Animal Husbandry : पशुपालन, दुग्ध व्यवसायातून साधली प्रगती

Dairy Business : सावरगाव तळ हे गाव दुग्ध व्यवसायात आघाडीवर असलेले गाव. येथील बाळासाहेब लहानू शेटे या तरुण शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायातून प्रगती साधली आहे.
Animal Husbandry
Animal HusbandryAgrowon

Farmer Planning :

पशुपालन

शेतकरी : बाळासाहेब लहाणू शेटे

गाव : सावरगाव तळ (ता. संगमनेर, जि. नगर)

शेती : ३ एकर

गायींची संख्या : ४० गाई, १७ कालवडी

नगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील अनेक भागांत पाण्याची पुरेशी उपलब्धता नाही. त्यामुळे शेतकरी शेतीसोबत जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसाय, पोल्ट्री यासारख्या पूरक व्यवसायाला प्राधान्य देतात. सावरगाव तळ हे गाव दुग्ध व्यवसायात आघाडीवर असलेले गाव. येथील बाळासाहेब लहानू शेटे या तरुण शेतकऱ्याने दुग्ध व्यवसायातून प्रगती साधली आहे.

सुरुवातीच्या काळात पूरक व्यवसाय म्हणून म्हैसपालनास सुरुवात करून नंतर गोपालनात आपला चांगला जम त्यांनी बसविला आहे. गोपालनास सुरुवात केल्यानंतर गाईंच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ करत नेली. गोपालन व्यवसायात दैनंदिन नियोजन, खाद्य तसेच आरोग्य व्यवस्थापनाला विशेष प्राधान्य देत दुग्ध व्यवसायिकांपुढे आदर्श निर्माण केला आहे.

Animal Husbandry
Animal Disease : जनावरांमधील रेबीज रोखण्याचे तंत्र

येथील बाळासाहेब शेटे यांचे कुटुंब अनेक वर्षांपासून दुग्ध व्यवसाय करत आहेत. मात्र २००४ पासून त्यांनी म्हशींची संख्या वाढवीत म्हैसपालन व्यवसायात वाढ केली. २०१० पर्यंत म्हैसपालन केले. मात्र मजूरटंचाई व अन्य अडचणींमुळे म्हशींऐवजी संकरित एचएफ गाईंचे संगोपन करण्याचे ठरविले.

त्यानुसार गाईंच्या संख्येत टप्प्याटप्प्याने वाढ केली. सध्या त्यांच्याकडे ४० मोठ्या गाई आणि १७ कालवडी आहेत. दररोज ४१५ लिटरपर्यंत दूध संकलन होते. त्यांची केवळ तीन एकर शेती आहे. त्यातही त्यांनी गाईंसाठी चाऱ्याचे उत्पादन घेण्यावर भर दिला आहे. याशिवाय पशुपालनाला २००९ पासून कुक्कुटपालन व्यवसायाची जोड दिली. कुक्कुटपालनासाठी उभारलेल्या शेडची क्षमता सुमारे २० हजार पक्षी इतकी आहे.

व्यवस्थापनातील बाबी

बाळासाहेब यांनी गोपालनाची सुरुवात २०१० मध्ये केली. गाईंसाठी सात गुंठे क्षेत्रावर मुक्तसंचार पद्धतीच्या गोठ्याची उभारणी केली.

गोठ्यातील कामांस दररोज सकाळी ४ वाजता सुरुवात होते. सुरुवातीला मुक्त गोठ्यातून गाई दूध काढणीसाठी दावणीला आणून बांधल्या जातात. त्यानंतर यंत्राच्या मदतीने दूध काढणी केली जाते.

दूध काढणी झाल्यानंतर गाईंना चारा व खुराक दिला जातो. ही सर्व कामे सकाळी साधारण सात वाजेपर्यंत पूर्ण होतात. त्यानंतर गाईंना मुक्त संचार गोठ्यात सोडले जाते.

दिवसभर गाई मुक्त संचार गोठ्यामध्येच असतात. सायंकाळी पुन्हा दूध काढणी करून दिली जाते. त्यानंतर चारा व खुराक दिला जातो.

मुक्तसंचार गोठ्यामध्ये गाईंना मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध होण्याची व्यवस्था केलेली आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry : पशुपालनातील जैवसुरक्षितता महत्त्वाची...

गाईंना दर्जेदार चारा उपलब्ध होण्यासाठी गाव परिसरातील शेतकऱ्यांकडून दरवर्षी मका खरेदी करून सुमारे ४०० टन मुरघास निर्मिती करतात. त्यामुळे चाराटंचाईच्या काळात देखील गाईंना दर्जेदार खाद्य उपलब्ध होते.

नवजात वासरांची विशेष काळजी घेतली जाते. नवजात वासरे जन्मल्यानंतर त्यांची स्वतंत्र व्यवस्था केली जाते. वासरांच्या वाढीसाठी आवश्यक तो खुराक दिला जातो. दूध पाजणे, चारा आणि खाद्य व्यवस्थापनावर भर दिल्यास वासरांची वाढ चांगली होत असल्याचे बाळासाहेब सांगतात.

पशुपालनातून वर्षभरात सुमारे ३० ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. त्यातील काही शेणखत शेतीमध्ये वापरले जाते. तर उर्वरित शेणखताची साडेतीन हजार रुपये प्रति ट्रॉली दराने शेतकऱ्यांना विक्री केली जाते.

येत्या काळात वाढत्या तापमानाचा जनावरांच्या शरिरावर ताण येण्याची शक्यता असते. त्यासाठी आवश्‍यकतेनुसार उपाययोजना केल्या जातील.

खाद्य व्यवस्थापन

एका गाईला प्रतिदिन साधारण १० किलो मुरघास व ८ किलो भुस्सा असा चारा दिला जातो. त्यात प्रामुख्याने मुरघास, गव्हाचा भुस्सा यांचा वापर केला जातो.

चारा देण्याआधी गाईंना प्रत्येकी अडीच किलो पशुखाद्य दिले जाते. त्यात गोळीपेंड, सरकी पेंड, मका भरडा यांचा समावेश असतो. गरजेनुसार प्रथिनयुक्त खाद्य चारा कुट्टीमध्ये मिसळून दिले जाते.

आरोग्य व्यवस्थापन

जनावरांना लम्पी, लाळ्या खुरकूत या आजारांचे नियमित लसीकरण केले जाते.

जंतनाशक मात्रा मोठ्या गाईंना वर्षातून दोन वेळा तर लहान वासरांना तीन महिन्यांतून एकदा दिली जाते.

लाळ्या खुरकूत, लम्पीचे दोन महिन्यांपूर्वी, तर गोचीड निर्मूलनासाठी महिनाभरापूर्वी लसीकरण केले आहे.

गरजेनुसार पशुवैद्यकांच्या सल्ल्यानुसार लसीकरण करण्यावर भर दिला जातो.

बाळासाहेब शेटे ९९६००३४६६६ (शब्दांकन : सूर्यकांत नेटके)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com