Nagpur News : सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर घरगुती तसेच हॉटेल व्यावसायिकांची वाढती मागणी त्यासोबतच प्रक्रिया उद्योजकांच्या निकडीमुळे सध्या हरभरा दरात चांगली तेजी अनुभवली जात आहे. त्यामुळेच गेल्या महिन्याच्या तुलनेत सद्यःस्थितीत हरभऱ्यात ३०० ते ५०० रुपये क्विंटलची सुधारणा नोंदविण्यात आली आहे. दरम्यान बाजार विश्लेषकांनी साठा संपण्याच्या शक्यतेने ही तेजी आल्याचे सांगितले.
विदर्भातील सर्वच बाजार समित्यांमध्ये हरभऱ्यात तेजी अनुभवली जात आहे. जुलैच्या सुरुवातीला कळमना बाजार समितीत गावरान हरभऱ्याचे दर ५००० ते ६३५० रुपये होते. त्यानंतर टप्याटप्याने या दरात वाढ नोंदविण्यात आली. ६३५२ रुपयांवर हा दर पोचला होता. जुलै अखेर मात्र हरभरा दरात मोठी तेजी येईल, असे संकेत मिळत होते.
या वेळी दरात सुधारणा होत ६००० ते ६७२५ रुपयांवर दर पोचले. ३० जुलै रोजी ५९०० ते ६५४० असा दर होता. गुरुवारी (ता. १) मात्र हे दर ६००० ते ६७३४ रुपयांवर गेले. बुधवारी (ता. ७) दरांनी उसळी घेत ६१११ ते ६९३२ रुपयांनी हरभऱ्याचे व्यवहार झाले. अमरावती बाजार समितीत गावरान हरभऱ्याचे दर ६८०० ते ७०४० रुपयांवर पोचले.
सर्वाधीक तेजी अमरावती बाजार समितीत नोंदविण्यात आली. या ठिकाणी ६०७ क्विंटल हरभरा आवक झाली. दरातील ही तेजी कायम राहिल्यास आवक देखील वाढेल, अशी शक्यता व्यापारीस्तरावर वर्तविण्यात आली आहे. जॅकी हरभऱ्याचे दर ६७०० ते ६९८० रुपयांवर होते. या हरभऱ्याची आवक मात्र झाली नाही, असेही सांगण्यात आले.
यवतमाळ बाजार समितीचा विचार करता या ठिकाणी ६३०५ ते ६४८० रुपयांनी हरभऱ्याचे व्यवहार होत आहेत. शेगाव (बुलडाणा) बाजार समितीत हरभरा आवक अवघी दहा क्विंटलची होत आहे. ६००० ते ६६५० रुपयांनी येथे हरभरा खरेदी होत आहे. विदर्भातील भुसार मालासाठी महत्त्वाची बाजार समिती असलेल्या कारंजा (वाशीम) बाजार समितीत देखील हरभरा दर तेजीत असल्याचे चित्र आहे.
या ठिकाणी हरभरा आवक अवघी १८५ क्विंटलची असून दर ६४४५ ते ७११० रुपयांवर होता. कांरजा बाजार समितीत हरभऱ्याचे सरासरी दर ६९५० रुपयांवर होते. चांदूरबाजार (अमरावती) बाजाराचा विचार करता या ठिकाणी हरभरा आवक नियमित आहे. त्याला सरासरी ५४०० ते ७१०० रुपयांचा दर मिळत असल्याचे व्यापारी सूत्रांनी सांगितले.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.