Goat Farming : जालना जिल्ह्यातील चंद्रे दांपत्याचे उत्तम शेळीपालन

Goat Farming Update : जालना जिल्ह्यातील पीरकल्याण येथील महिला शेळीपालक मालिका ज्ञानेश्‍वर चंद्रे व त्यांचे पती ज्ञानेश्‍वर संपत चंद्रे या दांपत्याने यांनी शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे.
Goat farming
Goat farmingAgrowon
Published on
Updated on

शेतकरी : मालिका ज्ञानेश्‍वर चंद्रे, ज्ञानेश्‍वर संपत चंद्रे

गाव : पीरकल्याण, ता. जि. जालना

शेती : अडीच एकर

एकूण शेळ्या : २०

जालना जिल्ह्यातील पीरकल्याण येथील महिला शेळीपालक मालिका ज्ञानेश्‍वर चंद्रे व त्यांचे पती ज्ञानेश्‍वर संपत चंद्रे या दांपत्याने यांनी शेतीला शेळीपालनाची जोड दिली आहे. केवळ अडीच एकर शेती असल्याने पूरक व्यवसाय करायचे त्यांनी ठरविले. त्यासाठी सोने गहाण ठेवून तीन शेळ्या खरेदी केल्या.

सुधारित पद्धतीने शेळीपालन करण्यासाठी खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातून प्रशिक्षण घेतले. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर करून अर्धबंदिस्त शेळीपालनात सातत्य राखत त्याचा विस्तार केला आहे. सध्या त्यांच्याकडे १० मोठ्या शेळ्या आणि १० पिले आहेत.

सोने गहाण ठेवून शेळीपालन

चंद्रे दांपत्य दररोज दुसऱ्याच्या शेतात जाऊन मोलमजुरी करत होते. त्यातून अपेक्षित उत्पन्न मिळत नव्हते. रोज मजुरीला जाण्यापेक्षा स्वतःचा काहीतरी शेतीला पूरक व्यवसाय करावा, या विचाराने त्यांनी मागील तीन वर्षांपूर्वी शेळीपालनास सुरुवात केली.

सोने गहाण ठेवून ३२ हजारांमध्ये तीन उस्मानाबादी जातीच्या तीन शेळ्यांची खरेदी केली. त्यापासून मिळालेल्या फक्त बोकडांची विक्री करत गेले. तीन शेळ्यांपासून सुरू केलेला व्यवसाय ४० शेळ्यांपर्यंत पोहोचला.

पहिल्या दोन वर्षांत ३२ हजारांसाठी गहाण ठेवलेले सोने व्याजासह सोडवून घेतले. तीन वर्षांत पहिल्या वर्षी १०, दुसऱ्या व तिसऱ्या वर्षी प्रत्येकी २० असे जवळपास ५० बोकड व पाठी विकून तीन ते सव्वातीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळविले. अलीकडील काही दिवसांत विकलेल्या बोकडांना प्रत्येकी १० हजार, तर शेळ्यांना प्रत्येकी ६ हजार रुपये दर मिळाला.

Goat farming
Sanen Goat Farming : सानेन शेळीपालनात हिवरे तर्फे नारायणगावचे बाळासाहेब झाले ‘मास्टर’

चारा पिकांची लागवड

अडीच एकर शेतीपैकी १५ गुंठे क्षेत्रांत शेळ्यांना चाऱ्यासाठी लसूणघास, दशरथ घास. नेपियर गवत आणि मारवेलचे फुले गोवर्धन गवत, ज्वारी, मका आदी चारा पिकांची लागवड आहे. शिवाय उर्वरित क्षेत्रामध्ये दरवर्षी सोयाबीन लागवड केली जाते. त्यातून उपलब्ध होणारा सोयाबीन भुस्सा शेळ्यांना खाद्य म्हणून दिला जातो.

खाद्य व्यवस्थापन

- दररोज सकाळी गोठ्याची स्वच्छता झाल्यानंतर सर्व शेळ्यांना मिळून सोयाबीन मका इत्यादी भरडा करून एकत्रीतपणे ४ किलो मिश्रण दिले जाते.

- उन्हाळ्यात गहू भरडा दिला जातो. प्रति शेळी किमान २५ ते ३० ग्रॅम भरडा शेळीला देण्याचे नियोजन असते.

- सकाळी खाद्य दिल्यानंतर किमान १ ते दीड तास शेळ्यांना काही दिले जात नाही.

- सकाळी नऊ वाजता वाळलेला चारा, १० वाजता हिरवा चारा दिला जातो. त्यानंतर पुन्हा दीड तास कोणतेही खाद्य दिले जात नाही.

- दुपारी साधारणतः एक वाजता मेथी घास, सायंकाळी पाच वाजता भुस्सा अशा पद्धतीने प्रत्येक दिवसाचे चाऱ्याचे नियोजन असते. शेतात काम असले तर शेळ्या पूर्णवेळ बंदिस्त असतात. एरवी दररोज सायंकाळी चार ते सहा किंवा प्रसंगानुरूप सकाळच्या वेळी सहा ते नऊ वाजेदरम्यान शेळ्यांना चराईसाठी आसपास नेले जाते.

लसीकरणावर भर

- खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रातील डॉ. हनुमंत आगे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण शेळीपालनाचे व्यवस्थापन केले जाते. शेळ्या आजारी पडू नये, त्यांची मरतुक होऊ नये यासाठी डॉ. आगे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिबंधात्मक लसीकरणावर भर दिला जातो.

- सहा महिने वयापर्यंतच्या पिलांना दर महिन्याला तर ६ ते १२ महिन्यापर्यंतच्या पिलांना जंतनाशकाची मात्रा दिली जाते.

- दर तीन वर्षांनी पीपीआरचे लसीकरण केले जाते.

- ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत लाळ्या खुरकूतचे लसीकरण केले जाते.

- लसीकरणासाठी प्रत्येक शेळीला वेगळी सुई वापरली जाते. लस आणल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवला जाते. आणि वापरापूर्वी ती बर्फात ठेवूनच वापरली जाते.

Goat farming
Goat Diseases : शेळ्यांमधील रोगाला प्रतिबंध करण्यासाठी कोणत्या चाचण्या कराव्यात?

महत्त्वाच्या बाबी

- शेळीपालनासाठी उच्च उत्पादनक्षम जातींची निवड.

- खरपुडी कृषी विज्ञान केंद्राकडून घेतले प्रशिक्षण

- गाभण शेळ्या, दूध देणाऱ्या शेळ्या यांना नियमित खनिज मिश्रणाचा वापर.

- कमतरतेच्या लक्षणांमुळे आजार शेळ्या आजारी पडू नये म्हणून क्षारयुक्त चाटण विटांचा वापर.

- नियमित जंतनाशकांच्या मात्रा देण्यावर भर.

- निवाऱ्यासाठी अर्धबंदिस्त गोठ्याची उभारणी.

- स्वच्छ आणि मुबलक पिण्याच्या पाण्याचा पुरवठा.

- पूरक खाद्यासाठी वाळलेला, हिरवा चाऱ्याची मुबलक उपलब्धता.

- दर महिन्याला १ ट्रॉली लेंडीखताची उपलब्धता.

- सर्व लेंडीखताचा शेतीमध्ये वापर.

संपर्क - ज्ञानेश्‍वर चंद्रे, ७०५८५९८८५६

(शब्दांकन - संतोष मुंढे)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com