Animal Care : जनावरांमधील धनुर्वातावर उपाययोजना

Animal Disease : धनुर्वात (टिटॅनस) हा जनावर आणि मानवाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार टेटॅनस टॉक्सीन विषामुळे होतो. जिवाणू स्नायूंमध्ये वाढत असताना टेटॅनोस्पाझ्मीन हे घातक विष उत्सर्जित करतात.
Animal Care
Animal Care Agrowon

डॉ. अर्चना कदम, डॉ. सुधाकर आवंडकर

धनुर्वात (टिटॅनस) हा जनावरे आणि मानवाच्या मज्जातंतूंना जडणारा विषजन्य आणि जीवघेणा आजार आहे. हा आजार टेटॅनस टॉक्सीन विषामुळे होतो. क्लोस्ट्रिडियम टिटॅनी हे जिवाणू माती तसेच बहुतांश प्राण्यांच्या आतड्यांमध्ये असतात. माती, धूळ आणि गंजलेल्या टोकदार वस्तूंवर जिवाणू किंवा त्यांचे बीजाणू मोठ्या संख्येने दिसून येतात.

जखमेचा संपर्क माती, धुळीसोबत आल्यास किंवा गंजलेल्या लोखंडाच्या वस्तूने जखम झाल्यास जिवाणू संसर्ग होऊ शकतो. क्लॉस्ट्रिडियम टेटानी या जिवाणूंचा संसर्ग झाल्यास जिवाणू वाढीदरम्यान टेटॅनस टॉक्सीन विष तयार करतात. या विषाचा थेट परिणाम मज्जातंतूंवर होतो. विशेषकरून चेहरा व इतर स्नायू आखडले जातात. म्हणून या आजारास लॉकजॉ असे म्हणतात.

कोणत्याही प्रकारची जखम तसेच अगदी साध्या ओरखड्यातून हे जिवाणू शरीरात आत शिरू शकतात. हे जिवाणू प्राणवायूच्या संपर्कात वाढू शकत नाहीत. मात्र स्नायूंमधील प्राणवायू विरहित वातावरणात जिवाणूंची वाढ सहज होते. ऐच्छिक स्नायूंना आकडी येऊन ते ताठरणे हे या आजाराचे वैशिष्ट्य आहे.

याचे संक्रमण बाधित प्राण्याच्या संपर्कातून, खाद्य, पाणी तसेच हवेतून होत नाही. गाय, कुत्रा, मांजर आणि वराहामध्ये या आजाराला प्रतिकार करण्याची शक्ती जास्त असते. मात्र शेळ्या, मेंढ्या, घोडा व मनुष्यामध्ये संसर्ग जास्त प्रमाणात आढळतो. नवजात पिलांमध्ये नाळ कापताना झालेल्या संसर्गातून तत्काळ संक्रमण होऊन धनुर्वात उद्‌भवू शकतो.

Animal Care
Animal Care : प्रतिबंधात्मक लसीकरणाचे महत्त्व, घ्यावयाची काळजी

आजाराची लक्षणे ः

१) जिवाणू संसर्ग झाल्यानंतर आजार होण्याचा कालावधी तीन ते एकवीस दिवसांच्या दरम्यान असू शकतो.

२) जिवाणूंचा उबवण काळ साधारणपणे दोन दिवस ते दोन आठवडे असतो; परंतु काही वेळा हा काळ तीन महिन्यांचा असू शकतो. हा काळ जेवढा अधिक तेवढा आजार सौम्य असतो.

३) शरीरात जिवाणूंनी प्रवेश केल्यानंतर ३ ते १४ दिवसांत आजाराची लक्षणे दिसू लागतात.

४) जिवाणू स्नायूंमध्ये वाढत असताना टेटॅनोस्पाझ्मीन हे घातक विष उत्सर्जित करतात. विषाच्या प्रमाणानुसार आणि बाधित जनावराच्या प्रतिकार क्षमतेनुसार आजाराची तीव्रता ठरते.

५) ज्या ठिकाणी हे जिवाणू शरीरात प्रवेश करतात आणि वाढतात, त्या ठिकाणापासून विष रक्तप्रवाहात मिसळून चेतापेशींपर्यंत पोहोचून चेतापेशींना इजा करते.

६) विषाचा परिणाम मेंदू, मज्जासंस्था तसेच पाठीच्या कण्यावर होतो. नसा काम करणे बंद करतात. परिणामी, स्नायूंची हालचाल बंद होते. स्नायू आखडतात. जनावराला हालचाल करता येत नाही. जनावर खाली पडते.

७) जबडा उघडता व बंद करता येत नाही. पाणी पिणे, खाद्य खाणे बंद होते. आजाराच्या सार्वदेहिक प्रकारात शरीरातील सर्व स्नायू आकुंचन पावतात. स्थानिक धनुर्वातामध्ये जखमेलगतचे स्नायू आकुंचन पावतात. योग्य उपचार वेळेत न मिळाल्यास मृत्यू येतो.

Animal Care
Animal Care : दूध, आरोग्य अन् अर्थकारणावरही परिणाम

घोड्यांमधील लक्षणे ः

- कान आणि शेपटी ताठर आणि उंच होते. नाकपुड्या रुंद होतात.

- डोळ्यातील तिसरी पापणी आकुंचन पावते. चालणे, वळणे, आणि मागे येणे कठीण होते.

- मान आणि पाठीच्या स्नायूंना उबळ येते. पायांचे स्नायू ताठर होतात. घोडा चारही पाय ताठ फाकवून करून उभा राहतो. घाम येतो.

- इतर अवयवांच्या स्नायूंची उबळ रक्त प्रवाह आणि श्‍वासोच्छ्वासास अडथळा निर्माण करतात.

- हृदयाची आणि श्‍वासोच्छ्वासाची गती वाढते. श्‍लेष्म त्वचा लाल होतात.

- श्‍वासोच्छ्वास बंद पासून ८० टक्के बाधित घोडे मृत्यू पावतात.

जनावरांतील लक्षणे ः

- जनावरे, शेळ्या आणि मेंढ्यांमध्ये सुरुवातीस ताठरपणा येतो. चालता येत नाही. स्नायूंना मुरळ आणि उबळ येते.

- चेहऱ्याचे स्नायू आखडले जातात. डोळ्याची तिसरी पापणी लक्षणीयरीत्या बाहेर येते. चाल अस्थिर होते तसेच शेपटी ताठर आणि उंच होते.

- बाधित जनावर चिंताग्रस्त आणि अति उत्साही होते. रवंथ करणे बंद होते. पोट फुगते.

- जनावर खाली पडते, पाय ताठर होतात. स्नायू आकडतात, मृत्यू येतो.

श्‍वान, मांजरांमधील लक्षणे ः

- स्थानिक धनुर्वात जास्त प्रमाणात आढळून येतो.

- बाधित श्‍वानांमध्ये पाय, जखमेच्या भोवतालच्या स्नायू कडक होतात. स्नायू आकुंचन पावतात, थरथरतात.

- स्थानिक धनुर्वाताचे रूपांतर व्यापक आणि सार्वदेहिक प्रकारात होण्याची शक्यता असते. सार्वदेहिक धनुर्वातात शरीराचे विविध भाग प्रभावित होतात.

- बाधित जनावर ताठ चालते. शेपटी उंच आणि ताठ होते.

- प्राण्यांना वाकता येणार नाही एवढा ताठरपणा शरीरात येतो.

- चेहऱ्याचे स्नायू बाधित होतात. डोळ्याची तिसरी पापणी सुजून येते.

- स्नायूमध्ये उबळ आल्याने कपाळावर आठ्या पडतात. ओठ मागे खेचले जातात. जबडे बंद होतात.

- गिळता येत नाही. लाळ जास्त प्रमाणात गळते. बाधित स्नायू दुखतात आणि जीवघेणा ताप येतो.

- बद्धकोष्टता येते. लघवीस त्रास होतो. कंठावर उबळ येऊन श्‍वसनास त्रास होते.

- हृदयाचे स्पंदने आणि रक्त दाब कमी जास्त होतो, मृत्यू येण्याची शक्यता बळावते.

निदान ः

- लक्षणांवरून हा आजार सहज ओळखता येतो. प्रयोगशाळेत सूक्ष्मदर्शकाखाली जिवाणू पाहून निदान करतात.

- आजाराच्या निदानाची सेवा विद्यापीठाच्या सर्व पशुवैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपलब्ध आहे.

प्रतिबंध आणि नियंत्रण ः

- जनावरांमध्ये विशेषतः घोड्यांमध्ये टेटॅनस टॉक्सोइडचे (टी.टी.) लसीकरण करावे.

- गाभण जनावरांना धनुर्वाताची लस द्यावी. त्यामुळे मातेकडून अर्भकांना प्रतिकारशक्ती प्राप्त होते. अर्भकांना धनुर्वात होत नाही.

- लसीकरणामुळे नवजात अर्भकांमध्ये मृत्यूच्या प्रमाणात लक्षणीय घट होते. जखम झाल्यास, ती स्वच्छ करावी.

- जखम धुण्यासाठी योग्य प्रतिजैविकांचा वापर करावा. गोठ्यांची स्वच्छता ठेवावी.

- जिवाणूंची संख्या कमी करण्यासाठी पशुवैद्यकाच्या सल्ल्याने प्रतिजैविकाचा वापर करावा.

- जखमी प्राण्यास धनुर्वाताच्या निर्विषीकरणाची लस द्यावी. जनावरांना जखमा होऊ नये यासाठी दक्षता घ्यावी.

डॉ. अर्चना कदम, ८५५२८३५३९५

डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९

(महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com