
Milk Production : पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूरचा औद्योगिकीकरणातून झपाट्याने विकास होत आहे. अशावेळी शेजारील गाऊडदरा गावातील ओंबळे कुटुंबाने काही वर्षांपासूनची दुग्ध व्यवसायाची परंपरा जोपासण्यासह विस्तारून कुटुंबाची प्रगती साधली आहे. सुयोग्य नियोजन व परिश्रमातून दररोज सुमारे ३२० लिटर दूध संकलनासह दहा- बारा हॉटेल व्यावसायिकांची सक्षम बाजारपेठ तयार केली आहे.
पुणे जिल्ह्यातील खेड शिवापूर गावाचे वर्णन करायचे तर येथून पुणे- बंगळूर हा राष्ट्रीय महामार्ग जातो. पपुणे शहराच्या जवळ हा भाग येत असल्याने येथे औद्योगीकीकरण झपाट्याने झाले आहे.
अशातही काही स्थानिक शेतकऱ्यांनी आपली शेती संस्कृती टिकवून धरली आहे. खेड शिवापूरपासून दीड किलोमीटर आत असलेल्या गाऊडदरा येथील बाळासाहेब दगडू ओंबळे हे त्यापैकीच एक. त्यांची सात एकर वडिलोपार्जित शेती आहे. महानगरपालिकेत १९६६ च्या दरम्यान नोकरीला असताना बाळासाहेब शेती आणि म्हैसपालन हा व्यवसाय करीत होते. त्यांना कैलास व रामदास अशी दोन मुले. शिक्षण झाल्यानंतर दोघांनीही वडिलांचाच शेतीचा वारसा पुढे समर्थपणे चालवण्यास सुरूवात केली आहे.
व्यवसाय विस्तार
कैलास म्हणाले, की १९९० मध्ये मी घरच्या दुग्ध व्यवसायाकडे पूर्ण लक्ष देण्यास सुरुवात केली.
त्या वेळी गोठ्यात केवळ १२ म्हशी होत्या. आम्ही कालवडी घेऊन, संगोपन करून विक्री करायचो. पुढील काळात म्हशींची संख्या व दूधविक्री वाढविण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रीय महामार्ग नजिक असल्याने या भागात हॉटेल्सची संख्या मोठ्या प्रमाणात होती. या व्यावसायिकांसोबत चर्चा करून त्यांना ठोक स्वरूपात आणि रास्त दरात दुधाचा पुरवठा करण्याचे आश्वासन दिले. पंजाब, हरियाना, गुजरात या भागांत म्हशी व गायींचे उत्तम ‘ब्रीड’ मिळत असल्याने तेथे जाऊन ते आणण्यास सुरुवात केली. पाहता पाहता आज गोठ्यात लहान-मोठ्या मिळून ५० ते ५५ म्हशी, पाच ते सात संकरित गायी व दोन रेडे यांचा समावेश आहे.
गोठा कामकाज
पहाटे पाचला गोठ्यातील कामे सुरू होतात. सकाळी आठ वाजेपर्यंत गोठा स्वच्छ करणे, पशुखाद्य खाऊ घालणे, दूध काढणे ही कामे होतात. त्यानंतर दुधाचा प्रत्येक हॉटेलला १० लिटर ते ४० लिटर याप्रमाणे दुधाचा पुरवठा केला जातो. आजमितीला १० ते १२ हॉटेल्सचे नेटवर्क तयार केले आहे. सकाळच्या सत्रातील कामे आटोपल्यानंतर दुपारी पुन्हा गोठ्याची स्वच्छता होते. सायंकाळी पुन्हा तेथील कामे सुरू होतात. दूध संकलनात वाढ झाल्यानंतर दूध वेळेत पोहोचविण्यासाठी टेम्पोची खरेदी केली. चारा वाहतुकीसाठीही दोन वाहने घेतली आहेत.
चारा व्यवस्थापन
सात एकर शेतीपैकी अडीच एकरांत मका, दोन एकरांत ज्वारी आहे. उर्वरित क्षेत्रात भात लागवड केली जाते. घरच्या शेतातून कडबा, मका आणि भाताच्या पेंढ्याचा चारा उपलब्ध होतो. गरज भासेल त्याप्रमाणे उसाच्या वाढ्याची प्रति टन ३५०० रुपये दराने खरेदी केली जाते. सरकी पेंड, कुट्टी, गोळी पेंड, हरभरा भुस्साही खरेदी केला जातो.
जनावरांचे आरोग्य
जनावरे आजारी पडू नयेत आणि दूध संकलन कमी होऊ नये यासाठी नियमित खबरदारी घेतली जाते. दर महिन्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची गोठ्याला भेट असते. शिवाय अनेक वर्षांच्या
अनुभवातून जनावरांच्या आरोग्याविषयीचा बारकाईने अभ्यास झाला आहे. निरीक्षण व वर्तणुकीवरून जनावरांचे आजारीपण लक्षात येते. त्यावरून प्राथमिक औषधोपचार केले जातात. म्हैस माजावर येणे आणि गाभण काळातील उपचार मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जातात.
अर्थकारण
दररोज ३०० ते ३२० लिटर दूध संकलन होते. वर्षभर ही सरासरी कायम ठेवण्याचा प्रयत्न असतो. चारा, पशुखाद्य, वाहतूक आणि अन्य असा दैनंदिन आठ हजार रुपयांपर्यंत खर्च होतो. महिन्याला
या व्यवसायातून ६० व काही वेळा ७० टक्क्यापर्यंत नफा मिळतो. शिवाय वर्षभरात दोन ते सव्वा दोन लाख रुपयांच्या शेणखताची विक्री होते. त्यातून अतिरिक्त उत्पन्न मिळते.
कुटुंब रमले दूध व्यवसायात
कुटुंबातील सर्व सदस्य दुग्ध व्यवसायात रमले आहेत. बाळासाहेब गोठ्याची दैनंदिन देखरेख आणि छोटी कामे पाहतात. त्यांचा लहान मुलगा रामदास गोठा व्यवस्थापन तर मोठा मुलगा कैलास वाहतूक आणि विक्रीची बाजू सांभाळतो. दोन्ही मुलांना आई कमलाबाई यांचे मार्गदर्शन होते. दोन सुना दीपाली आणि जयश्री देखील आपल्या जबाबदाऱ्या सांभाळतात. गोठा व्यवस्थापनासाठी दोन मजूर ठेवले असले तरी बहुतांश कामांमध्ये ओंबळे कुटुंबाचा हातखंडा तयार झाला आहे.
भविष्यातील ध्येय
गोठ्यात कालवडी तयार करण्याचा प्रयत्न असतोच. त्यासाठी दोन जातिवंत रेडे गोठ्यात आहेत. कैलास म्हणाले, की दर तीन महिने किंवा त्या आसपास पंजाब, हरियाना आदी भागांत देखील एक दौरा करण्यात येतो. या सततच्या धडपडीतून जातिवंत ब्रीड गोठ्यात येते. व्यवसासायात आत्मविश्वास वाढल्याने भविष्यात १०० म्हशींचा अत्याधुनिक गोठा बांधणीचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय प्रक्रिया करून, दही, तूप, लोणी, पनीर आदींचा निर्मिती उद्योग उभारण्याचे स्वप्न असून, त्याची तयारी सुरू केली आहे. या व्यवसायातूच कौटुंबिक प्रगती झाली. त्यातील उत्पन्नातूनच घरबांधणी सुरू होणार आहे. जमीनही खरेदी करायची आहे.
अश्वपालनाचा छंद
एखादा छंद व्यक्तीचे जीवन आनंदी करतो. ओंबळे कुटुंबानेही अश्वपालनाचा छंद जपला आहे.
कैलास म्हणाले, की वडिलांना आपली मुले कुस्तीच्या तालमीत जावीत असे वाटे. त्यादृष्टीने त्यांनी प्रयत्नही केले. अश्वपालनाच्या आवडीतून एक काठेवाडी घोडाही आम्ही घेतला आहे. मला उत्तम प्रकारे घोडेस्वारी येत असून, छोटा मुलगा प्रज्वल देखील त्यात पारंगत होत आहे याचा आनंद आहे.
कैलास ओंबळे, ९१७५९९३३३५
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.