Dishi Govansh : वसुबारस ः भारतीय गोसंपदेचा गौरव उत्सव

Vasubaras :वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. पाडसासह धेनू ही समृद्धता आणि सुफलतेचे प्रतीक आहे.
Dishi Govansh
Dishi GovanshAgrowon

डॉ.प्रवीण बनकर, डॉ.स्नेहल पाटील

Indegenious Cow : वसु म्हणजे द्रव्य अर्थात धन त्यासाठी असलेली बारस म्हणजे द्वादशी म्हणून या दिवसाला गोवत्स द्वादशी असे म्हणतात. पाडसासह धेनू ही समृद्धता आणि सुफलतेचे प्रतीक आहे.

पारंपरिक पद्धतीने आपण सवत्स गायीची पूजा करून आपला आदरभाव व्यक्त करतो, मात्र गोसंवर्धनासाठी तेवढे पुरेसे नाही. आपल्या भागातील देशी गोधनाची ओळख व गुणवैशिष्ट्ये आपणास माहिती असणे आवश्यक आहे.

भारत देश उत्सवप्रिय असून निसर्गचक्राचे संतुलन राहावे म्हणून प्रत्येक सण उत्सवाला काहींना काही रूढी परंपरेचे कोंदण भारतीय संस्कृतीत दिल्याचे आपल्याला दिसून येते. भारतीय लोकजीवन कृषीक्षेत्राच्या कुशीत विकसित पावलेले आहे. अनादी काळापासून कृषी आणि पशुपालन यांच्या संयुक्त अनुबंधातून समाज जीवन बदलत गेले.

बदलत्या ऋतुचक्रानुसार मानवी आरोग्य आणि समाजजीवनासाठी अनुरूप आणि उपयुक्त प्रथापरंपरा रूढ झाल्या. शेतीतील पशुधनाचे एकूणच सांस्कृतिक, लोकजीवन, अर्थकारण आणि समाजकारणातील अनन्यसाधारण महत्त्व लक्षात घेता भारतातील बहुतांश उत्सव परंपरांच्या माध्यमातून पशुधनाच्या योगदानाची कृतज्ञतापूर्वक दाखल घेतली जाते.

Dishi Govansh
Vasu Baras : गावकऱ्यांच्या साथीने वसुबारस...

वैविध्यपूर्ण गुणधर्म असलेले भारतीय गोधन हा आपला नैसर्गिक आणि सांस्कृतिक वारसा आहे. म्हणून वसुबारस हा दिवाळीतील महत्त्वाचा दिवस खऱ्या अर्थाने संपन्न भारतीय गोसंपदेचा गौरवोत्सव म्हटल्यास वावगे ठरणार नाही. पशुसंवर्धनात पैदासक्षम नर आणि माद्या यांच्या संख्येतील समतोल हा नैसर्गिक संवर्धन करण्याहेतू महत्त्वाचा आहे. या पार्श्वभूमीवर देशी गोवंशाचे संवर्धन हा कळीचा मुद्दा ठरतो.

बैलांच्या प्रति आदरभाव व्यक्त करण्यासाठी श्रावण महिन्यात पोळा साजरा केला जातो, त्याच प्रकारे गाईचे पावित्र्य आणि महत्त्व उत्सवपूर्वक व्यक्त करण्यासाठी ‘गोवत्स द्वादशी‘ म्हणजेच ‘वसु बारस' हा उत्सव साजरा करण्यात येतो. पावसाळा संपून शरद ऋतू सुरू झालेला असतो, शेतामध्ये नवे धान्य तयार झालेले असते, म्हणून समृद्धतेचे प्रतीक म्हणून दिवाळी हा सण साजरा करण्यात येतो. शेतकऱ्यांच्या आणि पर्यायाने सर्वांच्या जीवन समृद्धीचे प्रतीक गोपालनात जाणून कृषिवलांसाठी हा आनंदोत्सव ठरतो.

Dishi Govansh
Vel Amavasya : वेळा अमावस्या अर्थात येळवस म्हणजे मातीतला उत्सव

भारतीय अर्थकारणामध्ये प्राचीन काळापासून गोधनाची दूध आणि दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, पंचगव्य, शेणखत इत्यादी माध्यमातून योगदान लाभले आहे. उंचपुऱ्या, भारदस्त शरीरकाठी, बाकदार शिंगे, रुबाबदार वशिंड आणि लोंबती मानेची पोळी अशा अंगवैशिष्ट्याच्या खुणा प्राचीन काळातील भित्तिचित्रे, नाणी वगैरे ऐतिहासिक पुराव्यातून सहज पाहण्यास मिळेल.

मात्र काळाच्या ओघात, विविध परकीय राजवटीच्या माध्यमातून भारतात विदेशी गोवंशाने शिरकाव झाल्याचे आपणास ठाऊक आहे. साधारणतः पाच सहा दशकांपूर्वी झालेल्या श्वेत क्रांती म्हणजेच विक्रमी दूध उत्पादनात भारताने स्वातंत्र्योत्तर काळात मारलेली मजल नक्कीच कौतुकास्पद ठरते. परंतु संकरीकरणास शास्त्रीय बाजूने नीटसे समजून न घेतल्याने गल्लत झाली.

गोठ्यातील देशी वंशाच्या गोधनाची अंगभूत रोगप्रतिकारक्षमता, किमान परिस्थितीत कमाल व माफक उत्पादनक्षमता, पर्यावरण अनुकूलता अशा महत्त्वपूर्ण बाबींचा सोईस्कर विसर पडला.

आपल्या भागातील पशुधनाचे उत्पादक आणि वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्म माहिती नसल्याने किंवा न उलगडल्याने पुढील पिढीस हा वारसा सुपूर्द करताना आपण बहुमोल गोधनास ‘गावरान किंवा गावठी‘ म्हणत दुर्लक्ष झाले. तथापि, आता सुजाण पिढीने देशी गोवंशाचे माहात्म्य जबाबदारीपूर्वक समजून घेतल्यास पुढील पिढ्यांना विविध अनाकलनीय समस्यांना सामोरे जात असताना प्राचीन समृद्ध गोवंश उलगडून देणे आवश्यक ठरते.

देशी गोवंशांचे संवर्धन ः
गोवत्सद्वादशी म्हणजे गाई-गुरांबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस. पाडसासह धेनु ही समृद्धतेचे, संपन्नतेचे आणि सुफलतेचे प्रतीक समजले जाते. पारंपरिक पद्धतीने आपण सवत्स गायीची पूजा करून आपला आदरभाव व्यक्त करतो, मात्र गोसंवर्धनासाठी तेवढे पुरेसे नाही. यासाठी आपल्या भागातील देशी गोधनाची ओळख
आणि गुणवैशिष्ट्ये आपणास माहिती असणे आवश्यक आहे.


१) देशातील एकूण ५३ गोवंशापैकी महाराष्ट्रात सात गोवंश.
२) मराठवाड्यात डोंगरपट्टी, डोंगरी या नावाने लोकप्रिय असलेला देवणी गोवंश रंगाने पांढरा असून काळ्या रंगांच्या ठिपक्यांवरून वान्नेरा, बालंक्या आणि शेवरा या उपजाती.
३) कानडा, कोकणी, घाटी या नावाने परिचित डांगी गोवंश नाशिक, नगर जिल्ह्यात आढळतो.
४) आर्वी, गौळणी या नावाने परिचित गवळाऊ गोवंश विदर्भातील प्रमुख गोवंश आहे.

५) लाखलबुंदा नावाने स्थानिक भागात परिचित असलेला लाल कंधारी गोवंश लातूर, हिंगोली, परभणी, बीड भागात दिसतो.
६) खिल्लार, माणदेशी, शिकारी या नावाने सुपरिचित खिल्लार गोवंश चपळ आणि उत्तम भारवाहू म्हणून प्रसिद्ध आहे.
७) समुद्र किनाऱ्यालगतच्या दमट हवामानास अनुकूल असलेला कोकण कपिला गोवंश ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्ह्यात दिसतो.


८) पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात आढळणारा मध्यम आकाराचा कठाणी गोवंश दूध आणि शेतीकामासाठी उपयुक्त आहे.
९) गुजरातमधील गीर, मध्य प्रदेशातील निमारी आणि माळवी, कर्नाटकातील कृष्णाखोरी सारखा देशी गोवंश महाराष्ट्रात दिसतो.
१०) दुधाळ जाती म्हणून राष्ट्रीय मान्यता असलेल्या गीर (गुजरात), साहिवाल व लाल सिंधी (पंजाब) आणि थारपारकर (राजस्थान) सारख्या गायीचे व्यावसायिक आणि हौशी गोपालकाद्वारे महाराष्ट्रातदेखील संवर्धन केले जाते.


पशूपैदासकार संघटनांची गरज ः
महाराष्ट्रातील अनेक जातिवंत उमदे गोधन केवळ पुरेसे लक्ष न दिले गेल्याने अस्तित्वाच्या उंबरठ्यावर उभे आहे. उत्तर महाराष्ट्रातील सोनखेडी गोवंश असो किंवा विदर्भातील वऱ्हाडी, उमरडा, खामगावी नावाने लोकपरीचीत स्थानिक गोवंश आता शास्त्रशुद्ध ओळख आणि अभ्यासाच्या वाटेवर आहेत. प्रत्येक भागात स्थानिक गोधन संवर्धनासाठी सक्षम पशूपैदासकार संघटना लोकसहभागातून उभी राहणे ही काळाची गरज आहे.


केंद्र शासनाने अवर्णीत (अज्ञानापोटी गावठी म्हणून गणल्या जाणारे किंवा ज्यांचे गुणधर्म दुर्लक्षित राहिले आहेत) अशा पशुधनाच्या अभ्यासाचा देशव्यापी प्रकल्प हाती घेतलेला आहे. “मिशन शून्य अवर्णीत पशुधन (Mission Zero Non-Descript AnGR) या प्रकल्पांतर्गत सध्या महाराष्ट्रासह इतर राज्यातील दुर्लक्षित पशुधनाचा शोध घेत शास्त्रोक्त पद्धतीने सर्व्हेक्षण आणि अभ्यास सुरू आहे. याअंतर्गत विविध देशी गोवंशाची नोंद होत आहे. मसिलम (मेघालय), संचोरी (राजस्थान), पूर्णिया (बिहार), श्वेत कपिला (गोवा), डगरी (गुजरात) ही काही अलीकडच्या काळात नोंदणी झालेले गोवंश आहेत. कर्नाल येथील राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्युरो या राष्ट्रीय स्तरावर शास्त्रोक्त अभ्यास करणाऱ्या शिखर संस्थेच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत महाराष्ट्रातील दुर्लक्षित देशी पशुधनाचा सर्व्हेक्षण प्रकल्प सुरू आहे.
-------------------------------------------------
डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९
(डॉ. प्रवीण बनकर हे पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला येथे सहाय्यक प्राध्यापक आहेत. डॉ. स्नेहल पाटील पंचायत समिती, अकोला येथे पशुधन विकास अधिकारी (विस्तार) आहेत.


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com