Jalgaon News : खानदेशात मोठ्या काबुली हरभऱ्याचे उत्पादन यंदा बऱ्यापैकी आले आहे. उत्पादन एकरी सहा ते सात क्विंटल हाती आले होते. दर यंदा कमी अधिक झाले. सध्या आवक अल्प असून, किमान दर १० हजार रुपये प्रतिक्विंटलपेक्षा अधिक आहेत.
मोठ्या काबुली (डॉलर किंवा मॅक्सिकन) हरभऱ्याची पेरणी जळगाव जिल्ह्यात अधिक म्हणजेच पाच हजार हेक्टरवर केली जाते. ही पेरणी चोपडा, यावल, रावेर भागात अधिक असते. उत्पादन यंदा बऱ्यापैकी हाती आले. अन्य हरभऱ्याच्या तुलनेत काबुलीची मळणी उशिरा म्हणजेच मार्चमध्ये सुरू झाली.
एकरी सहा ते सात क्विंटल उत्पादन मिळाले. या हरभऱ्याचे २०१९ मध्ये सर्वाधिक एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन मिळाले होते. मध्यंतरीदेखील उत्पादन एकरी कमाल आठ क्विंटल राहिले. यंदा मात्र उत्पादन कमी आले होते. याचे कारण म्हणजे थंडीचे दिवस कमी व ढगाळ वातावरण अधिक होते.
नोव्हेंबर, डिसेंबर व जानेवारी या तीन्ही महिन्यांत एकही दिवस सलग दोन दिवस किमान तापमान पाच अंश सेल्सिअसखाली गेले नाही. तसेच या तीनही महिन्यांमध्ये पाऊस आला. १५ ते २० दिवस ढगाळ वातावरण असायचे. हरभरा पिकाला सलग थंडी हवी असते. परंतु प्रतिकूल वातावरण राहिले.
मध्यम जमिनीत काबुली हरभरा पीक अधिक असते. त्याची पेरणी चोपड्यातील अनेर व तापी नदीकाठी अधिक केली जाते. या भागात सिंचन अनेकदा करावे लागते. काबुली हरभऱ्याचे दर एप्रिल ते मे अखेरिस कमी अधिक झाले. परंतु जूनच्या मध्यापासून दर टिकून आहेत.
सध्या काही शेतकऱ्यांना ११५०० रुपये प्रतिक्विंटलचा दरही मिळत आहे. गेल्या वर्षी प्रतिक्विंटल आठ ते नऊ हजार रुपये व सरासरी साडेआठ हजार रुपये दर होता. पण यंदा दर बरे राहिले. जूननंतर दरवाढ होईल, अशी अपेक्षा उत्पादकांना होती.
कारण काबुली हरभरा पीक यंदा अधिक क्षेत्रात होते. यामुळे एप्रिल ते मे अखेरपर्यंत अनेकांनी विक्री टाळली. परंतु फारसा साठा या हरभऱ्याचा शेतकऱ्यांकडे नाही. या हरभऱ्यासाठी जळगाव जिल्ह्यात चोपडा, अमळनेर, धुळ्यातील शिरपूर येथील बाजार प्रसिद्ध आहे.
मध्य प्रदेश, गुजरातमधून मागणी
सध्या धुळ्यातील शिरपूर, जळगावातील चोपडा, अमळनेर, नंदुरबारातील नंदुरबार येथील बाजारात प्रतिदिन सरासरी ३०० क्विंटल काबुली हरभऱ्याची आवक होत आहे. त्यास मध्य प्रदेशातील इंदूर, गुजरातमधील बडोदा, सुरत, अहमदाबाद येथून मागणी आहे. तेथील मोठे खरेदीदार शिरपूर, चोपडा येथील बाजारात संपर्क साधून या हरभऱ्याचा पुरवठा करून घेत असून, थेट खरेदी काही खरेदीदार करून घेत आहेत, अशी माहिती मिळाली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.