
डॉ. आर. के. साठे, डॉ. एस के. फाजगे, प्रा. डी. एस. बनकर
शेतीत नुकसानकारक ठरणाऱ्या घटकांमध्ये कीटक व रोगांनंतर तण हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. विविध पिकांच्या सुरुवातीच्या वाढीचा कालावधी पीक तण स्पर्धेच्या दृष्टीने संवेदनक्षम असतो. या कालावधीत तण नियंत्रण न केल्यास उत्पादनात लक्षणीय घट होते. तण नियंत्रणासाठी एकाच पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक पद्धतीचा वापरातून प्रभावीपणे तण नियंत्रण करता येते.
सध्या शेतीमध्ये काम करण्यासाठी मजूरबळ उपलब्ध नसल्याचा सर्वाधिक फटका तण नियंत्रणास बसत आहे. हे कमी होत चाललेले मजूर बळ, त्यांची वाढती मजुरी, अनियमित पाऊसकाळ, त्यामुळे लागवडीला उशीर होऊन आंतरमशागतीस मिळणारा कमी वेळ यांसारख्या अनेक कारणांमुळे वेळेवर तणनियंत्रण करणे अलीकडे अशक्य होत चालले आहे.
त्यातच हंगामी तणांसोबत वाढणारी बहुवार्षिक तणे (उदा. हराळी, कुंदा, नागरमोथा इ.) हे काम अधिकच अवघड करत आहेत. बहुवार्षिक तणांच्या नियंत्रणासाठी एका पद्धतीवर अवलंबून राहण्यापेक्षा एकात्मिक तण नियंत्रण व्यवस्थापन करणे अत्यंत गरजेचे ठरणार आहे.
उन्हाळी हंगामातील तणे
द्विदल तणे ः चंदन बटवा, चांदवेल, गाजर गवत, पाथर, पिसोळा, पिवळा धोत्रा, रानएरंडी इ.
एकदल तणे ः हराळी, कुंदा, नागरमोथा, शिप्पी, लोना, भरड, घोड कातरा इ.
एकात्मिक तण नियंत्रणासाठी वापरल्या जाणाऱ्या उपाययोजनांचे दोन प्रकार पडतात.
१) प्रतिबंधात्मक उपाय, २) निवारणात्मक उपाय.
प्रतिबंधात्मक उपाय म्हणजे शेतात तणांची उगवणच कमीत कमी होईल याकडे लक्ष देणे. त्याच प्रमाणे तणांच्या पुढील प्रसारास आळा कसा बसेल, याची खबरदारी घेणे होय.
पेरणीसाठी वापरावयाचे बियाणे तणविरहित असावे.
पाण्याचे पाट, शेतातील बांध किंवा धुरे, कंपोस्टचे खड्डे इ. जवळ तणे उगवू देऊ नयेत. तणे उगवल्यास ती फुलोऱ्यावर येण्यापूर्वी उपटून टाकावीत.
पूर्ण कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत शेतात वापरावे. म्हणजे त्या द्वारे येणाऱ्या तणांच्या बिया रोखल्या जातात.
पीक पेरणीपूर्वी उगवलेली तणे वखराने काढून टाकावीत.
सतत स्वच्छता मोहीम राबवावी.
शक्य असल्यास आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.
निवारणात्मक उपाय
अ) मशागतीय / पीक नियोजन पद्धत ः यामध्ये योग्य मशागत, वेळेवर व योग्य खोली व अंतरावर पेरणी करणे, खतांची योग्य मात्रा योग्य पद्धतीने देणे, हेक्टरी योग्य रोपांची संख्या राखणे, नेमके पाणी व्यवस्थापन व निचरा पद्धतीचा वापर करणे, आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे, कीड व रोग नियंत्रण यांचा समावेश होतो.
ब) कायिक/ यांत्रिक पद्धत ः यामध्ये मानवी, पशुधन किंवा यांत्रिक शक्तीद्वारे तणे शेतातून काढून टाकतात किंवा नष्ट करतात. उदा. यात पद्धतीमध्ये खुरपणी, कोळपणी यासोबतच खांदणी, तण उपटणे, छाटणी, जाळणे इ.चा समावेश होतो.
क) जैविक पद्धतीचा वापर ः यामध्ये तण नष्ट करणाऱ्या जैविक घटकांचा (उदा. कीटक, जिवाणू, बुरशी, वनस्पती इ.) वापर करून तण नियंत्रण केले जाते. उदा. गाजरगवताचे नियंत्रण मेक्सिकन भुंग्यांच्या प्रसारणातून करता येते. शेतामध्ये तरोटा, स्टायलो हेमाटा गवत पिके घेतल्यास तणांच्या वाढीवर नैसर्गिक नियंत्रण मिळू शकते.
ड) रासायनिक पद्धत ः यामध्ये तणांना समूळ नष्ट करणारी निवडक व बिननिवडक रासायनिक द्रव्यांचा (म्हणजेच तणनाशकांचा) वापर करून तणांचे प्रभावी नियंत्रण करता येते. अलीकडे मजुरांच्या अभावामुळे शेतकरी या पर्यायाचा अधिक वापर करतात. मात्र त्यातून पर्यावरणातील अनेक सूक्ष्मजीव, वनस्पती
यांची जैवविविधता नष्ट होण्याचा धोका असतो. या पर्यायाचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करण्याची गरज असते.
तणनाशके वापरताना घ्यावयाची दक्षता
विविध पिकांसाठी शिफारशीत तणनाशकांचा वापर शिफारशीत मात्रेतच अचूकपणे करावा.
मुदत संपलेली तणनाशके वापरू नयेत. तणनाशके खरेदी करताना मुदत तपासून घ्यावी.
तणनाशकांच्या फवारणीसाठी स्वतंत्र व पाठीवरचा नॅपसॅक पंप वापरावा.
तणनाशके फवारताना जमीन ढेकळेरहित, भुसभुशीत असावी. जमिनीमध्ये ओल असावी.
तणनाशके फवारताना जोराचे वारे नसावे. त्याच प्रमाणे तणनाशक फवारल्यानंतर दोन-तीन तास स्वच्छ सूर्यप्रकाश राहील आणि पाऊस येण्याची शक्यता नसतानाच फवारावीत.
जमिनीवर फवारणी करताना फवारणी करणाऱ्या व्यक्तीने मागे मागे चालत जावे. त्यामुळे तणनाशके फवारलेल्या जमिनीवर पावले पडून त्यांचा प्रभाव कमी होणार नाही.
ग्लायफोसेट (४१ एस. एल.) सारखे बिननिवडक तणनाशक फवारल्यानंतर कमीत कमी २१ दिवस शेतात कोणतीही मशागत करू नये.
तणनाशकांची फवारणी सर्वत्र समान दाबाखाली करावी. फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावेत.
उभ्या पिकांमध्ये फवारणी करताना फवारणीचे तुषार त्या किंवा इतर पिकांवर जाणार नाही, याची काळजी घ्यावी. त्यासाठी हूडचा वापर करावा.
तणनाशकांचा शिफारशीनुसार वापर करावा. त्याच्या वारंवार वापराचा मोह व अतिरेक टाळावा.
तणनाशके फवारलेल्या जमिनीत दर वर्षी शेणखत/ कंपोस्ट खत/ गांडूळ खतांचा वापर करावा.
एकात्मिक तण नियंत्रण
आपण ज्या तण नियंत्रणाच्या विविध पद्धती पाहिल्या त्यातील एकापेक्षा अधिक पद्धतीचा वापर तण नियंत्रणासाठी वापरल्यास त्यातून अधिक प्रभावी तण नियंत्रण मिळू शकते. यालाच एकात्मिक तण नियंत्रण असे म्हणतात.
तण नियंत्रणासाठी पद्धतींची निवड व त्यांचे अपेक्षित परिणाम या बाबी खालील गोष्टींवर अवलंबून असतात.
तणांचा प्रकार व त्यांचे त्यांनी व्यापलेले क्षेत्र
हवामान परिस्थिती
त्या शेतकऱ्याची आर्थिक व सामाजिक परिस्थिती - एकापेक्षा अधिक पद्धती वापरण्यासाठी होणाऱ्या खर्चाचा विचार करणे आवश्यक असते. काही हंगामी पिकातून मिळणारे उत्पन्न व त्यासाठी केला जाणारा खर्च यांचाही विचार करावा लागतो. त्यामुळे एकात्मिक तण नियंत्रणातील सध्या उन्हाळ्यामध्ये उपयुक्त ठरतील, अशा पद्धतींवर भर देणे गरजेचे आहे. उदा. जमिनीवरील सेंद्रिय पदार्थांचे आच्छादन, नांगरून जमिनीला विश्रांती देणे इ.
जमिनीवरील आच्छादन
उन्हाळी हंगामामध्ये तणांच्या नियंत्रणासाठी जमिनीवर आच्छादन हा एक प्रभावी पर्याय असू शकतो. त्यामुळे तणांच्या वाढीसाठी आवश्यक सूर्यप्रकाश मिळत नाही. या आच्छादनाचे तण नियंत्रणाशिवाय अन्य अनेक फायदेही होतात.
आच्छादनाचे फायदे
जमिनीतील ओलावा टिकून राहतो, त्यामुळे पाण्याची बचत होते.
पाऊस आणि वारा यामुळे होणारी जमिनीची धूप थांबते.
तणांची वाढ होत नाही.
जमिनीचे तापमान नियंत्रित राहते.
जमिनीत उपयुक्त जिवाणूंची वाढ होण्यास मदत होते.
झाडांना अतिरिक्त ताण बसत नाही, त्यामुळे झाडाची उत्पादकता वाढते.
जमिनीचा पोत व प्रत सुधारते.
अन्नद्रव्य, रासायनिक घटक व कीटकनाशके यांचे झिरपणे कमी होत असल्यामुळे परिसरातील जलस्रोतांचे प्रदूषण टळण्यास मदत होते.
जमिनीत सेंद्रिय पदार्थांची उपलब्धता वाढते.
- डॉ. राजीव साठे, ९४२३७ २१८९४
- डॉ. एस. के. फाजगे, ९८३४४ २५९१८
सहायक प्राध्यापक, कृषी विद्या विभाग, छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्था, कृषी महाविद्यालय, कांचनवाडी, छत्रपती संभाजीनगर
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.