Umarda Cattle Breed : उष्ण वातावरणात तग धरणारा ‘उमरडा गोवंश’

Indigenous Cow : पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या अमरावती, वाशीम जिल्ह्यात अंगकाठीने उंचीपुरी, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या गोधनाचा सांभाळ बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने होत आहे.
Umarda Cattle Breed
Umarda Cattle Breed Agrowon
Published on
Updated on

डॉ. प्रवीण बनकर

पश्‍चिम विदर्भातील यवतमाळ जिल्हा आणि लगतच्या अमरावती, वाशीम जिल्ह्यात अंगकाठीने उंचीपुरी, पांढऱ्याशुभ्र रंगाच्या गोधनाचा सांभाळ बंजारा समाजाकडून पारंपरिक पद्धतीने होत आहे. या गोवंशाला ‘उमरडा गोवंश’ म्हणून ओळखले जाते.

वाशीम जिल्ह्यातील ‘उंबर्डा बाजार’ या पशू बाजारपेठेवरून ‘उमरडा’ हे नाव स्थानिक गोवंशाला प्राप्त झालेले असले, तरी यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस तालुक्यावरून या गोवंशाला ‘दिग्रस’ किंवा बंजारा समाजावरून ‘बंजारा’ गोवंश म्हणून देखील संबोधले जाते.

अमरावती जिल्ह्याचे ब्रिटिशकालीन गॅझेटमधील (१९१०) नोंदीवरून उमरडा गोवंश गेल्या शतकापासून आपले अस्तित्व राखून असल्याचे सिद्ध होत आहे. बंजारा समाजाव्यतिरिक्त स्थानिक पशुपालकांकडून देखील उमरडा गोवंशाचा सांभाळ केला जातो.

स्थानिक उष्ण वातावरणात तग धरून काम करण्याची क्षमता दखलपात्र आहे. १० ते १५ वेत झालेल्या गाईंचे देखील पशुपालकाकडून जिव्हाळ्याने संगोपन केले जाते. नवजात वासराचे संगोपन विशेष काळजीपूर्वक केले जाते.

Umarda Cattle Breed
Kathani Cow Breed : भात शेतीसाठी उपयुक्त कठाणी गोवंश

बंजारा समाज मोठ्या आस्थेने या पशुधनाचा सांभाळ करीत असून, जर एखाद्या पशुपालकाकडून संगोपन करताना हलगर्जी होऊन वासरू दगावले तर आत्मक्लेश म्हणून काही महिने पशुपालक घरी पाय देखील ठेवत नाही. डोंगराच्या पायथ्याशी चराऊ क्षेत्रात आपल्या पशुधनाचा कसोशीने सांभाळ करीत बंजारा समाजबांधव आपल्या उमरडा गोवंशाचे संगोपन करीत आहे.

राष्ट्रीय पशू आनुवंशिकी संशोधन ब्यूरो, कर्नाल (हरयाना) या संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठातर्फे डॉ. कुरळकर आणि संशोधकांनी काही निरीक्षणे नोंदविली आहेत. उमरडा गाय केवळ चराई करून अर्धा ते चार किलोग्रॅम पर्यंत सरासरी दूध देते. एका वेतात सरासरी २५० किलोग्रॅम दूध उत्पादन होत असल्याने शेतीकामासह घरगुती दुधाची गरज लक्षात घेता बंजारा समाजाशिवाय इतरही पशुपालक वर्गाकडून उमरडा गोवंशाला पसंती असल्याचे दिसते.

Umarda Cattle Breed
Desi Cow Breed : खामगाव गोवंश ः विदर्भातील वातावरणास अनुकूल

दुधातील स्निग्धांशाचे प्रमाण सरासरी ४.६८ टक्के, तर एसएनएफचे प्रमाण ८.७२ टक्के आढळून आले आहे. उमरडा गोवंशाचे प्रजनन गुणधर्म पाहता, सरासरी ४४ महिन्यांत कालवडी वयात येतात आणि ४४ महिन्यांचे वयात पहिल्यांदा गर्भधारीत होतात. साधारणतः ५३ महिन्यांचे वय असताना पहिल्यांदा वितात. दोन वेतांतील अंतर सरासरी ४६२ दिवसांचे आणि व्याल्यानंतर पुन्हा गाभण राहण्याचा काळ सरासरी २०६ दिवस असल्याचे आढळून आले आहे.

वैशिष्ट्ये

मध्यम आकार, पांढरा रंग, काळ्या रंगाच्या नाकपुड्या, डोळ्यांची किनार, शिंगे आणि खुरे यांमुळे लक्षवेधी गोवंश.

कपाळावरील खाच, आखूड शिंगे, मध्यम आकाराचे वशिंड, मानेची पोळी यांसह गोवंशाचा शारीरिक बांधा स्थानिक काळ्या जमिनीमध्ये काम करण्यास अनुकूल आहे.

बंजारा समाज पारंपरिक पद्धतीने भटकंती आणि स्थलांतर करीत गायरान आणि गावाजवळील डोंगर टेकड्यांच्या कुरणावर गोधन चराई करतात. दिवसभर ५ ते ६ तास चराई केल्यानंतर रात्री गोठ्यात बांधल्यावर गायींना हिरवा चारा दिला जातो.

शेतीकामासाठी उपयोगात येणाऱ्या बैलजोडीस विशेष लक्ष पुरवले जाते. उत्तम बैल सरासरी ४०० किलो वजनाचे असतात.

पैदास क्षेत्र

यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस, दारव्हा, आर्णी तालुका, वाशीम जिल्ह्यातील मानोरा, मंगरूळपीर, कारंजा (लाड) तालुका आणि अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खांडेश्वर या तालुक्यात मोठ्या संख्येने उमरडा गोवंश दिसतो.

- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९

(पशुआनुवांशिकी व पैदास शास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक व पशुविज्ञान संस्था, अकोला)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com