
गाई-म्हशींच्या दुधामुळेच भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक (Milk Producer) देश आहे. भारतात गीर (Gir Cow), साहीवाल (Sahiwal), थारपारकर (Tharparkar) आणि रेड-सिंधी (Red Sindhi) या देशी गायींच्या (Deshi Cow) जाती दुध उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाची भूमिका बजावतात.
देशी गायींची कमी उत्पादकता हे भारतातील शाश्वत दूध उत्पादनातील मोठे आव्हान आहे. भारतातील दूध उत्पादन जास्त असले तरी येथील देशी गायींची उत्पादकता मात्र फारच कमी आहे.
देशी गायी संकरित गायींपेक्षा अधिक काटक आणि उष्ण वातावरणात तग धरुन राहू शकतात. त्यामुळे देशी गायींचे उत्पादन वाढवण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी इतर प्रजनन तंत्राच्या तुलनेत, क्लोनिंग तंत्र अधिक फायदेशिर असल्याच दिसून आलं आहे.
जलद गतीने उच्च-गुणवत्तेच्या जनावरांची संख्या वाढवण्यात आणि लोप पावत असलेल्या देशी गायींच्या जातींच्या संवर्धनात महत्त्वपूर्ण भूमिका बजावू शकते.
जागतिक स्तरावरही उच्च दर्जाच्या दुधाळ जनावरांच्या जाती तयार करण्यासाठी क्लोनिंग प्रजनन तंत्राचा (Clone Reproduction Technology) वापर केल्याने समाधानकारक परिणाम दिसून आले आहेत.
ज्यामुळे दूध उत्पादनात वाढ झाली आहे. या दिशेने प्रयत्न करताना राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेतील (NDRI) शास्त्रज्ञांनी देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीने गीर गायीचा क्लोन (cLONE) तयार करण्यात यश मिळवले आहे.
गीर गाय भारतातील देशी गायीची एक प्रसिद्ध जात असून तीचे उगमस्थान गुजरात आहे. आज गीर गायींच्या दुधाला आणि इतर उत्पादनांना भरपूर मागणी आहे.
गीर जातीच्या गायी इतर जातींपेक्षा अधिक सहनशिल असतात. जास्त तापमान आणि थंडीतही गीर गाई तग धरुन राहतात. उष्ण वातावरणात होणाऱ्या रोगांप्रती गीर गाई सहनशिल असतात.
त्यामुळे ब्राझील, अमेरिका, मेक्सिको आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये भारतातील देशी गायींना मोठी मागणी आहे.
राष्ट्रीय डेअरी संशोधन संस्थेने उत्तराखंड पशुधन विकास मंडळ, डेहराडूनच्या सहकार्याने २०२१ मध्ये गीर, साहिवाल आणि रेड-सिंधी सारख्या देशी गायींचे क्लोनिंग करण्याचे काम सुरू केले.
डॉ. नरेश सेलोकर, मनोज कुमार सिंह, अजय असवाल, एस.एस. लठवाल, सुभाष कुमार, रणजीत वर्मा, कार्तिकेय पटेल आणि एम. एस. चौहान या शास्त्रज्ञाच्या गटाने क्लोन तंत्राने प्रजननाची स्वदेशी पद्धत विकसित करण्यासाठी दोन वर्षांहून अधिक काळ काम केले.
यापुर्वी क्लोनिंग तंत्राने म्हशीचा क्लोन तयार करण्यात यश मिळालेले आहे. मात्र देशात पहिल्यांदाच स्वदेशी पद्धतीने गीर गायीचा क्लोन तयार करण्यात शास्त्रज्ञांना यश मिळाले आहे.
कसे आहे क्लेनिंग तंत्र?
शास्त्रज्ञांच्या गटाचे प्रमुख डॉ. नरेश सेलोकर यांनी सांगितले की, गेल्या वर्षीपासून म्हशी मधील क्लोनिंग तंत्रज्ञानावर संशोधन सुरु होते. यातील अनुभवानंतर गायीमधील क्लोनिंगवर संशोधन केले गेले. जनावरांच्या क्लोनिंग मध्ये अनेक आव्हाने होती.
गीर गायीचा क्लोन करण्याकरिता साहिवाल गायीमधून अल्ट्रा सोनोग्राफीद्वारा अंडी काढून त्यांना २४ तास प्रयोगशाळेमध्ये परिपक्व केल्यानंतर त्यांचा केंद्रक म्हणजेच डीएनए काढून गीर गायीच्या कोशिका मिळवण्यात आल्या.
८ दिवस भ्रूणांना प्रयोगशाळेत संवर्धीत करण्यात आले. ८ दिवसानंतर तयार भृण संकरित गायीच्या गर्भाशयात स्थानांतरित करण्यात आले.
सुमारे आठ महिन्यानंतर १६ मार्च २०२३ रोजी गीर जातीच्या क्लोन मादी वासराचा म्हणजेच कालवडीचा जन्म झाला. या कालवडीला गंगा नाव देण्यात आले.
हे वासरु निरोगी असून जन्माच्या वेळी त्याचे वजन ३२ किलो भरले. यानंतर क्लोनिंग तंत्राने जातिवंत वळूचीही निर्मित केली जाणार आहे.
क्लोनिंग तंत्राचे फायदे काय आहेत?
क्लोनिंग तंत्राने १०० टक्के जातिवंत जनावराची निर्मिती शक्य होते. जास्त दूध उत्पादक गायीची निर्मिती करता येते.
दुधाळ जनावरांची संख्या नैसर्गीक पद्धतीच्या तुलनेत वाढवता येते. याशिवाय नामशेष होत चाललेल्या जातिवंत जनावरांचे संवर्धन करण्यास क्लोनिंग तंत्रामुळे मदत होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.