Animal Husbandry : उन्हाळ्यात दुभत्या जनावरांच्या व्यवस्थापनासाठी त्रिसूत्री

Article by Prof. Pankaj Singh Chauhan : उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांची काळजी घेताना पाणी, खाद्य आणि गोठा व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा अवलंब करावा. जेणेकरून जनावरांच्या शरीरावर उष्णतेचा ताण येणार नाही. या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास दुभत्या जनावरांचे आरोग्य उत्तम राहून दूध उत्पादनही चांगले मिळते.
Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon
Published on
Updated on

प्रा. पंकजसिंह चौहान

Dairy Cattle Management : भारतीय अर्थव्यवस्थेत पशुधनास अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. पशुधनापासून मिळणारे मुख्य उत्पादन म्हणजे दूध. दूध उत्पादनात सातत्य राखण्यासाठी दुभत्या जनावरांचे आहार, आरोग्य आणि पोषण व्यवस्थापन काटेकोर करणे अत्यंत आवश्यक असते. त्यात विशेषतः ऋतुनिहाय व्यवस्थापन पद्धतीत योग्य बदल करणे अपेक्षित असते. प्रामुख्याने उन्हाळ्याच्या दिवसांतील वाढत्या तापमानाचा दुभत्या जनावरांच्या शरीरावर ताण येऊन विविध समस्या निर्माण होतात. आणि परिणामी दूध उत्पादनात घट येते.

उन्हाळ्यात जास्त पाणी पिल्यामुळे जनावरांचे आहार सेवनाचे प्रमाण कमी होते. त्यामुळे चयापचयाची क्रिया मंदावते, जनावरे शांत होतात, रवंथ करणे बंदच होतात. याचा एकूण परिणाम दूध उत्पादनावर दिसून येतो. शिवाय कालवडींच्या किंवा गोऱ्हाच्या शरीर वाढीचे प्रमाणही कमी होते. गाईच्या प्रजनन क्षमतेवर विपरीत परिणाम होतो. पैदाशीच्या वळूंची प्रजोत्पादन क्षमता, वीर्य देण्याची क्षमता आणि वीर्याची प्रतही खालावते.

Animal Husbandry
Animal Husbandry : शेतीला द्या पशुपालनाची जोड ; या पशुंच करा संगोपन

याशिवाय तापमान जास्तच वाढले असेल आणि जनावरांची योग्यप्रकारे काळजी न घेतली गेल्यास जनावरांस उष्माघात होण्याची शक्यता असते. त्यामुळे जनावरांस ताप येतो. काही वेळा जनावर दगावण्याची शक्यतादेखील असते. या सर्व गोष्टींवर मात करण्यासाठी उन्हाळ्यात जनावरांच्या संगोपनामध्ये काही विशेष बदल करणे अत्यंत आवश्यक असते. संगोपनासाठी आहार, पाणी आणि गोठा व्यवस्थापन या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहून दुधातील उत्पादनामध्ये समानता राखणे शक्य होते.

व्यवस्थापनातील त्रिसूत्री

उन्हाळ्याच्या दिवसांत तापमान वाढल्यामुळे मुख्यतः पाणी, खाद्य व गोठा व्यवस्थापन याकडे लक्ष देणे जास्त गरजेचे आहे. जेणेकरून दुभत्या जनावरांवर वाढत्या उष्णतेचा ताण येणार नाही.

खाद्य व्यवस्थापन

जनावरांना हिरवा चारा, पशुखाद्य, धान्य, मक्याची कूट असे तयार केलेले खाद्य द्यावे. उष्णता कमी करण्यासाठी खाद्याचे प्रमाण वाढवावे. साधारणपणे ३० ते ३५ टक्क्यांवरून ५० ते ६० टक्क्यांपर्यंत खाद्याचे प्रमाण वाढवावे. त्यापेक्षा जास्त खाद्य प्रमाण वाढविल्यास जनावरांना पचनाचा त्रास होतो. त्यामुळे निर्धारित प्रमाणापेक्षा जास्त खाद्य देणे टाळावे.

आहारात भरपूर हिरवा चारा द्यावा. त्यात लुसर्न, बरसिम, चीक पी, मका, ज्वारी इत्यादी हिरव्या चाऱ्याची वैरण द्यावी. त्यामधून १० ते १५ टक्के तंतुमय पदार्थ उपलब्ध होतात. तर कोरड्या किंवा सुक्या वैरणीचे प्रमाण कमी करावे. जेणेकरून जनावरांच्या शरीरातील उष्णतेचे नियमन सहज होईल. सोबतच खनिज व जीवनसत्त्वे ही शरीरास आवश्यक असतात. उन्हाळ्यात जनावरांच्या शरीरामधून बी १, बी २, बी ६ ही महत्त्वाचे जीवनसत्त्व तसेच कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, सोडिअम या महत्त्वाच्या खनिजांचे प्रमाण कमी होत जाते. त्यासाठी त्यांचा योग्य प्रमाणात खाद्याच्या माध्यमातून वापर करणे आवश्यक आहे.

खुराकामध्ये मका आणि इतर धान्याच्या भरड्याचे प्रमाण कमी असावे. म्हणजे त्यांच्या शरीरात अधिक उष्णता निर्माण होणार नाही.

उन्हाळ्यात रात्रीच्या वेळी वातावरणात थंडावा असतो. त्यामुळे जनावरे दिवसापेक्षा रात्री अधिक चारा खातात. यासाठी रात्री त्यांना भरपूर चारा द्यावा.

जनावरांना शेतामध्ये चरण्यासाठी चारा असेल, तर त्यांना सकाळी आणि संध्याकाळी चरण्यासाठी सोडावे.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालन, दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती

पाणी

उन्हाळ्यामध्ये विशेषतः संकरित जनावरांच्या शरीरावर दुपारी १२ ते ४ या वेळेत २ ते ३ वेळा थंड पाणी मारावे. किंवा जास्त पाणी उपलब्ध असल्यास जनावरांस अंघोळ घालावी.

प्रति जनावर प्रतिदिन साधारणपणे ३० ते ४० लिटर पिण्याच्या पाण्याची आवश्यकता असते. उन्हाळ्याच्या दिवसांत जनावरांची पाण्याची गरज वाढते. जनावरांना इतर ऋतूमध्ये लागणाऱ्या पाण्यापेक्षा २० ते २५ टक्के अधिक पाणी उन्हाळ्याच्या दिवसांत लागते.

जनावरांना पिण्यासाठी मुबलक, स्वच्छ आणि थंड पिण्याच्या पाण्याची २४ तास व्यवस्था करावी. जनावरांच्या संख्येनुसार पिण्याच्या पाण्याची भांडी ठेवावीत.

जनावरांची जास्त गर्दी किंवा पाणी पिताना त्रास होणार नाही अशा ठिकाणीच हे पाण्याचे हौद असावेत. बाजारात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजरीत्या हलविण्यास सोपे असणारे हौद उपलब्ध आहेत. त्यांचा वापर करावा.

गोठा व्यवस्थापन

जनावरांच्या गोठ्यामध्ये भरपूर स्वच्छ आणि मोकळी खेळती हवा राहील याची दक्षता घ्यावी.

गोठ्यामधील तापमानाचे व्यवस्थापन करण्यासाठी फॉगर्स, पंखे, कूलर इत्यादींची व्यवस्था करावी.

गोठ्यामध्ये जनावरांना फॉगर्सच्या माध्यमातून सहा ते आठ तास पाण्याने थंड केले, तर त्यांच्या शरीराचे तापमान कमी होण्यास मदत होते. त्यामुळे जनावरांचे खाद्य खाण्याचे प्रमाणही वाढते. त्यामुळे दूध उत्पादनात वाढ मिळण्यास मदत होते.

जनावरांच्या शरीरावर पाण्याने भिजवलेली गोणपाट किंवा पोती टाकावीत. गोठ्याच्या भिंती आणि छत यांच्यामधील मोकळ्या जागेत बारदान बांधून त्यावर दुपारी २ ते ३ वेळा पाणी मारावे. जेणेकरून गोठ्यातील वातावरण नियंत्रित केली जाईल. तसेच उष्ण वारे येण्यापासून रोखले जातील. गोठा वेळोवेळी पाण्याने धुऊन निर्जंतुकीकरण करावे.

वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या शरीराचे तापमान वाढून शरीरावर ताण येतो. विशेषतः बंदिस्त गोठा व पत्र्याचे शेठ असलेला गोठ्यातील जनावरांस उष्णतेचा जास्त त्रास होतो. त्यामुळे दुग्ध उत्पादनावर परिणाम होतो. जनावरांची वाढ खुंटते. पचनक्रिया मंदावते. परिणामी, खाद्य खाण्याचे प्रमाण कमी होते.

दुधाळ जनावरांच्या शरीराचे तापमान ०.५ अंश सेल्सिअसने जरी वाढले तरी दूध उत्पादनामध्ये सरासरी एक लिटरपर्यंत घट येते. अशा वेळी मुक्त संचार गोठा पद्धती फायदेशीर ठरते. गोठ्याची उंची मध्यभागी १५ ते १८ फूट, तर बाजूला ८ ते १० फूट असावी.

गोठ्याच्या छतासाठी लोखंडी पत्र्याचा वापर न करता सिमेंटच्या पत्र्यांचा वापर करावा. किंवा पत्र्यावर पांढरा रंग मारून घ्यावा. जेणेकरून प्रकाश परावर्तित होऊन गोठ्याच्या आतमधील वातावरण बाहेरच्या पेक्षा थंड ठेवता येईल. छतावर पाचट, कडबा, झाडाचा पाला इत्यादींचा वापर करावा.

गोठ्याभोवती झाडांची लागवड केलेली असावी. यामुळे गोठ्यामध्ये सावली तर राहतेच, शिवाय थंड हवेचे वहन होण्यास मदत होते.

प्रा. पंकजसिंह चौहान, ९९२३२३८२३५

(पशुसंवर्धन व दुग्धशास्त्र विभाग, के. डी. एस. पी. कृषी महाविद्यालय, नाशिक)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com