Animal FMD Disease : ‘लाळ्या खुरकूत'चा प्रसार रोखा

Animal Health : सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागात लाळ्या खुरकूत आजाराची साथ येते. हा आजार खूर विभागलेल्या जनावरांना होतो.
Animal Health
Animal HealthAgrowon

डॉ. सागर जाधव

Animal Care : सर्वसाधारणपणे डिसेंबरपासून ते जून महिन्यापर्यंत बऱ्याच भागात लाळ्या खुरकूत आजाराची साथ येते. हा आजार खूर विभागलेल्या जनावरांना होतो. अत्यंत वेगाने पसरणारा विषाणूजन्य संसर्गजन्य आजार आहे.

आजाराचा प्रादुर्भाव ‘पिकोर्नाविरिडी’ या कुळातील ''अप्थो व्हायरस'' या विषाणूमुळे होतो. याचे ७ उपप्रकार आहेत त्यापैकी ४ उपप्रकार भारतात आढळून आले आहेत (ओ, ए, सी, आशिया-१).

प्रसार:

प्रसार बाधित जनावरांच्या प्रत्यक्ष संपर्काद्वारे किंवा बाधित पाणी आणि चारा इत्यादींच्या माध्यमातून अप्रत्यक्ष होतो. त्याचप्रमाणे जनावरांचे संगोपन करणाऱ्या व्यक्तीद्वारे होतो.

विषाणूचा प्रसार हवा, श्वासोच्छ्वास, जनावरांची पाण्याची भांडी, शेण, मूत्र, चारा, गव्हाणी, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी, नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्यामार्फत होतो.

ज्या ठिकाणी गावातील जनावरे चराईसाठी आणि पाणी पिण्यासाठी एकत्र सोडली जातात त्या ठिकाणी आजाराचा प्रसार वेगाने होतो.

Animal Health
Animal Disease Control : लाळ्या खुरकुतावर नियंत्रण ठेवा...

लक्षणे:

जनावरास ताप येतो (१०४ ते १०६ अंश फॅरेनहाइट).

जनावरांच्या जिभेवर, टाळूवर व तोंडाच्या आतील भागात फोड येतात नंतर ते फुटतात. तोंडातून चिकट तारेसारखी लाळ गळते. पायातील खुरांच्या बेचक्यात, कासेवर फोड येऊन फुटतात, जखमा होतात.

पायाने अधू असलेले जनावर पाय सारखे झटकत असते.

तोंडातील जखमांमुळे जनावरांना चार खाता येत नाही,जनावरे अशक्त होतात. दूध उत्पादनात घट येते.

दूध, मांस, लोकर उत्पादनावर परिणाम होतो.

संकरित गाई या आजारास अत्यंत संवेदनशील आहेत. शरीरात थकवा जाणवतो, अशक्तपणा येतो.

लहान वासरांमध्ये आजाराचा प्रादुर्भाव झाल्यास हृदयाचे स्नायू निकामी झाल्याने काहीही लक्षणे न दाखवता मरण पावतात.लहान वासरांमध्ये ५० टक्क्यांपर्यंत मरतुक होते.

उपचार :

हा विषाणूजन्य आजार असल्याने यावर कोणताही तातडीचा उपचार नाही. लक्षणांवरून उपचार करावेत, जेणेकरून जनावर बरे होण्यास मदत होईल आणि अन्य दुय्यम संसर्ग होणार नाही.

आजाराची लक्षणे दाखवणारे जनावर दिसून आल्यास लगेच नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क करून उपचार घ्यावेत. उपचाराचा भाग म्हणून प्रतिजैविके द्यावीत.

१ टक्के पोटॅशिअम परमॅंग्नेट किंवा २ टक्के सोडिअम बायकार्बोनेट किंवा १ ते २ टक्के तुरटीच्या द्रावणाने तोंड, पायातील जखमा धुवाव्यात. बोरोग्लिसरीन (८५० मिलि ग्लिसरीन आणि १५० ग्रॅम बोरॅक्स), तेल, हळदीचे मिश्रण जखमेला लावणे. मध, लोणी आणि नाचणीचे पीठ यांचा लेप तोंडातील व्रणांवर लावावा.

हिरवे मऊ गवत खाद्यामध्ये द्यावे. स्वच्छ पाणी पाजावे. पशू तज्ज्ञांच्या सल्याने ताण कमी करणारी औषधे आणि जीवनसत्त्वाचे इंजेक्शन द्यावे.

Animal Health
Animal Foot And Mouth Disease : लाळ्या खुरकूत आजाराचे नियंत्रण

प्रतिबंधात्मक उपाय

साथीच्या काळात आजारी जनावरे कुरणात चरण्यासाठी जाऊ देऊ नयेत. प्रसार लाळेतून होत असल्याने आजारी जनावरांनी खाल्लेला चारा इतर जनावरांना खाऊ देऊ नये.

आजारी जनावरे निरोगी जनावरांपासून वेगळी करावीत. त्यांच्यावर औषधोपचार करावा. आजारी जनावरांना सार्वजनिक ठिकाणी पाणी न पाजता वेगळ्या ठिकाणी पाणी पाजावे.

आजारी जनावरे बांधण्याची जागा रोज किमान एकदा जंतुनाशकाने धुवावी. जनावरांचे दूध काढण्याची भांडी धुण्याचा सोडा आणि गरम पाण्याने धुऊन घ्यावीत, म्हणजे निर्जंतुकीकरण होईल, रोगप्रसार टळेल.

गोठ्याभोवती १० फूट पट्ट्यात चुना किंवा ब्लिचिंग पावडर फवारावी. आजारी जनावरांची स्वतंत्र व्यक्तीद्वारे देखभाल करावी. गोठ्यामध्ये लोकांना प्रवेश देवू नये.

सर्व जनावरांना लसीकरण केल्यास हा आजार शक्‍यतो होत नाही. नियंत्रणासाठी लसीकरण सप्टेंबर आणि मार्चमध्ये करावे. गाभण गाई, म्हशींना लाळ्या खुरकूत प्रतिबंधक लस दिली गेली तर त्या गाई-म्हशींच्या होणाऱ्या वासरांच्या जन्मानंतर काही काळ या आजारापासून संरक्षण होते.

वासरे ४ महिन्यांची झाली की त्यांना लसीची पहिली मात्रा द्यावी. लसीचा योग्य प्रभाव दिसण्यासाठी लसीकरणापूर्वी एक महिना अगोदर जनावरांना जंतनाशक द्यावे. जनावरांना पुरेसा सकस चारा आणि पशुखाद्य द्यावे.

बाजारातून होणारी जनावरांची खरेदी-विक्री हे आजाराच्या प्रसाराचे एक प्रमुख कारण असल्याने बाजारातून नवीन जनावरे खरेदी करू नये.

डॉ.सागर जाधव, ९००४३६१७८४

(पशुधन विकास अधिकारी, बाचणी,जि. कोल्हापूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com