कालवड संगोपनातील शंका निरसन
प्रश्न ः कालवड संगोपन करण्यापेक्षा बाजारातून गाय विकत आणणे परवडते का?
- उच्च वंशावळ, अधिक दुग्धोत्पादन असणाऱ्या गाईंची पैदास करण्यात आपण इतर राज्यांच्या तुलनेत खूपच मागे आहोत. वर्षानुवर्षे दुग्धव्यवसाय करूनही आज नवीन दुग्धव्यावसायिक किंवा दूध धंदा वाढवायचा आहे त्याला गाई घेण्यासाठी बेंगलूरू किंवा पंजाबला जावे लागते. तसेच आपला दूध धंद्यातील नफा फक्त दूध विक्रीशी संबंधित ठेवून आपण नेहमी अडचणीत सापडतो. यापेक्षा दूध उत्पादनाबरोबरच उत्तम गोपैदास करून, चांगले कालवड संगोपन करून त्यातून तयार होणाऱ्या अधिक दुग्धोत्पादन क्षमता असणाऱ्या गाईंची विक्री हा पर्याय सुद्धा उत्तम नफा कमावून देणारा आहे.
आज जरी कालवड संगोपन करण्यापेक्षा गाय विकत आणणे फायद्याचे वाटत असले तरीही आज ज्या कालवडीवर आपण खर्च करणार आहोत ती दोन वर्षांनंतर गाय बनणार आहे. तेव्हा उच्च आनुवंशिकता असलेल्या दुधाळ गाईची किंमत ही नक्कीच संगोपन खर्चापेक्षा अधिक असेल. त्यामुळे कालवड संगोपन करणे नक्कीच फायदेशीर असणार आहे, त्यासाठी फक्त कालवडीची आनुवंशिकता व भविष्यात तिच्यापासून किती दुग्धोत्पादन मिळणार आहे हे माहिती असायला हवे.
प्रश्न ः कालवड संगोपन हा स्वतंत्र व्यवसाय म्हणून फायदेशीर होऊ शकतो का?
- मागील लेखात आपण माहिती घेतल्याप्रमाणे एका कालवडीची गाय तयार करण्यासाठी किमान ६० ते ६५ हजार रुपये दोन वर्षात खर्च येतो. यात थोडे जरी व्यवस्थापन चुकले आणि कालवड गाभण राहण्याचा कालावधी वाढला तर संगोपन खर्चात आणखी वाढ होऊ शकते. कालवड गाभण राहून विक्रीस उपलब्ध होईपर्यंत त्यांच्यापासून कुठलेही उत्पन्न मिळत नाही. म्हणजेच जर फक्त कालवड संगोपन हा व्यवसाय म्हणून करायचा झाल्यास आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर खेळते भांडवल उपलब्ध असावे लागेल. फक्त कालवड संगोपन व्यवसाय म्हणून करण्याचे अनेक प्रयत्न आपल्याला अयशस्वी झाल्याचे पाहायला मिळतात. त्यामागील खेळते भांडवल उपलब्ध नसणे, कालवडीची आनुवंशिकता माहिती नसणे, शास्त्रीय पद्धतीने कालवड संगोपन न करणे इत्यादी कारणे आहेत.
व्यावसायिक पद्धतीने कालवड संगोपन करायचे झाल्यास संगोपनासाठी उच्च आनुवंशिकता असलेल्या कालवडी निवडाव्यात, ज्यामुळे भविष्यात आपल्याकडे कोणत्या क्षमतेची गाय तयार होणार आहे हे माहिती असेल आणि निकृष्ट दर्जाच्या कालवडीवर खर्च होणार नाही. मोठ्या प्रमाणावर कालवड संगोपन करायचे झाल्यास तज्ञ पशुवैद्यकांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शास्त्रीय नियोजन करावे. आहार, निवारा आणि इतर व्यवस्थापनासाठी संपूर्ण खर्चाचे नियोजन व्यवसाय सुरु करण्यापूर्वी असणे आवश्यक आहे. मिल्क रिप्लेसर, काल्फ स्टार्टर आणि सुका मेथी घास यांचा आहारात वापर, गरजेनुसार जंत निर्मुलन आणि लसीकरण करणे, घरचेच अधिक अधिक मनुष्यबळ वापरणे इत्यादी गोष्टी केल्यास कालवड संगोपन स्वतंत्र व्यवसाय म्हणून सुद्धा यशस्वी करता येतो.
प्रश्न ः सामुहिक कालवड संगोपन ही संकल्पना काय आहे? याचा पशुपालकांना कसा फायदा होऊ शकेल?
- सामुहिक कालवड संगोपनामध्ये सर्व पशुपालकांच्या कालवडी एका सर्व सोयींनी युक्त अशा सामुहिक कालवड संगोपन केंद्रावर एकत्र सांभाळल्या जातात. एकट्या पशुपालकाला काही गोष्टी करणे शक्य नसतात त्या अशा केंद्रावर एकत्रितरीत्या सहज उपलब्ध करता येतात, जसे की कालवडीसाठीचा खास निवारा, विविध आहार पूरक घटक, मिल्क रिप्लेसरचा वापर, लसीकरण, तज्ञ पशुवैद्यकाचा सल्ला व मार्गदर्शन इत्यादी. अशी केंद्र तयार झाल्यास पशू पालक हे त्यांच्या दुधाळ जनावरांवर पूर्ण क्षमतेने लक्ष देवू शकतील आणि खास तज्ञ व प्रशिक्षित व्यक्तींकडून कालवड संगोपन एकत्रितरीत्या केले जाईल. यामुळे कालवड संगोपनावरील खर्च कमी होईल, कालवडी लवकर तयार होतील आणि अधिक दुग्धोत्पादन असलेल्या कालवडी विक्रीस उपलब्ध होतील. अशी केंद्रे चालवण्यास काही खासगी कंपन्यांनी पुढाकार घेतल्यास भांडवल उपलब्धता सहज शक्य होईल.
प्रश्न ः कालवड संगोपनात विविध टॉनिकचा वापर कसा करावा?
- कालवड संगोपनात लिव्हर टॉनिक आणि जीवनसत्त्व AD३EH चे टॉनिक असे महत्त्वाची दोन टॉनिक सध्या वापरत आणली जातात. कालवडींना जंताची औषधे दिल्यावर तसेच लसीकरण केल्याने शरीरावर येणारा ताण कमी करण्यासाठी, तिची पचन क्षमता तसेच यकृताचे काम योग्य राहण्यासाठी कालवडींना लिव्हर टॉनिक देणे गरजेचे असते. लिव्हर टॉनिकमध्ये विविध ब जीवनसत्वे तसेच यकृताचा अर्क असतो. लिव्हर टॉनिक कंपनीच्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे सलग पाच दिवस आणि सर्वसाधारण पाच मिलि प्रती ५० किलो वजनाप्रमाणे वापरावे.
लिव्हर टॉनिक बरोबरच जीवनसत्त्व AD३EH चे टॉनिक सुद्धा वापरावे. यामुळे कालवडीला शरीरात विविध क्षार वापरणे शक्य होते, विविध संप्रेरके तयार होण्यास मदत मिळते, त्वचा तजेलदार होते आणि वजन वाढते. याचा वापर १ ते २ मिलि प्रती ५० किलो वजनाप्रमाणे महिन्यातून पाच दिवस वापरावे.
प्रश्न ः कालवडी अखाद्य वस्तू खातात, एकमेकांना चाटतात, स्वतःचेच मूत्र पितात किंवा माती, दगड खातात अशा वेळेस काय उपाय योजना कराव्यात ?
- कालवडीच्या वयानुसार व शरीराच्या वाढीनुसार विविध क्षार खनिजांची व जीवनसत्त्वांची गरज असते. जर संतुलित पशुखाद्य योग्य प्रमाणात वापरले तर अधिकचे क्षार खनिज मिश्रण वापरण्याची गरज नसते. परंतु आहार योग्य नसेल, संतुलित पशुखाद्य वापरलेले नसेल आणि काही घटकांची कमी असेल तर अनेक वेळा वासरे एकमेकांना चाटत असतात, एखादी वस्तू जसे दोरी, कापड इत्यादी खातात, किंवा स्वतःचेच किंवा दुसऱ्याचे मूत्र चाटत असतात त्यावेळेस क्षार खनिजे व जीवनसत्त्वांची पावडर किंवा चाटण विटा वापरल्या पाहिजेत. त्याचबरोबर ज्या भागातील जमिनीत फॉस्फरस घटकाची कमतरता आहे त्या भागात कालवडीला फॉस्फरस चे इंजेक्शन दिल्याने फायदा होतो. जेव्हा कालवडी माती किंवा दगड खातात तेव्हा प्रामुख्याने शरीरात मिठाची कमतरता असते, तेव्हा कालवडी फक्त दुधावरच वाढवल्या जातात. त्यांना मीठ अर्थात सोडियम घटकाची कमतरता आढळून येते. असे असल्यास कालवडीच्या आहारात मिठाचा समावेश करावा.
प्रश्न ः कालवड संगोपनास सरकारी अनुदान मिळते का? मिळत असेल तर ते कसे मिळवावे?
उत्तर - पशुसंवर्धन विभागाच्या “राज्यातील गायी-म्हशींची उत्पादकता वाढविण्यासाठी सर्वसमावेशक आनुवंशिक सुधारणा कार्यक्रम” या योजनेअंतर्गत कालवड संगोपन साठी अनुदान उपलब्ध आहे. पशुपालकांनी या योजनेत सहभागी होण्यासाठी नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात आपल्या कडील उच्च उत्पादक गाई, म्हशींसाठी जून, जुलै महिन्यात अर्ज करावा, अर्जांची छाननी होऊन राज्यस्तरावरून निवड करण्यात येते. निवड झालेल्या उच्च दुग्धोत्पादन असलेल्या गाई, म्हशींना उच्च आनुवंशिकता असलेल्या वळूची रेतमात्रा वापरून कृत्रिम रेतन करण्यात येते. त्यातून जन्माला आलेल्या कालवडीचे योग्य संगोपन केल्यास सहा महिने वय पूर्ण झाल्यानंतरचे वजन मोजून योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार वजन असल्यास प्रती कालवड पाच हजार रुपये अनुदान देण्यात येते.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.