Animal Disease Control : लाळ्या खुरकुतावर नियंत्रण ठेवा...

Animal Care : लाळ्या खुरकूत हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन कमी होते, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. वासरांची वाढ योग्यतेनुसार होत नाही.
Animal Foot And Mouth Disease
Animal Foot And Mouth DiseaseAgrowon
Published on
Updated on

डॉ. वैष्णवी देगलूरकर, डॉ. रणजित इंगोले, डॉ. भूपेश कामडी

Animal Foot And Mouth Disease : लाळ्या खुरकूत हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन कमी होते, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. वासरांची वाढ योग्यतेनुसार होत नाही.

राज्यात थंडीची सुरुवात झाली आहे. ऋतुमानानुसार वातावरणात बदल झाला, की जनावरांच्या नियमित वागणुकीत तसेच आरोग्यावर विपरीत बदल होत असल्याचे प्रामुख्याने दिसून येते. हिवाळी वातावरणामध्ये होणारा बदल, स्वच्छ पिण्याच्या पाण्याची टंचाई आणि वैरणात होणारा बदल इत्यादींचा परिणाम जनावरांच्या वागणुकीवर, आरोग्य तसेच प्रजननावर प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या झालेला निदर्शनास येतो. याचाच परिणाम म्हणून जनावरांपासून मिळणाऱ्या उत्पादनात घट होवून परिणामी पशुपालकांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागते. वातावरणातील बदलामुळे जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होऊन जनावरे आजारी पडतात. लाळ्या खुरकूत हा अत्यंत वेगाने पसरणारा विषाणूजन्य आजार आहे. या आजारामुळे दुधाळ जनावरांचे दुग्धोत्पादन कमी होते, गाभण जनावरांमध्ये गर्भपात होण्याची शक्यता असते. वासरांची वाढ योग्यतेनुसार होत नाही.

प्रादुर्भाव :
१) आजार दुभांगलेली खूर असलेले प्राणी, उदा. गायवर्ग, म्हैसवर्ग, शेळ्या, मेंढ्या, वराह, इत्यांदींमध्ये होतो.
२) गायवर्ग जनावरांमध्ये प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळून येतो. संकरित गायींमध्ये तीव्रता देशी जनावरांपेक्षा अधिक प्रमाणात दिसून येते. हा आजार संसर्गजन्य असून वेगाने प्रसार होतो.
३) जनावराचे मरतुकीचे प्रमाण कमी असले, तरी हा आजार झाला तर कार्यक्षमता, उत्पादनक्षमता तसेच प्रजनन क्षमता कायमची कमी होते.

प्रसार :
१) हिवाळ्यात सर्वसाधारणपणे डिसेंबर-जानेवारी आणि फेब्रुवारी-मार्चपर्यंत प्रसार दिसतो.
२) विषाणूचा प्रसार हवा, श्‍वासोच्छ्वा‍स, जनावरांच्या पाण्याची भांडी, शेण, मूत्र, चारा, गव्हाण, गोठ्यावर येणाऱ्या व्यक्ती, वाहने, पाळीव प्राणी (कुत्रा, मांजर) नवीन खरेदी केलेली जनावरे यांच्याद्वारे होतो.
३) ज्या ठिकाणी गावातील जनावरे चराई आणि पाणी पिण्यासाठी एकत्रित सोडली जातात, त्या ठिकाणी आजाराचा प्रसार वेगाने होतो.
४) प्रभावित झालेल्या जनावरांची एका भागातून दुसऱ्या भागात वाहतूक केली असता प्रसार होतो.
५) प्रादुर्भावामुळे जीभ, हिरड्या, तोंडातील भाग, कास, खुरामध्ये फोड येतात. एक, दोन दिवसांत हे फोड फुटतात. त्या ठिकाणी अल्सरसारखी जखम होते.
६) खुऱ्यांमधील जखमा वेदनादायी असल्यामुळे जनावरे पाय वर धरून उभी राहतात. तोंडातील जखमांमुळे जनावरांना चारा खाता येत नाही. जनावरे अशक्त होतात.
७) जखमांमध्ये माश्यांनी अंडी घातली तर तिथे अळ्या पडतात. लहान वासरांमध्ये या विषाणूमुळे हृदयाचे स्नायू निकामी होतात. यामुळे वासरे लक्षणे न दाखवताच मरण पावतात.

Animal Foot And Mouth Disease
Chicken Disease Control : कोंबड्यामधील बाह्य परजीवी आजारांचे नियंत्रण

लक्षणे ः
१) प्रादुर्भावात पहिल्या काही दिवसांमध्ये १०२ ते १०५ अंश फॅरेनहाइटपर्यंत ताप येतो.
२) जनावरांच्या तोंडातून लाळ गाळू लागते. चारा खाणे बंद करतात. त्यामुळे अशक्त होतात.
३) जनावरे काही खात नसताना सुद्धा त्यांच्या तोंडातून मचमच आवाज येतो.
४) जनावरांची जीभ, हिरड्या, खूर, कास, तोंडातील इतर भागांत फोड येतात.
५) जनावरे वेदनांमुळे पाय जोराने खाली आपटतात. खूप वेळ खाली बसून राहतात.
६) जनावरांना उन्हात धापा लागते. जनावरे पाणी व सावलीकडे जाण्याचा प्रयत्न करतात.
७) गर्भपाताची शक्‍यता असते. दुभत्या जनावराचे दूध देण्याचे प्रमाण एकदम कमी होते.
८) फुटलेल्या फोडांवरती दुय्यम जिवाणूंचा संसर्ग दिसून येतो. यामुळे कासदाह होतो. जनावरे दूध देताना प्रतिकार दर्शवतात.
९) खुरातील जखमांमुळे जनावर लंगडू लागते. कधी कधी संपूर्ण खूर गळून पडते.
१०) लहान वासरे लक्षणे न दाखवताच मरण पावतात.


Animal Foot And Mouth Disease
FMD Disease : लाळ्या खुरकूताचे नियंत्रण

उपचार ः
१) तोंडातील जखमांवर दिवसातून तीन वेळा बोरो ग्लिसरीन लावावे.
२) तोंड व पायातील जखमा बऱ्या होण्यासाठी एक टक्का पोटॅशियम परमॅंगनेट किंवा तुरटीच्या एक टक्का द्रावणाने दिवसातून दोन ते तीन वेळा धुवाव्यात.
३) रोगग्रस्त जनावरांना उपशामक आहार द्यावा. इतर निरोगी जनावांपासून वेगळे ठेवावे.
४) जवळच्या शासकीय पशुवैद्यकीय दवाखान्यात आजारी जनावरांची नोंद करावी.
५) आजारी जनावरांवर पशुवैद्यांच्या सल्ल्याने औषधोपचार करावा.

प्रतिबंधात्मक उपाययोजना ः
१) दरवर्षी मार्च ते एप्रिल आणि नोव्हेंबर ते डिसेंबर या महिन्यात पशुवैद्यकाच्या मदतीने प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.
२) लसीकरण केल्यानंतर १५ दिवस प्रतिकारशक्ती तयार होण्यासाठी लागतात. तीन आठवड्यांमध्ये पूर्ण प्रतिकार शक्ती तयार होते. ६ महिन्यांपर्यंत प्रतिकारशक्ती टिकून राहते.
३) चार महिन्यांच्या वरील वासरांस लसीकरण करावे. एक महिन्यानंतर बूस्टर डोस द्यावा.
४) लसीकरण करण्याच्या एक महिन्यापूर्वी जनावरांना जंतनाशके पशुवैद्यकाच्या सल्ल्यानेच द्यावीत. जनावरांना चारा व पाणी पुरेसा द्यावा.
५) आजार प्रभावित क्षेत्रातून जनावरांची खरेदी करू नये.
६) नव्याने खरेदी केलेली जनावरे गोठ्यातील इतर जनवारांपासून २१ दिवस वेगळी ठेववीत. निरोगी असल्याची खात्री झाल्यावरच घरच्या इतर निरोगी जनावारांमध्ये मिसळावी.



उद्रेकादरम्यान घ्यावयाची काळजी ः
१) जनावरांसाठी वापरल्या जाणाऱ्या वस्तू, जसे की पिण्याच्या पाण्याचे भांडे, वाहने, इतर भांडी यांचे दिवसातून दोन वेळा निर्जंतुकीकरण करुन घ्यावे. निर्जांतुकरणासाठी ४ टक्के सोडिअम बायकार्बोनेट (४०० ग्रॅम सोडिअम बायकार्बोनेट प्रति १० लिटर पाणी) वापर करावा.
२) जनावरांची देखभाल करणाऱ्या व्यक्तीचे कपडे, बूट, चप्पल, इत्यादीचे निर्जंतुकीकरण करावे.
३) आजारी जनावरांना वेगळे ठेवावे. आजारी जनावरांची देखभाल ही स्वतंत्र व्यक्तीने करावी.
४) आजारी आणि आजारातून बऱ्या झालेल्या जनावरांना सामुदायिक पाणवठे, सामुदायिक कुरणामध्ये चरायला किमान दीड महिना नेऊ नये.
५) गोठ्याभोवती १० फूट पट्ट्यात चुना किंवा ब्लिचिंग पावडर फवारावी.

संपर्क : डॉ. रणजित इंगोले, ९८२२८६६५४४
(विभाग प्रमुख, पशुविकृतिशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com