
पुणे ः दुधाऐवजी भलत्याच पदार्थांचा वापर करून बनावट पनीर (Fake Paneer) तयार केले जात असल्याने डेअरी उद्योग (Dairy Industry) चिंतेत आहे. बनावट पनीर उत्पादकांवर अन्न व औषध प्रशासनाकडून (Food And Drug Department) होत असलेल्या कारवाईला दुग्ध क्षेत्रातून (Dairy Sector) पाठिंबा दिला जात आहे.
‘डेअरी अॅनॉलॉग’च्या नावाखाली दुधाऐवजी व्हेज फॅट आणि एसएमपी (स्किम्ड् मिल्क पावडर) यापासून सर्रास पनीरसदृश पदार्थ बनवला जात आहे. हा पदार्थ पनीर नसल्याचे नामांकित डेअरीचालकांचे म्हणणे आहे. मात्र पनीरसदृश्य पदार्थाचे उत्पादन व विक्री झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे गुणवत्तापूर्ण दुधाच्या अस्सल पनीरसमोर स्पर्धा तयार झाली आहे. त्यामुळे बिगर दुधाच्या पदार्थांपासून तयार केलेले पनीर कायदेशीर आहे की नाही, अशी जोरदार चर्चा सध्या डेअरी उद्योगात सुरू आहे.
“देशभर ही समस्या असून ‘अमूल’ने सर्वप्रथम या प्रश्नाकडे केंद्र शासनाचे लक्ष वेधले. ‘अमूल’ प्रशासनाने पनीरचा मुद्दा ‘एफएसएसआय’च्या (अन्न संस्था मानके प्राधिकरण) निदर्शनास आणला. दुधापासून तयार न केलेल्या पनीरसदृश पदार्थांसाठी स्वतंत्र नियमावली तयार करावी. तसेच या पदार्थाचे वेष्टणदेखील वेगळ्या पध्दतीचे ठेवण्याची सक्ती करावी लागेल.
केवळ पनीरच नव्हे; तर चीज, तूप, लोणी तसेच उपपदार्थदेखील बिगर दुधाच्या सामग्रीपासून तयार केले जात आहेत. त्यामुळे ग्राहकांना अस्सल दुधापासून आणि बिगर दुधापासून तयार केलेले दुग्धजन्य पदार्थ ओळखू येण्यासाठी कठोर नियमावली तयार केली पाहिजे,” अशी मागणी एका खासगी डेअरीच्या व्यवस्थापकाने केली.
चितळे डेअरी उद्योग समूहाचे संचालक श्रीपाद चितळे म्हणाले, ‘‘कोणत्याही उपाहारगृहात किंवा तारांकित हॉटेलचालकांनी ब्रॅंडेड पनीरचीच विक्री करायला हवी. अन्न सुरक्षेविषयक कायदेशीर बाबी विचारात घेत ब्रॅंडेड पनीर तयार केले जाते. मात्र सुटे पनीर तयार करताना हमी देता येत नाही. त्यात भेसळ असू शकते. त्यामुळे ग्राहकांनी देखील ब्रॅंडेड पनीरचा आग्रह धरायला हवा.’’
डेअरी उद्योगातील सूत्रांच्या म्हणण्यानुसार, पनीरची निर्मिती केवळ डेअरी फॅट्सपासूनच तयार करणे बंधनकारक आहे. बिगर डेअरी फॅट्सचा वापर केल्यास ती भेसळ समजली जाते. मात्र अन्न व औषध प्रशासनाकडून या प्रकरणी सातत्याने कारवाई केली जात नाही. कारवाई झालीच तर न्यायालयीन लढाईकडे लक्ष दिले जात नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे दावे पडून राहतात. त्याचा फायदा पनीरमधील भेसळखोरांची लॉबी घेत आहे.
मुंबईतील भेसळीचे लोण पुण्यात
पनीर भेसळीचे मुख्य केंद्र मुंबई समजले जाते. चार वर्षांपूर्वी मुंबईतून बनावट पनीरचे साठे जप्त केले गेले होते. मात्र, त्याचे लोण आता पुण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी पुण्याच्या हवेली तालुक्यातील मांजरी खुर्द येथील आर. एस. डेअरीवर अन्न व औषध प्रशासनाने धाड घातली होती. त्यात ९०० किलो बनावट पनीर आढळले. नकली पनीर तयार करण्यासाठी वापरली जाणारी पावडर व तेलदेखील या छाप्यात जप्त करण्यात आले. तसेच पुण्याच्या वानवडी भागातील ‘टिपटॉप डेअरी प्रॉडक्ट्स’वर छापा टाकून पुन्हा ८०० किलो बनावट पनीर जप्त केले गेले. या घटनांमुळे डेअरी क्षेत्रातील दर्जेदार उद्योगांची झोप उडाली आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.