Poultry Farming : कुक्कुटपालनातून ग्रामीण अर्थकारण सुस्थिर

भारतातील कुक्कुटपालन प्रामुख्याने घरामागील परसापुरते मर्यादित होते. मात्र, अलीकडे कुक्कुटपालन क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शाश्वत स्वरूपाच्या रोजगारनिर्मितीबरोबरच मिळकतीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत असल्याचे दिसते.
Poultry Farming
Poultry FarmingAgrowon

देशातील कृषिसंलग्न अर्थव्यवस्थेतील पशुधन उत्पादन (Livestock Production) प्रणालीतील कुक्कुटपालन (Poultry Farming) हे एक महत्त्वाचे क्षेत्र आहे. ग्रामीण कुटुंबांचे घरगुती उत्पन्न (Rural Economy) आणि पोषण सुरक्षेसह खात्रीशीर रोजगारातून आर्थिक सुरक्षा पुरविण्याचा प्रभावी मार्ग म्हणून त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. एकीकडे वाढती लोकसंख्या, वाढते दरडोई उत्पन्न आणि शहरीकरणामुळे कुक्कुटपालन क्षेत्र वेगाने विस्तारते आहे. तर, दुसरीकडे बदलते हवामान (Climate Change), घटते शेती क्षेत्र आणि अनिश्चित बाजारभाव यामुळे शेती वपूरक व्यवसायांतील वाढती अस्थिरता कमी करून शाश्वत उत्पन्नाचे साधन ठरू पाहते आहे.

Poultry Farming
Poultry : पोल्ट्री व्यवसायावर मंदीचे सावट

ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधार

एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धापूर्वी, भारतातील कुक्कुटपालन प्रामुख्याने घरामागील परसापुरते मर्यादित होते. मात्र, अलीकडे कुक्कुटपालन क्षेत्र भारतीय अर्थव्यवस्थेसाठी शाश्वत स्वरूपाच्या रोजगारनिर्मितीबरोबरच मिळकतीचा एक महत्त्वपूर्ण स्रोत असल्याचे दिसते. भारतात घरगुती आणि व्यावसायिक कुक्कुटपालन होते. २० व्या पशुधन गणनेनुसार, भारतात ८५१.८ दशलक्ष कुक्कुट पक्षी आहेत. यापैकी घरगुती कुक्कुटपालन ३१७ दशलक्ष, तर व्यावसायिक संघटित क्षेत्रात ५३४.७ दशलक्ष कुक्कुट पक्षी असल्याचे दिसते.

व्यावसायिक कुक्कुटपालन एकूण अंडी उत्पादनात सुमारे ८० टक्के योगदान देते. उर्वरित उत्पादन घरगुती असंघटित क्षेत्रामार्फत होताना दिसते. भारत हा जगातील तिसरा सर्वांत मोठा अंडी उत्पादक आणि ब्रॉयलरचा सहावा सर्वांत मोठा उत्पादक देश आहे. तमिळनाडू कुक्कुट पक्ष्यांची संख्या व अंडी उत्पादनात आघाडीवर असून त्यानंतर आंध्र प्रदेशात, हैदराबाद हे सर्वाधिक पोल्ट्री आणि हॅचरी असलेले शहर आहे. याव्यतिरिक्त विशाखापट्टणम, चित्तूर, कर्नाटक, तमिळनाडू, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, ओरिसा आणि ईशान्येकडील राज्ये अंडी उत्पादनात तर, हरियाना, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश हे कुक्कुट मांस उत्पादनात आघाडीवर आहेत.

Poultry Farming
Poultry Industry : राज्यात चिकनला मागणी, मात्र वैयक्तिक उत्पादनात घट

देशातील मांस आणि अंडी उत्पादनाचे मूळ किमतीनुसार मूल्य २०१५ -१६ ते २०२०-२१या काळात ७९,८९५ रुपये कोटीवरून तब्बल १२५२९८ कोटी रुपये वाढले आहे. देशामध्ये २०२०-२१ कुक्कुटपालनातून ८,७९७.९१ दशलक्ष मांस, तर १२,२०,४८६ लाख अंडी उत्पादन झाले आहे. देशाने सन २०२१-२२ मध्ये सुमारे ३२०२४०.४६ टन कुक्कुटपालन उत्पादनांची ५२९.८१ कोटी रुपयांची जगभरात निर्यात केली आहे. ही निर्यात प्रामुख्याने ओमान, मालदीव, इंडोनेशिया, व्हिएतनाम, भूतान, जपान आणि रशिया या देशांतून केली गेली आहे.

आपत्कालीन विमा

ग्रामीण भागातील दोन तृतीयांश लोकांना पशुधन उपजीविका पुरवते. लहान शेत कुटुंबांच्या उत्पन्नात पशुधनाचे १६ टक्के, तर सरासरी सर्व ग्रामीण कुटुंबांसाठी १४ टक्के वाटा असल्याचे दिसते. कुक्कुटपालन क्षेत्र जवळपास ३ दशलक्ष लोकांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच अनेक अल्पभूधारक आणि भूमिहीन शेतकऱ्यांसाठी हुकमी उत्पन्नाचे साधन आहे. एकंदरीतच देशाच्या ग्रामीण भागात पशुधन क्षेत्र पूरक कुक्कुटपालनातील शाश्वत उत्पन्नाच्या स्त्रोताद्वारे कौटुंबिक पोषण सुधारून जीवनमान उंचावण्यासह कुपोषण, गरिबी कमी करून सर्वसमावेशक आर्थिक वाढीला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका निभावू शकते.

Poultry Farming
Poultry Farming : ‘परसबागेतील कुक्कुटपालन’व्यवसायाद्वारे करा अंडी उत्पादन

दरडोई मांस आणि अंडी उपलब्धता

कोंबडीचे मांस आणि अंडी हे जगभरातील मानवी आहारातील प्राणी प्रथिनांचे सर्वात मोठे स्रोत आहे. राष्ट्रीय पोषण सल्लागार समिती दरवर्षी १८० अंडी आणि १०.८ किलो पोल्ट्री वापरण्याचा सल्ला देते. देशात वार्षिक दरडोई अंडी उपलब्धता ९०, तर मांस उपलब्धता ६.५२ किलोग्रॅम इतकी असल्याचे दिसते. तर राज्यांचा अंडी उत्पादनात सातवा क्रमांक असून प्रतिवर्ष दरडोई अंडी उपलब्धता ५२ इतकी असल्याचे दिसते. तथापि, सरकारी प्रोत्साहन आणि मांसाचा पुरवठा आणि उत्पादनात सातत्याने वाढ होत असूनही, भारतातील कुक्कुट उत्पादनांचा वापर कमीच असल्याचे दिसते.

कृषी क्षेत्राला तारक

गेल्या चार दशकांत भारतातील कुक्कुटपालन उत्पादनाने संपूर्णपणे असंघटित आणि अवैज्ञानिक शेती पद्धतीपासून ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या हस्तक्षेपांसह व्यावसायिक उत्पादन प्रणालीपर्यंत मजल मारली आहे. इंडिया पोल्ट्री मार्केट रिपोर्ट आणि फोरकास्टनुसार २०२१ मध्ये भारतीय पोल्ट्री मार्केटने सुमारे १७४९.९ अब्ज रुपये बाजारमूल्य गाठले आहे. आणि प्रथिनेयुक्त आहारांच्या वाढत्या मागणीमुळे २०२२ते २०२७ दरम्यान ८.१ टक्क्यांसह २८९७.६ अब्ज रुपयांपर्यंत वाढेल असा अंदाज आहे. अर्थात कुक्कुटपालन क्षेत्र अंड्यांपासून खतापर्यंत अशा अनेक मौल्यवान संसाधनांचा स्रोत शिवाय उत्तम पर्यावरण आणि पोषणासाठीही हातभार लावणारा किफायतशीर व्यवसाय आहे. अर्थात आर्थिक सर्वेक्षण २०२० मध्ये नमूद केल्याप्रमाणे एकूण कृषी जीडीपीमध्ये सुमारे २५.६ टक्के योगदानासह पशुधन उत्पन्न हे ग्रामीण कुटुंबांसाठी उत्पन्नाचा एक महत्त्वाचा दुय्यम स्रोत आहे.

ग्रामीण अर्थकारण सुस्थिर

आर्थिक सहयोग व विकास संघटनेच्या आणि एफएओच्या एका अहवालानुसार, या दशकाच्या अखेरीस, जागतिक स्तरावर, कुक्कुटपालनाद्वारे मांस स्त्रोतांमधील सर्व प्रथिनांपैकी ४१ टक्के प्रतिनिधित्व करेल अशी अपेक्षा आहे. गत दोन वर्षांतील कोविड-१९ मुळे उद्भवलेल्या सार्वजनिक आरोग्याच्या समस्येंवर कुक्कुटपालन उद्योगाने महत्त्वाची भूमिका पाडली आहे. तथापि खाद्याची उच्च किंमत, प्रतिजैविकांचा बेफिकीर वापर, जमिनीची कमतरता, पुलेट वेळेत उपलब्ध नसणे, पुलेटची जास्त किंमत, खाद्याची गुणवत्ता, पाण्याची कमतरता, विपणन अडचणी, आरोग्य समस्या, पत उपलब्ध नसणे विविध संसर्गजन्य रोंगामुळे, अफवांमुळे कोट्यवधी रुपयांचा फटकादेखील बसलेला पाहायला मिळतो.

उपरोक्त बाबी विचारा घेता कमी खर्चात चांगला नफा देणारा अशी ओळख असलेल्या कुक्कुटपालन व्यवसाय वृद्धिंगत होण्यासाठी शेतकऱ्यांची गुंतवणूक क्षमता आणि आर्थिक सुरक्षितता वाढवण्यासाठी पुरेशा भांडवल गुंतवणुकीतून, पुरवठा साखळी व्यवस्थापन आणि व्यवसाय प्रक्रियांमध्ये अधिक कार्यक्षमता आणण्यासाठी पायाभूत सुविधांची उभारणी, ब्रीडर फार्मिंग आणि हॅचरी उभारण्यात पुरेशी गुंतवणूक हवी.

या क्षेत्राला भेडसावणाऱ्या सामाजिक, सांस्कृतिक आणि तांत्रिक अडथळ्यांचे परीक्षण करून संशोधन, प्रशिक्षण आणि विस्तारासाठी सरकारी -खासगी गुंतवणुकीला प्रोत्साहन दिले पाहिजे. ग्रामीण भागातील असंघटित क्षेत्रातील शेतकरी शेतमजूर अल्पभूधारकांना शास्त्रशुद्ध कुक्कुटपालनासाठी अधिकाअधिक प्रवृत्त करण्यासाठी आवश्यक शिक्षण-प्रशिक्षण उपलब्ध करून दिले पाहिजे. जेणेकरून पुढील काळात कुक्कुटपालनाद्वारे ग्रामीण भागातील गरिबांचे जीवनमान उंचावणे, उद्योजकता निर्माण करणे, आणि स्वयंरोजगार उत्पन्न निर्मितीद्वारे ग्रामीण अर्थकारण कसे सुस्थिर करता येईल हे पाहायला हवे !

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com