Goat Farming : मराठवाड्यात शेळीपालनासाठी उस्मानाबादी शेळ्यांना पसंती

Osmanabadi Goat Farming : मराठवाड्यात जालना जिल्ह्यातील खरपुडी कृषी विज्ञान केंद्र व पशुसंवर्धन विभागाच्या प्रयत्नांतून उस्मानाबादी जातीच्या शेळ्यांची संख्या वाढत आहे. त्यामागे उस्मानाबादी शेळ्यांची काटकता व एकापेक्षा जास्त पिल्ले देण्याची क्षमता आदी गुणवैशिष्ट्ये महत्त्वपूर्ण ठरली आहेत.
Goat Farming
Goat Farming Agrowon

Marathwada Goat Farming Update : देशात शेळ्यांच्या साधारण २१ ते २२ जाती आहेत. पशुगणनेच्या आकडेवारीनुसार शेळ्या संख्या देशात १ टक्‍का तर राज्यात साडेचार टक्‍क्यांनी वाढत आहे. मराठवाड्यात हेच प्रमाण जिल्हानिहाय २१ ते ७८ टक्‍क्‍यांपर्यंत आहे. सातत्याने होणाऱ्या दुष्काळाच्या आघातामुळे येथील शेतकऱ्यांनी शेळीपालनास पसंती दिल्यामुळे ही संख्या वाढते आहे.

मराठवाड्यातील शेतकरी विविध जातींच्या शेळ्यांचे संगोपन करत आहेत. मात्र विविध गुणवैशिष्ट्यांमुळे शेतकरी उस्मानाबादी शेळ्यांना अधिक पसंती देत आहेत. किमान व्यवस्थापनामध्ये शेळीपालकांना चांगले उत्पन्न मिळते आहे. त्यामुळे एका शेळीपासून ३५ ते ४० शेळ्यांचा फार्म तयार करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या वाढते आहे.

उस्मानाबादी शेळीची वैशिष्ट्ये

- दिसायला काळीभोर, मध्यम शरीर बांधा तर काही शेळ्यांच्या कानावर पांढरे ठिपके दिसून येतात.

- वर्षातून दोन वेळा पिले देण्याची तसेच सातत्याने एकापेक्षा अधिक पिले देण्याची क्षमता.

- जुळे व तिळे देण्याचे प्रमाण अधिक. जुळ्यांचे प्रमाण ६१ टक्‍के, तिळ्याचे प्रमाण १७ टक्‍के, एका पिलाचे प्रमाण २१ टक्‍के, तर ४ ते ६ पिले देण्याचे प्रमाण १ टक्‍का इतके आहे.

- प्रत्येक वेतामध्ये पिलांना पुरेल एवढे दूध देण्याची क्षमता.

- उच्चतम रोग प्रतिकारशक्ती तसेच उष्ण हवामानास सक्षमपणे तोंड देण्याची क्षमता.

Goat Farming
Goat Farming : जालना जिल्ह्यातील चंद्रे दांपत्याचे उत्तम शेळीपालन

बोकडांना विशेष मागणी

उस्मानाबादी शेळी चविष्ट मांसासाठी ओळखली जाते. साधारण ३ ते ४ महिन्यांचे बोकड ‘लीन मीट’साठी प्रसिद्ध आहे. बोकडांना बाजारात बाराही महिने मागणी असते. खरेदीदार काळ्या रंगाच्या बोकडाची वाढीव दराने खरेदी करतात. साधारणपणे ६ महिन्यांचे बोकड २२ ते २५ किलो, तर १२ महिन्यांचे बोकड ३० ते ३५ किलोपर्यंत भरते. एक वर्ष वयाच्या शेळीचे वजन ३० ते ३५ किलोपर्यंत मिळते.

पायलट प्रोजेक्‍ट व प्रशिक्षणामुळे वाढले शेळीपालन

२०१२ मधील दुष्काळी स्थिती, अल्पवृष्टी तसेच असमान पर्जन्यमान या परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना शाश्‍वत उत्पन्नाचा स्रोत शेळीपालनातून उपलब्ध करण्याविषयी जाणकारांमध्ये चिंतन झाले. जालना जिल्हा पशुसंवर्धन विभाग व खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या सामूहिक प्रयत्नांतून खास प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले.

राज्य शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने जालना जिल्ह्यात २० हजार शेळ्यांचा २० अधिक २ शेळ्या असा पायलट प्रोजेक्‍ट राबविला. त्यातून साधारण ४ ते साडेचार हजार शेळीपालकांना प्रशिक्षण देण्यात आले.

खरपुडी केव्हीकेद्वारे ४० प्रशिक्षण कार्यक्रमांतून साडेतीन हजार शेळीपालकांना व्यवसायाची शास्त्रोक्‍त माहिती देण्यात आली. त्यानंतर २०१२ मधील पशुगणनेच्या तुलनेत २०१९ मध्ये शेळ्यांची संख्या दुपटीने वाढल्याचे दिसून आले. जालना जिल्ह्यात २०१२ मध्ये १ लाख ६८ हजार ६०३ इतकी असलेली शेळ्यांची संख्या २०१९ मध्ये ३ लाख ९८८ एवढी झाली. यामध्ये जवळपास ८० टक्‍के शेळ्या या उस्मानाबादी जातीच्या होत्या.

शेळीपालनातील महत्त्वाच्या बाबी

साधारण १५ ते २० शेळ्यांचे संगोपन करताना १ एकरांवर चारा पीक लागवडीचे नियोजन करावे. त्यात ३० गुंठे एकदल आणि १० गुंठे द्विदलवर्गीय पिके लावावीत. चाराटंचाईच्या काळात मुरघास व हायड्रोपोनिक तंत्राद्वारे चारा निर्मिती करावी. कमी खर्चात वर्षभर निवाऱ्याची सोय करावी. खाद्यामध्ये सुका तसेच हिरवा चारा व खुराकाची सोय करावी.

आरोग्य व्यवस्थापनामध्ये जंतनाशक, लसीकरण व आजारी शेळ्यांचे स्वतंत्र व्यवस्थापन यावर भर द्यावा. प्रजननाकरिता साधारण १२ महिन्यांच्या पुढील वयाचा बोकड निवडावा. दर दीड ते २ वर्षांनी कळपाच्या बाहेरील नवीन बोकडाची निवड करावी.

पशुगणनेनुसार मराठवाड्यातील जिल्हानिहाय शेळ्यांची संख्या

जिल्हा---शेळ्यांची संख्या (साल २०१२)---शेळ्यांची संख्या (२०१९)---एकूण वाढ---वाढीचे प्रमाण (टक्‍के)

जालना---१,६८,६०३---३,००,९८८---१,३२,३८५---७८

छ. संभाजीनगर---३,०३,०१३---४,३१,१८२---१,२८,१६९---४२

बीड---३,३६,२२३---४,६८,१४९---१,३१,९२६---३९

नांदेड.---२,५३,३०२---३,१८,५६४---६५,२६२---२६

धाराशीव---१,७८,६६०---२,१७,४००---३८,७४०---२२

परभणी---१,३३,६५७---१,७१,६९८---३८,०४१---२८

लातूर---१,२२,६१५---१,४८,८८६---२६,२७१---२१

हिंगोली---१,११,२१०---१,५४,२८४---४३,०७४---३८

(स्रोत - पशुसंवर्धन विभाग)

‘केव्हीके’च्या प्रक्षेत्रावर मॉडेल

खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या प्रक्षेत्रावर २००६ पासून उस्मानाबादी, सिरोही, सोजत व जमनापरी शेळ्यांच्या संगोपनाचे मॉडेल उभे आहे. या ठिकाणी १०० शेळ्यांचे संगोपन केले जाते. या माध्यमातून शेळीपालनातील बारकावे, तसेच शेळ्यांसाठी कोणती चारा पिके किती प्रमाणात असावीत आदी बाबींचा अभ्यास शेतकऱ्यांना करणे शक्य झाले आहे.

Goat Farming
Goat Market : विट्यात बोकड, शेळ्यांच्या बाजारात आठवड्याला २२ लाखांची उलाढाल
हवामान बदल आणि अवेळी पाऊस इत्यादी संकटांमुळे शेतकऱ्यांचे आर्थिक उत्पन्न कमी होत आहे. शेतीला विशेषतः उस्मानाबादी शेळीपालनाची जोड दिल्यास शाश्‍वत उत्पन्न मिळू शकते. जिल्ह्यातील शेकडो कुटुंबात उस्मानाबादी शेळीने समृद्धी आणली आहे.
डॉ. हनुमंत आगे, ९०२८२५४९५० विषय विशेषज्ञ, कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी. जि. जालना
खरपुडी कृषी विज्ञान केंद्रात प्रशिक्षण घेऊन ५ उस्मानाबादी शेळ्यांचे संगोपन सुरू केले. कुटुंबाचा व शेतीचा खर्च शेळीपालनातून भागू लागला. शिवाय, लेंडीखत मिळू लागल्याने शेतीतील रासायनिक खतांचा वापर कमी झाला.
सुरेश रोडगे, ९५०३५६०४३७ शेळीपालक, रा. राममूर्ती, जि. जालना
उस्मानाबादी शेळ्यांचे वजन वाढविण्यासाठी मिक्‍स ब्रीड केले जाते. त्यामुळे या शेळ्यांच्या शुद्ध ब्रीडचे जतन करण्याचा निर्णय घेतला. मार्च २०१६ मध्ये उस्मानाबादी ब्रीड कळम वर्ण १० आणले. त्यांची संख्या वाढवीत नेली. सुरुवातीची चार वर्षे फक्‍त बोकड विक्री केली. पाचव्या वर्षापासून शुद्ध दर्जाच्या उस्मानाबादी शेळ्यांची विक्री सुरू केली. सध्या माझ्याकडे प्रजननक्षम (ब्रीडेबल स्टॉक) ७७ शेळ्या आहेत. त्यापासून १४ महिन्यांत २८० पिले मिळतात.
अनिल साळुंके, ९८२२७९०३३५, उस्मानाबादी शेळी ब्रीड फार्म, गोलटगाव, ता. जि. छत्रपती संभाजीनगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com