागू शकते, असा अंदाज अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

Tur and Chana
Chana Wheat Sowing : रब्बीत हरभरा, गहू, भात लागवडीला शेतकऱ्यांची पसंती; एकूण कडधान्याची पेरणी पडली पिछाडीवर 

सरकार तुरीची आयातही वाढविण्याचा प्रयत्न करणार आहे. पण तुरीची आयात वाढविण्यावर मर्यादा आहेत. मागील हंगामात तुरीची टंचाई मोठ्या प्रमाणात असतानाही आपण साडेआठ लाख टनांच्या आसपास आयात करू शकलो. यंदाही आयातीचे प्रमाण तेवढेच राहण्याची शक्यता आहे. त्यामुळेच यंदाही तुरीच्या बाजाराला चांगला आधार आहे. मात्र गेल्या वर्षीएवढी तेजी येईल, अशी परिस्थिती बाजारात सध्या तरी दिसत नाही. मात्र सरकारच्या धोरणात बदल झाल्यास त्याचा निश्‍चित बाजारावर परिणाम दिसू शकतो.

हरभरा बाजार आणि पेरणी

गेल्या काही महिन्यांत हरभऱ्याच्या भावातही मोठी तेजी अनुभवायला मिळाली. पण आता हरभऱ्याच्या भावातही मोठी नरमाई आली. बाजारात हरभरा प्रति क्विंटल ७ हजार ८०० रुपयांच्या आसपास विकला जात होता. मात्र सध्या बाजारात हरभरा ५ हजार ५०० ते ६ हजारांच्या दरम्यान विकला जात आहे. हरभरा बाजारावर पिवळ्या वाटाण्याची आयात आणि रब्बीतील पेरा तसेच पोषक हवामानाचा परिणाम दिसत आहे. पिवळा वाटाणा हरभऱ्याला मोठ्या प्रमाणात पर्याय म्हणून वापरला जातो.

मागील १० महिन्यांमध्ये वाटाणा आयात विक्रमी २४ लाख टनांवर पोहोचली. तसेच रब्बी हंगामात सुरुवातीच्या टप्प्यात हरभरा लागवड आघाडीवर होती. एकेकाळी लागवड ८ टक्क्यांनी जास्त दिसत होती. पण जसजशी पेरणी पुढे सरकत गेली, तसे पेरणीतील आघाडी कमी होत गेली. सरकारकडून नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीत हरभरा पेरणी आता गेल्या वर्षीपेक्षा केवळ २ टक्क्यांनी जास्त आहे. देशात ८६ लाख हेक्टर क्षेत्र हरभऱ्याखाली आहे. त्यामुळे हरभरा पेरणीत मोठ्या वाढीची अपेक्षा फोल ठरण्याची शक्यता आहे.

उत्पादनाचे अंदाज

गेल्या तीन वर्षांपासून हरभरा पिकाला उष्णता आणि अवकाळी पावसाचाही फटका बसत आहे. यंदाही तापमान सरासरीपेक्षा जास्त राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिलेला आहे. त्याचा हरभरा उत्पादकतेवर काही प्रमाणात परिणाम होईल. पण यंदा एकंदर पोषक हवामान असल्याने गेल्या वर्षीपेक्षा उत्पादन अधिक राहील, असे संकेत सध्यातरी मिळत आहेत. मात्र रब्बी पेरण्यांच्या सुरुवातीच्या काळातील पेरण्यांचे मोठ्या प्रमाणात क्षेत्र वाढीचे कल प्रत्यक्षात राहिले नाहीत. या कलांमुळेच हरभऱ्यातील तेजी कमी होण्याला मदत झाली होती. थोडक्यात तर यंदा विक्रमी उत्पादनाचाही सुरुवातीचा अंदाज चुकण्याचीच शक्यता जास्त आहे.

सरकारची भूमिका

केंद्र सरकारकडे मागील काही वर्षांपासून हरभऱ्याचा मोठा शिल्लक साठा होता. मागील वर्षी जेव्हा नवा हंगाम सुरू झाला तेव्हा सरकारकडे तब्बल २५ लाख टन हरभरा होता. तरीही सरकारने खेरदी केली. मात्र सरकारला हरभऱ्यातील तेजी रोखता आली नाही. आता तर सरकारकडे यंदा ८ लाख टनाच्या दरम्यानच शिल्लक साठा असल्याची चर्चा आहे.

काही जणांच्या मते साठा यापेक्षाही कमी आहे. त्यामुळे सरकारला हरभऱ्याचा संरक्षित साठा (बफर स्टाॅक) करण्यासाठी खरेदी वाढवावीच लागेल. अन्यथा, देशात कडधान्य उत्पादन घटीमुळे बाजारात येणारी तेजी सरकारला रोखता येणार नाही. सरकारने आतापर्यंत तेजी रोखण्यासाठी हरभऱ्याचा हत्यार म्हणून वापर केलेला आहे. यंदाही सरकार तोच कित्ता गिरवण्याची शक्यता आहे.

बाजारातील कल

सरकारने यंदा हरभऱ्याला प्रति क्विंटल ५ हजार ६५० रुपये हमीभाव जाहीर केला. सरकार खरेदीही यंदा चांगली करेल. त्यामुळे हरभरा बाजाराला हमीभावाचा आधार असेल. पण आवकेचा दबाव वाढल्यानंतर बाजारात हरभऱ्याचे भाव हमीभावापेक्षा कमी होऊ शकतात. भावपातळी ५ हजार ३०० रुपयांपर्यंत येऊ शकते. पण सरकारच्या खरेदीमुळे बाजाराला आधार राहील. तसेच मालातील ओलावा कमी झाल्यानंतर खुल्या बाजारातील दरही हमीभावाच्या दरम्यान येऊ शकतात. तसेच आवकेचा दबाव कमी झाल्यानंतर दरपातळी ६ हजारांच्या दरम्यान पोहोचू शकते, असा अंदाज सध्याच्या परिस्थितीवरून अभ्यासकांनी व्यक्त केला आहे.

सावध विक्री आवश्यक

यंदा तुरीला आणि हरभऱ्याला हमीभावाचा आधार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दरात विक्री टाळावी. गरज असेल तर सुरुवातीलाच हमीभावाने विक्रीसाठी नोंदणी करावी. तसेच बाजाराचे अंदाज लक्षात घेऊन टप्प्याटप्प्याने विक्री करावी. बाजारातील बदलती परिस्थिती, सरकारचे धोरण याकडेही लक्ष असू द्यावे. या घटकांचा बाजारावर परिणाम होत असतो. पण बाजारात यंदा भाव हमीभावापेक्षा जास्त काळ कमी राहणार नाहीत. शिवाय गेल्या वर्षीएवढी तेजीही यंदा दिसत नाही. हे लक्षात घेऊन चांगल्या भावाने विक्रीचे नियोजन करणे सयुक्तिक ठरेल.

(लेखक ॲग्रोवन डिजिटलमध्ये मल्टिमडिया प्रोड्यूसर-मार्केट इन्टेलिजन्स आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com