डॉ. सचिन राऊत
Livestock Management :
दुधाळ जनावरे निरोगी असतील तर त्यांच्यापासून चांगले उत्पादन मिळते. लंगडण्याच्या समस्येमुळे जनावरांच्या चालण्या-फिरण्याला मर्यादा येतात, त्याचप्रमाणे दूध उत्पादनात सुद्धा घट होते. ही समस्या निर्माण होण्याची अनेक कारणे आहेत. ही समस्या मुख्यत्वे करून मागच्या पायात दिसून येते. ही समस्या दिसून आल्यावर जनावर दुखरा पाय अधांतरी धरते आणि चांगल्या पायावर जास्त भार दिला जातो. परंतु कालांतराने चांगला पायसुद्धा जास्त भार दिल्यामुळे दुखतो आणि ही समस्या जास्त गंभीर होते. ही लंगडण्याची समस्या मुख्यत्वे करून जास्त दूध देणाऱ्या विदेशी/संकरित गाईमध्ये दिसून येते.
कारणे
जनावरांच्या खुरामध्ये जखमा होतात. या जखमामध्ये सूक्ष्म जंतूंचे संक्रमण होते. जखमेवर वेळीच उपचार नाही केले तर जखमेत जंतू संक्रमण लवकर होते, या शिवाय गोठ्यामध्ये स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे संक्रमण दिसून येते.
पशू आहारामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव असल्यामुळे ही समस्या जास्त प्रमाणात दिसून येते.
बंदिस्त पशुपालनात गाई पक्क्या, कोबा केलेल्या गोठ्यात कायम बांधून ठेवल्या जातात, त्यामुळे सुद्धा ही समस्या आढळून येते. यासाठी कोबा केलेल्या गोठ्यात रबरी मॅट अंथराव्यात किंवा जागेची उपलब्धता असेल तर अर्ध बंदिस्त पद्धतीचा वापर करावा.
जनावरांचे खूर जास्त प्रमाणात वाढल्यामुळे ही समस्या दिसून येते.
जनावरांच्या आहारात जीवनसत्त्व, प्रथिन किंवा खनिज-क्षारांचा अभाव असल्याने समस्या तयार होते.
जनावरांना जास्त प्रमाणात धान्य विशेषत: पिठाच्या स्वरूपात खाद्य देण्यात आल्यावर त्यांच्या पोटामध्ये लॅक्टिक आम्ल जास्त प्रमाणात तयार होते. याचा परिणाम म्हणजे पोटातील सामू आम्लधर्मी होतो. यामुळे पोटातील फायदेशीर असलेले जिवाणू मारतात आणि शरीरात विषारी पदार्थ तयार होतात. याच्या परिणाम स्वरूप हिस्ट्यामिन तयार होते. या हिस्ट्यामिनमुळे जनावरांच्या खुरांना रक्तपुरवठा पुरेसा होत नाही. या कारणामुळे खुरांच्या कोशिका मृत पावतात, त्यामुळे खूर सडू लागतात, त्यावर सूज येते. परिणामी जनावर लंगडू लागते.
उपचार:
लंगडण्याचे मूळ कारण शोधून ते दूर करावे. पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपचार करावेत.
खूर पोटॅशिअम परमॅंग्नेटच्या पाण्याने धुऊन काढावेत. खुरावर जंतुनाशक मलम लावावेत. जखमेवर माश्या बसू नयेत यासाठी जंतुनाशक स्प्रे फवारावा.
जनावरांना संतुलित आहार द्यावा. त्यांच्या आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा.
प्रतिबंधक उपाय योजना
जनावरांच्या गोठ्याची स्वच्छता आवश्यक आहे. गव्हाण स्वच्छ ठेवावी. पाणी पिण्याचा हौद साफ करावा आणि त्याला आतल्या बाजूने चुन्याचा थर लावावा.
गोठ्यामध्ये कोबा करताना १/१० भागामध्ये कोबा करू नये. मात्र संपूर्ण कोबा केला असल्यास, गोठ्यात नरम रबरी मॅट टाकावी. रबरी मॅट परवडत नसेल तर गवताचा जाडसर थर टाकावा, मात्र हा थर वेळच्यावेळी बदलावा. यासाठी लाकडाचा भुसा, वाळू यांचा वापर करता येतो. मात्र हे वेळोवेळी बदलत राहावे.
अर्धबंदिस्त पद्धतीचा वापर फायदेशीर आहे. यासाठी जागेची उपलब्धता असावी. अर्धबंदिस्त पद्धतीमध्ये जनावरे त्यांच्या मनाप्रमाणे गोठ्या बाहेर किंवा गोठ्यात बसू शकतात. शिवाय मोकळ्या जागेत फिरत असल्यामुळे त्यांना व्यायाम होतो आणि त्यांची पचनक्रिया पण चांगली राहते.
जनावरांच्या खुरांची काळजी घेणे गरजेचे असते. खुराची वाढ नियमितपणे होत असते, त्यामुळे वेळचे वेळी खुरांची कापणी करणे फार आवश्यक असते. खूर जास्त प्रमाणात वाढले तर लंगडण्याची समस्या दिसून येते. गाभण जनावरात खूर वाढलेले असतील तर ते विण्याच्या एक ते दीड महिना अगोदर कापून व्यवस्थित करावेत.
चारही खुरांचा आकार एकसमान असल्यावर शरीराचा भार चारही पायांवर सारखा पडतो आणि यामुळे जनावर लंगडण्याची समस्या आढळण्याची संभावना कमी होते.
जनावरांना फुटबाथ देणे हा उपाय चांगला आहे. बाजारात असणारे जंतुनाशक, फॉर्मलिन, कॉपर सल्फेट (मोरचूद) यापैकी एक औषध वापरावे किंवा यासाठी पोटॅशिअम परमॅग्नेट पाण्यात विरघळून या पाण्याचा वापर करावा. आठवड्यातून एकदा आपल्या जनावरांना फूट बाथ आवश्यपणे द्यावा. यामुळे खुरांमध्ये जंतू संक्रमण टाळता येऊ शकते. खुरांमध्ये जंतू संक्रमण झाल्यावर प्रतिजैविक पावडर खुरावर टाकावी तसेच पशुतज्ज्ञाकडून प्रतिजैवकाचे इंजेक्शन जनावरांना टोचावे.
दुधाळ जनावराचे आरोग्य चांगले राहावे आणि त्यांचे दूध उत्पादन चांगले असावे यासाठी त्यांना योग्य प्रमाणात पौष्टिक आहार/ संतुलित आहार मिळणे गरजेचे असते. आहारात बदल करताना हळूहळू बदल करावा. त्यांना धान्य देताना बारीक दळून पीठ न देता, भरडलेल्या स्वरूपात आणि योग्य प्रमाणात द्यावे.
दुधाळ जनावरांना हिरवा चारा, कडबा यातून तंतुमय पदार्थांचा पुरवठा होतो. त्यामुळे त्यांच्या आहारात योग्य प्रमाणात हिरवा चारा आणि कडबा यांचा समावेश असावा. या व्यतिरिक्त आहारात प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिज-क्षार योग्य प्रमाणात असावीत. यामुळे लंगडण्याची समस्या टाळण्यास मदत होते. शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढून विविध प्रकारच्या आजारापासून संरक्षण होते.
जनावरांची खुरे वेळोवेळी तपासून घ्यावीत, ती वाढलेली असल्यास योग्य आकारात कापून घ्यावीत. खुरांमध्ये काही जंतू संक्रमण आढळून आल्यास त्यावर त्वरित उपचार करून घ्यावेत. खुरामध्ये साधी, जंतुसंक्रमण नसलेली जखम दिसून येत असेल तर त्यावर तातडीने उपचार करावेत.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.