
केंद्र सरकारने यंदा किमान आधारभूत किंमतीने केलेल्या तांदूळ आणि गहू खरेदीमुळे (Paddy Wheat Procurement) सुमारे 2.1 लाख कोटी रूपये शेतकऱ्यांना मिळाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत गहू खरेदी (Wheat Procurement) मात्र घटली आहे.
केंद्राने 30 ऑगस्ट अखेरपर्यंत किमान आधारभूत किंमतीने 881.30 लाख टन तांदळाची खरेदी (Rice Procurement) केली आहे. त्यात खरीप हंगामातील 759.32 लाख टन तर रब्बी हंगामातील 121.98 लाख टन तांदळाचा समावेश आहे. या सरकारी खरेदीतून 130.65 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना फायदा झाला. सरकारने तांदूळ खरेदीपोटी 1 लाख 72 हजार 734 कोटी रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित केले आहेत.
आता गहू खरेदी विषयी बोलायचं झालं तर, सरकारने 2022-23 च्या रब्बी विपणन हंगामात 187.92 लाख टन गव्हाची खरेदी केली आहे. एकूण 17.83 लाख शेतकऱ्यांना याचा फायदा झाला. या गहू खरेदीपोटी सरकारने किमान आधारभूत किंमतीने 37 हजार 866 कोटी रुपये शेतकऱ्यांना हस्तांतरित केले आहेत. तांदूळ आणि गहू यांच्या खरेदीचे एकत्रित मूल्य 2.1 लाख कोटी रूपयांच्या आसपास आहे.
मागच्या वर्षी गव्हाची जी एकूण खरेदी होती त्या तुलनेत यावर्षी सरकारी खरेदीत घट झाल्याचं दिसून आलं. याच मुख्य कारण होतं गव्हाला खुल्या बाजारात मिळणारा दर. आंतरराष्ट्रीय स्तरावर उदभवलेल्या परिस्थितीमुळे गव्हाचे दर गगनाला भिडलेत. त्यामुळे देशातील प्रमुख बाजारपेठांमधील व्यापाऱ्यांकडून प्रति क्विंटल 2,300 ते 2,400 रुपये दराने शेतकऱ्यांकडचा गहू उचलला जातोय. गव्हाची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल 2,015 रुपयेआहे.
नुकत्याच पार पडलेल्या संसदेच्या अधिवेशनादरम्यान केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांना सरकारी गहू खरेदीविषयी प्रश्न विचारण्यात आले. खासगी व्यापाऱ्यांनी थेट शेतकऱ्यांकडून गहू खरेदी केल्याने सरकारी गहू खरेदीत घट झाली का? या प्रश्नावर केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनीही होकारार्थी उत्तर दिलं. ते उत्तरादाखल म्हणाले की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर ओढवलेल्या परिस्थितीमुळे गहू महागला. त्यामुळे व्यापाऱ्यांनी गहू मोठ्या प्रमाणावर खरेदी केला." "शिवाय जर शेतकऱ्याला एमएसपीच्या तुलनेत चांगली किंमत मिळात असेल तर ते त्यांचा माल खुल्या बाजारात विकू शकतात." असं ही ते म्हणाले.
दरम्यान केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने 17 ऑगस्ट रोजी प्रमुख कृषी पीक उत्पादनांचा चौथा आगाऊ अंदाज जाहीर केला. या अंदाजानुसार, 2021-22 च्या हंगामात भारतात 315.72 दशलक्ष टन इतक्या विक्रमी अन्नधान्य उत्पादनाची अपेक्षा आहे. या उत्पादनाची तुलना गेल्या वर्षीच्या एकूण अन्नधान्य उत्पादनाशी करता 2020-21 च्या हंगामात 4.98 दशलक्ष टन जास्तीचं उत्पादन होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
या पिकांमध्ये भात, मका, हरभरा, कडधान्ये, आणि मोहरी, तेलबिया आणि उसाचं विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. यावर्षी गव्हाचं उत्पादन 106.84 दशलक्ष टन होण्याचा अंदाज आहे. गव्हाचं पाच वर्षांचं सरासरी उत्पादन पाहिलं असता ते 103.88 दशलक्ष टन इतकं होतं. या उत्पादनापेक्षा यावर्षीचं उत्पादन 2.96 दशलक्ष टनांनी जास्त आहे. दरम्यान खरिपातील प्रमुख पीक असलेल्या तांदळाचं एकरी उत्पादन घटलं आहे. मागील हंगामात 343.7 लाख हेक्टर क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली होती. मात्र यावर्षी यात 8 टक्क्यांनी घट झाली आहे.
भाताची लागवड सहसा जून ते जुलै दरम्यान होते. मात्र रखडलेला मॉन्सून आणि जुलैमध्ये देशाच्या बहुतेक भागात पावसाचं असमान वितरण यामुळे भाताच्या लागवडक्षेत्रात घट झाल्याचं दिसून आलं. या खरीपाच्या हंगामात भात लागवडी खालील क्षेत्रात घट झाल्याने अन्नधान्याचे उत्पादन कमी होऊ शकते अशी चिंता व्यक्त केली जात होती. मात्र एकूणच खरिपाच्या पेरण्या चांगल्या झाल्या आहेत.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.