
डॉ. महेश जावळे, डॉ. शीतल चोपडे, डॉ. सुधीर कविटकर
भाग ः २
Animal Health : पोटाचे चारही भाग पचन प्रक्रिया सुरळीतपणे होण्यासाठी आणि पशू निरोगी राखण्यासाठी महत्त्वपूर्ण आहेत. या भागांचे कार्य, परस्पर सहकार्य आणि कार्यक्षमतेवर अवलंबून असते. त्यामुळे पशूंना झालेला आजार दूर करण्यासाठी त्वरित लक्ष देऊन आवश्यक उपाययोजना कराव्यात.
गाई,म्हशी, मेंढ्या आणि शेळ्या यांसारख्या पशूंकडे तंतुमय पदार्थयुक्त चारा आणि निकृष्ट दर्जाच्या खाद्य पदार्थांचा आहारात वापर करून त्यापासून ऊर्जा निर्मिती करून उत्पादन देण्याची विलक्षण क्षमता असते. यामुळे पशू संगोपनातील खर्च कमी होऊन उपलब्ध संसाधनांचा इष्टतम वापर शक्य होते.
जनावरांच्या पोटाचे भाग ः
रुमेन ः
- रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचा पहिला भाग म्हणजे रुमेन. जे जनावरांच्या अन्ननलिकेशी जोडलेले असते. हा भाग चघळलेल्या खाद्याची साठवण म्हणून काम करतो. या भागात मऊ झालेल्या खाद्याचे गोळे तयार केले जातात. यामध्ये चाऱ्याचे मोठे, न पचणारे तुकडे असतात, ज्यांना पुन्हा पुन्हा चघळले जाते नंतर गिळले जाते.
- या भागात मोठ्या प्रमाणामध्ये किण्वन प्रक्रिया होते. रुमेन हा रवंथ करणाऱ्या जनावरांच्या पोटाचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा भाग आहे. यातील जीवाणू, प्रोटोझुआ आणि बुरशी तंतुमय खाद्यांमध्ये असलेल्या जटिल कर्बोदकांचे विघटन करण्यामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. या किण्वन प्रक्रियेतून बाष्पशील फॅटी ॲसिडस् (मेदाम्ले) तयार होतात, जे रवंथ करणाऱ्या जनावरांसाठी प्राथमिक ऊर्जा स्रोत म्हणून काम करतात.
- रुमेनच्या आतील भागास असणाऱ्या पॅपिलेद्वारे पोषक द्रव्ये शोषून घेतले जाते. किण्वन प्रक्रिया सुलभ करून खाद्यातील प्रथिनांचे विघटन करण्यासाठी आणि पचन होण्यासाठी आवश्यक जिवाणू आणि सूक्ष्मजंतू तयार करतात.
-रुमेनमधील सूक्ष्मजीव खाद्यातील कार्बोदकांचे (सेल्युलोज आणि जटिल स्टार्च) पचन होण्यासाठी तसेच प्रथिने, बी जीवनसत्त्वे आणि जीवनसत्त्व के यांचे निर्मितीसाठी जबाबदार असतात.
- रुमेनमध्ये सामान्यत: सामू ६.५ ते ६.८ पर्यंत नियंत्रित केला जातो. सूक्ष्मजीवांच्या इष्टतम वाढीसाठी उबदार, ओलसर, ऑक्सिजनमुक्त वातावरण आवश्यक असते. या प्रकारचे वातावरण रुमेनमध्ये नैसर्गिकरित्या १०० ते १०८ अंश फॅरानाईट तापमान श्रेणीसह राखले जाते.
- गाई, म्हशींच्या आहारात वेगवेगळ्या प्रकारच्या खाद्याचा समावेश असल्यामुळे रुमेनमध्ये खाद्य कणांचे स्तरीकरण होते. सर्वात वरचा भाग वायूंनी व्यापला असतो, त्याखाली द्रव सामग्रीवर तंतुमय पदार्थ अधिक असलेल्या खाद्य पदार्थांचा तरंगणारा थर असतो. सर्वात खाली तळाशी खाद्याचे जड कण असतात.
- प्रौढ पशुमध्ये पचन क्रियेदरम्यान सुमारे ३० ते ५० लिटर प्रती तास या प्रमाणात वायू तयार होतात, जे कालांतराने उत्सर्जित केले जातात. रुमेनमध्ये तयार होणाऱ्या वायूंमध्ये कार्बन डायऑक्साईड, मिथेन आणि हायड्रोजन सल्फाइड यांचा समावेश होतो .
- प्रौढ पशूच्या रुमेनमध्ये सुमारे १५० ते १६० लिटर पदार्थ साठवण्याची क्षमता असते. संपूर्ण पोटाच्या सुमारे ८४ टक्के भाग, रुमेन आणि रेटीकुलमद्वारे व्यापलेला असतो.
- काही सामान्य आरोग्य समस्यांमध्ये जसे पोटफुगी (ब्लोट), आम्लविषार वाढणे (अॅसिडोसीस) आणि रुमेनाइटिसमध्ये रुमेनचे कार्य बाधित होते. वेळीच पशुवैद्यकीय मदत देऊन यावर मात करता येते.
रेटीकुलम ः
- या जाळीदार भागाचे आतील अस्तर मधाच्या पोळ्यासारखे दिसते. रेटिक्युलम केवळ पातळ पडद्याने रुमेनला जोडलेले असते.
- अखाद्य जड किंवा दाट वस्तू जसे की धातूचे तुकडे, दगड, जे पचण्याइतपत लहान नसतात अशा वस्तू या भागाच्या जाळीमध्ये
अडकतात. खाद्य पुन्हा तोंडात आणण्याच्या प्रक्रियेस रेटीकुलम सुलभ करते. या भागात सुमारे १५ ते २० लिटर खाद्य साठवले जाते.
- खाद्यात आलेल्या अखाद्य वस्तूंच्या सेवनामुळे पोटाच्या या जाळीदार भागास अपाय होतो.
- जेव्हा जनावरे जड किंवा तीक्ष्ण अखाद्य वस्तू खातात जसे की खिळे, स्क्रू, वायर, अशा वस्तू जाळीमध्ये घुसून बसतात. पोटाच्या भिंतीला छिद्र पाडू शकतात. चुंबकीय उपकरणांच्या मदतीने तसेच एक्स रे, अल्ट्रासाऊंडद्वारे या आजाराचे निदान केले जाते.
ओमेझम
-ओमेझम हा भाग गोलाकार असतो, एका लहान नळीने रेटीकुलमशी जोडलेला असतो. या भागात पुस्तकाच्या पानांसारखे अनेक पट असतात, हे पट या भागाचे क्षेत्रफळ वाढवण्यास मदत करतात, ज्यामुळे खाद्य आणि पाण्यातील पोषक द्रव्ये अधिक क्षमतेने शोषून घेण्यास मदत होते.
- ओमेझम हे रुमेन आणि रेटिक्युलमपेक्षा लहान असते, जे एकूण पोटाच्या सुमारे १२ टक्के असते. या भागाची धारण क्षमता सुमारे ५० ते ६० लिटर असते.
अॅबोमॅझम (जठराशय) ः
- अॅबोमॅझम हा पोटाचा शेवटचा भाग आहे. यास खरे पोट म्हणून ओळखले जाते, कारण या भागाचे कार्य एक पोट असणाऱ्या प्राण्यांसारखे असते.
- पोटातील फक्त या भागात अनेक ग्रंथी असतात. या ग्रंथी हायड्रोक्लोरिक ॲसिड आणि पाचक एंझाइम स्त्रवतात, ज्यामुळे अॅबोमॅझममध्ये खाद्य आणि चाऱ्याचे विघटन होण्यास मदत होते.
- अॅबोमॅझम श्लेष्मल स्त्राव करते, जेणेकरून त्याच्या आतील भिंतीतील पेशींना ॲसिडमुळे नुकसान होण्यापासून संरक्षण होते.
- अॅबोमॅझममधील सामू साधारणपणे ३.५ ते ४ पर्यंत असते. इतर तीन भागांपेक्षा अॅबोमॅझमचा आकार लहान असतो. याची फक्त २५ ते ३० लिटर साठवण क्षमता असते.
वासरांमधील पोटाच्या रुमेन भागाचा विकास ः
-रवंथ करणाऱ्या पशूंचे एकंदरीत स्वास्थ्य रूमेनमधील पाचन प्रणालीवर अवलंबून असते. तंतुमय पदार्थ जास्त असलेल्या चाऱ्याला आणि इतर खाद्याला ऊर्जेमध्ये रूपांतरित करण्यासाठी, त्यांचे रुमेन नेहमीच निरोगी आणि योग्यरित्या विकसित असले पाहिजे.
- वासरू जेवढ्या लवकर खाद्य खाण्यास आणि ते पचविण्यास सक्षम बनेल, तेवढ्या लवकर वासरांची वाढ जोमाने होण्यास मदत होईल.
- जेव्हा वासराचा जन्म होतो, तेव्हा रुमेन पोट विकसित नसते. जन्माच्या वेळी फक्त अॅबोमॅझम पूर्णपणे विकसित होते. हे पशू आपले जीवन श्वान, वराह, मनुष्य यांच्याप्रमाणे, एक पोट असणारे प्राणी म्हणून सुरू करतात. यामध्ये मानवी पोटाप्रमाणेच प्रक्रिया करण्याची क्षमता असते.
- वासरांमध्ये दूध आणि मिल्क रिप्लेसरचे पचन अॅबोमॅझम मध्ये होते. पोटाचे इतर तीन भाग अस्तित्वात असतात, परंतु ते अविकसित असतात आणि जोपर्यंत वासरू फक्त दूध सेवन करतात तोपर्यंत त्यांचा वापर होत नाही.
- जसजसे वासरू धान्य, खुराक आणि चारा खाण्यास सुरवात करते, तसतसे जिवाणू, सूक्ष्मजंतू रुमेन आणि रेटिकुलममध्ये विकसित होतात. या जीवाणूंच्या पुढील किण्वन प्रक्रियेमुळे रुमेनचा विकास सुरू होतो.
- दूध आणि मिल्क रिप्लेसर रुमेन आणि रेटिकुलमला बायपास करतात, परंतु कोरडे खाद्य या भागात जमा होते, ज्यामुळे रुमेन विकासासाठी आवश्यक रासायनिक बदल सुरू होतात.
- रूमेनमधील कोरडे खाद्य जनावरांनी आधीच घेतलेले पाणी शोषून घेते, जिवाणूंच्या वाढीसाठी योग्य परिस्थिती निर्माण करते. ते जीवाणू नंतर पोषक द्रव्यांचे चयापचय करण्यास आणि अस्थिर फॅटी ॲसिड तयार करण्यास मदत करतात. ॲसिड्सचे निष्प्रभावीकरण करून आणि जीवाणूंच्या वाढीस चालना देऊन रुमेनचा सामू प्रभावीपणे कमी करतात.
- जीवाणूंद्वारे तयार होणारे आम्ल रुमेनच्या विकासासाठी आवश्यक ऊर्जा तयार करतात. पर्यायाने संपूर्ण वासराची वाढ योग्यरित्या होण्यास सुरवात होते.
- रुमेनच्या विकासातील सर्वात महत्त्वाच्या घटकांपैकी एक म्हणजे दूध बंद करणे. वासराचे दूध पूर्णपणे बंद करण्यापूर्वी वासराचे रुमेन पूर्ण विकसित होण्यासाठी योग्य वेळ द्यावा. रुमेनचा विकास व्यवस्थित होण्यासाठी, वासराचे दूध पूर्णपणे बंद करण्यापूर्वी त्याने सुमारे तीन आठवडे दररोज खुराक मिश्रण सेवन करणे महत्त्वाचे ठरते. हा कालावधी, वासरांच्या रुमेन मध्ये पुरेशी सूक्ष्मजंतू संख्या वाढण्यास आणि शोषक क्षमता स्थापित करण्यास आवश्यक असतो.
- या अवस्थेपूर्वी वासराचे दूध बंद केल्यास, रुमेनमध्ये पोषण वातावरण निर्मिती न झाल्यामुळे आवश्यक ऊर्जेअभावी वासराचे वजन कमी होऊ शकते. रुमेन विकसित होण्यास जास्त कालावधी लागू शकतो.
- रुमेनच्या योग्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी वासरांची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. वासरांना दर्जेदार आहार द्यावा. वासरू जर तणावग्रस्त किंवा आजारी असेल तर खाण्यास नकार देऊ शकते. शेडमधील वातावरण सतत कमी तणाव असलेले ठेवावे.
- वासरांना स्वच्छ पाणी द्यावे. स्टार्टर खाद्य अति बारीक असल्यास किंवा बुरशी लागलेले असल्यास, वासरे असे खाद्य खात नाहीत.
- वासरांच्या आहारातील द्रव आणि घन खाद्याचे योग्य संतुलन राखावे.
संपर्क ः
डॉ. महेश जावळे, ९२७३७३००१५
(पशुपोषण शास्त्र विभाग, नागपूर पशुवैद्यक महाविद्यालय, नागपूर)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.