Goat Poisoning : शेळ्यांमधील विषबाधेवर उपाययोजना

Goat Management : पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात विषारी गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते अशा वेळी चरताना शेळ्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते.
Goat Farming
Goat FarmingAgrowon

डॉ. अर्चना कदम -पाटील, डॉ. प्राजक्ता जाधव

Goat Farming : पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात विषारी गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते अशा वेळी चरताना शेळ्यांना विषबाधा होण्याची शक्यता असते. विषबाधेची कारणे, लक्षणांची माहिती घेऊन पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना करावी.

पावसाळ्यात मोठ्या प्रमाणावर हिरवा चारा उपलब्ध असतो. शेळ्या चरत असताना त्यांच्या खाण्यात विषारी तण आणि आजूबाजूच्या अखाद्य वनस्पती येतात. तसेच पावसाळ्यात शेती, गोठ्याच्या आजूबाजूच्या परिसरात विषारी गवताची वाढ मोठ्या प्रमाणात होते अशा वेळी शेळ्यांना विषबाधा होण्याची शक्यता जास्त असते. ज्वारीचे कोवळे धांडे खाण्यात आल्याने, युरिया किंवा तत्सम खते यांच्या संपर्कात आल्यामुळे, कीड- रोगनियंत्रणासाठी फवारलेली कीटकनाशके, तणनाशक, उंदीरनाशक इत्यादी घटक शेळ्यांच्या खाद्यामध्ये आल्यामुळे विषबाधा होते. या विषबाधेमुळे विविध दुष्परिणाम दिसून येतात. विषबाधेमुळे शेळ्या मृत्यू पावण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे विषबाधेची कारणे, लक्षणांची माहिती घेऊन वेळेवर पशुवैद्यकाच्या सल्ल्याने उपाययोजना करावी.

कीटकनाशक फवारलेली पिके, विषारी औषधांमुळे विषबाधा ः
- पिकांवर रोग किंवा किडींचा प्रादुर्भाव दिसून येताच कीटकनाशकांची फवारणी केली जाते. असे पीक जनावरांच्या खाण्यात आल्यास विषबाधा होऊ शकते.
- फवारणी केल्यानंतर जर पाऊस आला तर पिकांवरील कीडनाशक पाण्यात वाहून येते. हे पाणी शेळ्यांच्या पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतात मिसळल्यास विषबाधा होते.

लक्षणे ः
- हिरड्या चमकदार लाल होणे, अशक्तपणा, नीट चालता न येणे, फेफरे येणे, श्‍वास घेण्यास त्रास होणे आणि त्यानंतर श्‍वसनक्रिया बंद होते.
- शेळ्या चरताना विषारी वनस्पती खाण्याचे टाळतात किंवा खात असतील तर, फक्त थोड्या प्रमाणात खातात. जर अति प्रमाणात कीटकनाशके किंवा इतर रसायने खाण्यात आले तर अशा शेळ्या लाळ गळतात, थरथर कापतात, शरीर हेलपाटते, अस्वस्थता, झटके देतात, पोट फुगते, पाय लुळे पडतात.
- जलद श्‍वासोच्छ्वास, अशक्तपणा, जुलाब, पोटात वेदना होतात. दात खातात. शरीराचे तापमान कमी होते.

Goat Farming
Goat Diseases : शेळ्यांमधील रोगाला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

उपाययोजना ः
१) तणनाशक, कीटकनाशकाच्या रिकाम्या बाटल्या, कॅन उघड्यावर फेकल्यास शेळ्या ते चाटतात. त्यामुळे कॅन किंवा बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावावी. आशा बाटल्या धुऊन इतर कामांसाठी वापरू नये. त्या पाण्याच्या स्रोतामध्ये उदा. नाला, तळी, उपळ्याच्या जागा इत्यादी ठिकाणी फेकू नयेत.
२) बऱ्याच वेळा फवारणी करून उरलेली कीटकनाशके घराच्या बाहेर, गोठ्याच्या भिंतीशेजारी ठेवली जातात. अनवधानाने कीटकनाशकाची बाटली किंवा पावडर जनावरांनी चाटली तरीदेखील विषबाधा होते.
३) पिकांवर फवारायची कीडनाशके वेगवेगळी ठेवावीत. गवतावर तणनाशक फवारल्यानंतर शेताच्या बांधावर शेळ्या जनावर जाणार नाहीत याची खबरदारी घ्यावी किंवा तसे गवत व फळभाज्यांचे अवशेष खाऊ घालणे टाळावे.
४) विषबाधा झालेल्या शेळीपासून तिचे दूध पिणाऱ्या पिलास विषबाधा होऊ शकते. 
५) बऱ्याच वेळा शेळ्यांच्या अंगावर उवा, गोचीड नियंत्रणासाठी गोचीडनाशकाची फवारणी केली जाते. जर शेळ्यांच्या अंगावर जखम किंवा खरचटलेले असेल तर गोचिडनाशकाची विषबाधा होते. 

Goat Farming
जनावरांतील कॅल्शिअम विषबाधेवर उपाययोजना

उपचार:
१) विषबाधेची लक्षणे निदर्शनास येताच ताबडतोब नजीकच्या
पशुवैद्यकाशी संपर्क साधावा. कोणत्या प्रकारचे कीटकनाशक पिकावर फवारलेले आहे, हे तपासून उपचाराची दिशा ठरवावी लागते. त्यासाठी पशुवैद्यकाचा सल्ला महत्त्वाचा ठरतो.
२) शेळ्यांना शांतता आणि आराम मिळेल असे वातावरण ठेवावे. स्वच्छ चारा व भरपूर पाणी द्यावे.
३) विषबाधा त्वचेमार्फत झाल्यास शेळ्यांना भरपूर पाण्याने अंघोळ घालावी. शरीर घासू नये.

युरियाची विषबाधा
१) ही विषबाधा सर्व पाळीव प्राण्यांमध्ये होते. विषबाधा होऊन बऱ्याच जनावरांचा मृत्यू होतो.
कारणे ः
१) युरियाचा पशू पशुखाद्य किंवा खाद्यातील घटकांशी संपर्क येणे किंवा अधिक वापर. उदा. युरिया- मोलॅसिस ब्लॉक, मुरघास बनविणे, युरिया ट्रीटेड स्ट्रॉ इत्यादी
२) युरिया प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीन पेंड किंवा सोयाबीन भरडा खाऊ घातल्यास.
३) युरिया किंवा इतर खतांची पोती शेळ्यांनी चाटल्यास.
लक्षणे ः
१) तोंडाला फेस येतो, नीट उभे राहता येत नाही.
२) पोटफुगी होते, पोटामध्ये वेदना होतात. शेळ्या सतत ऊठबस करतात.
३) डोळे मोठे होतात. झटके येतात, बेशुद्ध होऊन शेवटी मृत्यू होतो.
४) अधिक प्रमाणात युरिया खाल्ला असेल, तर अर्ध्या तासांमध्येच मृत्यू होतो.

उपचार ः
१) युरियाची विषबाधा झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्वरित खाद्यातून तो घटक वेगळा करावा. शेळ्यांना थंड पाणी पिण्यास द्यावे. पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने तातडीने उपचार सुरू करावेत.

प्रतिबंधात्मक उपाय ः
१) शेतात पेरणी सुरू असताना खतांची पोती उघडी राहणार नाहीत याची काळजी घ्यावी. पोत्याचे तोंड व्यवस्थित बांधून घ्यावे.
२) मोकळ्या सोडलेल्या शेळ्या खत खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
३) पशुखाद्यामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात युरियाचा वापर करू नये.
४) पशुखाद्य पोती आणि खताची पोती वेगवेगळ्या ठिकाणी ठेवावीत.
५) युरियाची प्रक्रिया केलेल्या चाऱ्यासोबत सोयाबीनची पेंड किंवा सोयाबीनचा भरडा जनावरांना खाऊ घालू नये.

ज्वारीचे कोवळे पोंग्यामुळे होणारी विषबाधा ः
१) या विषबाधेला ‘किरळ लागणे’ असे म्हणतात.

कारणे ः
१) कोवळ्या पोंग्यामध्ये धुरीन नावाचा विषारी घटक असतो. हे पोंगे खाल्यानंतर पोटात धुरीनपासून हायड्रोसायनिक ॲसिड तयार होते. हे हायड्रोसायनिक ॲसिड विषबाधा करते.

प्रतिबंधात्मक उपाय ः
१) खाद्यात कीटकनाशक फवारलेला चारा येणार नाही याची काळजी घ्यावी.
२) चरायला मोकळे सोडल्यानंतर शेळ्या अखाद्य वस्तू आणि विषारी वनस्पती खाणार नाहीत याची काळजी घ्यावी.
३) शेळ्या चरताना कोवळे पोंगे आणि युरियाच्या संपर्कात येऊ देऊ नये.
४) विषबाधा झाली आहे, अशी शंका येताच सर्वप्रथम सध्या वापरात असलेले शेळीच्या आहारातील सर्व घटक पशुवैद्यकाकडून तपासून घ्यावेत.

संपर्क ः डॉ. अर्चना कदम -पाटील, ८५५२८३५३९५
(सहायक प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, उदगीर, जि. लातूर)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com