
Pune News: राज्यात नाफेड आणि एनसीसीएफकडे हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी राज्यात ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. त्यापैकी आतापर्यंत ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी करण्यात आली. तर आजही ४ लाख शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी संदेशाची वाट पाहत आहेत. तर खरेदीची मुदत ३१ जानेवारीला संपत असल्याने पुन्हा शेतकरी चिंतेत आहेत.
राज्यात हमीभावाने सोयाबीन खेरदीसाठी १ ऑक्टोबरपासून नोंदणीला सुरु झाली होती. आधी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत होती. नंतर मुदतवाढ देऊन ६ जानेवारीपर्यंत करण्यात आली. राज्यातील तब्बल ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांनी हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी केली. त्यापैकी नाफेडकडे तब्बल ५ लाख ७४ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली. तर एनसीसीएफकडे १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती. खुल्या बाजारात भाव कमी असल्याने शेतकऱ्यांनी यंदा हमीभाव खरेदीला चांगला प्रतिसाद दिला होता.
नाफेड आणि एनसीसीएफ या दोन्ही संस्थांकडे नोंदणी झालेल्या एकूण ७ लाख ६४ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी केले. नाफेडने आपल्याकडे नोंदणी झालेल्या ५ लाख ७४ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ २ लाख ४६ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची आतापर्यंत खेरदी केली. म्हणजेच नाफेडकडे नोंदणी केलेल्या ३ लाख ३३ हजार शेतकऱ्यांना सोयाबीन खेरदीची प्रतिक्षा आहे. तर एनसीसीएफने आपल्याकडे नोंदणी झालेल्या १ लाख ८५ हजार शेतकऱ्यांपैकी केवळ १ लाख ११ हजार शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी केली. एनसीसीएफकडे नोंदणी केलेले ७४ हजार शेतकरी खरेदीची वाट पाहत आहेत.
राज्यात एकूण नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी निम्म्या शेतकऱ्यांचेही सोयाबीन मागील १०० दिवसांमध्ये खरेदी होऊ शकले नाही. केवळ ३ लाख ६० हजार शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी झाले. आता उरलेल्या पाच दिवसांमध्ये ४ लाख शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी होईल का ? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. त्यातही मुदतवाढ मिळाल्यानंतर मागील १० दिवसांमध्ये खेरदीची गती काहीशी वाढली आहे. त्यामुळे प्रतिक्षेत असलेल्या शेतकऱ्यांची संख्या कमी झाली.
मुदतवाढीची गरज
राज्यात आजही ४ लाख शेतकरी सोयाबीन विक्रीसाठी वाट पाहत आहेत. घरात सोयाबीन ठेऊन शेतकरी नाफेडच्या संदेशाची वाट पाहत आहेत. पण उरलेल्या दिवसांमध्ये या शेतकऱ्यांचे सोयाबीन खेरदी होण्याची शक्यताच नाही. त्यामुळे सरकारने सोयाबीन खरेदीसाठी पुन्हा मुदतवाढ द्यावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.