
Amravati News : एप्रिल महिन्यात तुरीचे दर चांगलीच उसळी घेत १२ हजारांवर पोहोचले होते. त्यानंतर डिसेंबरपर्यंत दरातील तेजी टिकून होती. आता शेतकऱ्यांची तूर बाजारात येण्यास अवघे काही आठवडे शिल्लक असताना दर दबावात आले आहेत. एकाच आठवड्यात दरात २००० रुपयांपर्यंतची घट नोंदविण्यात आली आहे. अमरावती बाजार समितीत तर तुरीचे दर ६६५० ते ६९०० रुपयांवर स्थिरावले असून, हमीभावापेक्षा कमी दराने येथे तूर विकल्या जात असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.
नागपूरच्या कळमना तसेच अमरावती बाजारासह राज्यात सर्वदूर एप्रिल महिन्यात तुरीचे दर १२ हजारांच्या पुढे गेले होते. १२५०० रुपयांचा दरही तुरीला या काळात मिळाला. त्यानंतर तुरीचे दर ११५०० ते १०५०० रुपयांवर स्थिर होते. तुरीचा सरासरी दर १०७४३ रुपयांपर्यंत मिळाला. तुरीची आवक देखील या काळात २०५० क्विंटलपेक्षा अधिक होती. जून महिन्यात आवक कमी होत ३२४ क्विंटलपर्यंत राहिली.
त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने आवक कमी होत ती १८० क्विंटलवर आली. तरीसुद्धा दर ९३०० ते १०३४१ इतका होता. आता नव्या हंगामातील तुरीची मुबलक आवक होण्यास काही आठवड्याचा कालावधी उरला आहे. त्यामुळेच बाजारात दर दबावात आल्याचे सांगितले जाते. अमरावती बाजार समितीत सद्यःस्थितीत नव्या हंगामातील तुरीची काही प्रमाणात आवक सुरू झाली आहे.
ही आवक १५ ते २० क्विंटल इतकी अत्यल्प आहे. नव्या हंगामातील तुरीमध्ये ओलाव्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे नव्या तुरीसह जुन्या तुरीला देखील सरसकट एकच दर दिला जात आहे. अमरावती बाजार समितीचा विचार करता गुरुवारी (ता. २५) बाजारात १३४ क्विंटल इतकी आवक नोंदविण्यात आली. या तुरीला ६६५० ते ६९०० रुपयांचा दर मिळाला.
हमीभावापेक्षाही कमी दर
सोयाबीनचा हमी दर ५८९२ रुपये आहे. परंतु संपूर्ण हंगामात सोयाबीनचे दर ३९०० ते ४१४१ रुपयांच्या पुढे गेले नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अपेक्षा तुरीकडून होत्या. त्यातच तुरीचा हमीदर ७५५० रुपयांचा असताना बाजारात हमीदरापेक्षा अधिक भावाने तुरीची खरेदी होत होती.
तुरीच्या लागवड क्षेत्रात वाढ
राज्यात तुरीखाली सरासरी क्षेत्र १२ लाख ९५ हजार ५१६ हेक्टर इतके आहे. यंदाच्या खरिपात १२ लाख २३ हजार २५ हेक्टरवर तुरीची लागवड होती. गेल्या काही वर्षांतील सरासरीपेक्षा या वर्षी क्षेत्रात वाढ नोंदविली गेली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.