Lumpy Skin : लम्पी स्कीन : गांभीर्याने घ्या...

राजस्थान, पंजाब, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रामध्ये लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव वेगाने वाढला. यामुळे पशुपालकांचे अर्थकारणच बिघडले आहे. आजाराच्या नियंत्रणासाठी प्रत्येक गावामध्ये सामूहिकपणे नियंत्रण उपाययोजनांची गरज आहे. पशुसंवर्धन विभागाने जलद गतीने लसीकरण आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला तरच या आजारातून पशुपालन उद्योग सावरेल. हवामान बदलाच्या काळात पशू आजारांच्या नियंत्रणासाठी पशुपालक आणि पशुसंवर्धन विभागाने कायम दक्ष राहण्याची आणि कार्यपद्धतीमध्ये सुधारणा करण्याची गरज प्रकर्षाने जाणवत आहे.
Lumpy Skin Disease
Lumpy Skin DiseaseAgrowon

जागतिक पशू आरोग्य संघटनेच्या (World Animal Health Organization) अहवालानुसार लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव (Lumpy Skin Outbreak) २०१० पासून विविध देशांमध्ये दिसून आला. सर्वप्रथम मोझांबिक देशातील जनावरांमध्ये याचा प्रादुर्भाव दिसला. तेथूनच हळूहळू अनेक देशांत आजाराचा प्रसार झाला. भारतात १२/८/२०१९ रोजी ओदिशा राज्यातील मयूरगंज जिल्ह्यामध्ये काही जनावरे आजारी दिसून आली. १६/११/२०१९ रोजी लम्पी स्कीन आजाराचे निदान (Lumpy Skin) प्रयोगशाळेत झाले. त्यानंतर २०२० पासून बांगलादेश, चीन, भारतात कुठे ना कुठे या आजाराचा प्रादुर्भाव दिसत होता. मात्र जून २०२२ पासून भारतामध्ये या आजाराचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढला आहे. सध्या या आजाराने देशभरातील पशुपालक अडचणीत आले आहेत. विशेषतः गाई आणि काही प्रमाणात म्हशी या आजाराला बळी पडताना दिसतात.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin Disease : ‘लम्पी स्कीन’च्या नियंत्रणासाठी प्रभावी उपाययोजना राबवा

ग्रामीण तसेच शहरी भागात वाढलेली भटक्या जनावरांची संख्या, त्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील अनेक गोशाळा आणि त्यामधील जनावरांची गर्दी, दुय्यम आरोग्य दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात गुजरात, राजस्थान या राज्यात आजाराचा वेगाने प्रसार झाला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये बारा राज्यांतील सुमारे १६५ जिल्ह्यांत या आजाराचा प्रसार झाल्याचे दिसून आले आहे.

भारतीय कृषी संशोधन परिषदेने लम्पी स्कीन आजारावर भारतीय बनावटीची लस निर्माण केली आहे. ही लस तातडीने पशुपालकांना उपलब्ध करून दिली पाहिजे. देशभरातील पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पशू विद्यापीठे आणि पशू संवर्धन विभाग कार्यक्षम कसा होतील यादृष्टीने राज्य सरकार आणि केंद्र सरकारने पुढाकार घेणे काळाची गरज आहे.

लम्पी स्कीन आजाराचा विषाणू शेळी, मेंढ्यांमध्ये देवी आजार निर्माण करणाऱ्या ‘कॅप्रीपॉक्स’ समूहातील.

प्रामुख्याने देशी गाई, संकरित गाईंमध्ये मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव. काही प्रमाणात म्हशीमध्ये प्रादुर्भावाची लक्षणे. शेळी, मेंढ्यांमध्ये या आजाराचा प्रादुर्भाव होत नाही.

जगात कुठेही या आजाराचे संक्रमण मानवात झालेले दिसून आलेले नाही.

आर्थिक नुकसान

गाभण जनावरांमध्ये गर्भपात होतो, त्यामुळे एक वेत फुकट जाते.

संक्रमण काळात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन घटते. जनावरे अशक्त होत असल्याने त्यांना पुन्हा उत्पादनात आणण्यासाठी मोठा खर्च.

कासेवर जखमा झाल्याने कासदाह. औषध उपचारांसह पशुपालकांचे आर्थिक नुकसान.

आजाराची लक्षणे जनावरांच्या कातडीवर दिसत असल्यामुळे चमडा उद्योगाला आर्थिक फटका.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

परदेशात आहे काटेकोर नियमावली...

लम्पी स्कीन आजार कीटकांमार्फत पसरत असल्याने त्याचे नियंत्रण अवघड असते. या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी युरोपीय देशात प्रगत तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. यामध्ये त्वरित रोगनिदान सुविधा, जसे की प्रयोगशाळेत अद्ययावत यंत्रणा, नमुने गोळा करण्याच्या आधुनिक प्रणालीचा वापर केला जातो. यामुळे आजार कुठे, किती जनावरांना, कोणत्या घटकांमुळे आणि कोणत्या प्रकारचा झाला आहे हे समजते. त्यानुसार उपचार, जनावरांची वाहतूक आणि त्यावरील निर्बंध, तपासणी स्लॉटर पद्धती, आजारी किंवा प्रादुर्भावीत जनावरांचे निर्मूलन आणि प्रभावी लसीकरणाचा वापर केला जातो. विकसित देशात प्रत्येक जनावराला त्याचा ओळख क्रमांक असतो आणि त्याचे पूर्ण रेकॉर्ड देशाच्या किंवा राज्याच्या मुख्य ठिकाणी असते. जर असे जनावर ‘लम्पी’सारख्या किंवा इतर काही संसर्गजन्य आजाराने प्रादुर्भावीत असल्यास ते जनावर मालकाला बाहेर विकता येत नाही किंवा कत्तलखान्यात देता येत नाही. सदर बाबतीत निष्काळजीपणा केल्यास त्यास शिक्षेची आणि दंडाची तरतूद आहे. जर पशुपालकाचे अनन्य साधारण आजाराने नुकसान झाले तर तेथील सरकार त्या पशुपालकाची जबाबदारी घेउन परत नव्याने सदर व्यवसाय करण्यास मदत करतात. जनावरांचा फार्म असणाऱ्या व्यावसायिकाला तेथील सरकारच्या पशुपालनाबाबतच्या नियमांचे काटेकोर पालन करावे लागते, नियम मोडल्यास शिक्षा आणि दंडाला सामोरे जावे लागते.

Lumpy Skin Disease
Lumpy Skin: तीन लाख जनावरांना ‘लम्पी स्कीन’चे लसीकरण

टेस्ट आणि स्लॉटर पद्धती

परदेशांमध्ये आजाराच्या निदानाची अद्ययावत सुविधा असल्याने नियमित जनावरांची तपासणी होते. जनावर आजारी आढळल्यास आणि ते आजाराचा प्रसार करत असेल किंवा मनुष्याला बाधा करणार असल्यास सदर जनावर किंवा तेथील संपर्कातील सर्व जनावरांना दयामरण पद्धतीने नष्ट केले जाते. त्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावली जाते, जेणे करून मृत जनावरांकडून इतर जनावरांना किंवा माणसांमध्ये आजार पसरणार नाही. आजार निर्माण करणाऱ्या घटकांचे निर्मूलन केल्याने आजार आटोक्यात येतो. योग्य निदान करून ज्या भागात आजार पसरला आहे आणि तेथील आजाराची लक्षणे किंवा आजाराची प्रतिपिंडे नसणाऱ्या जनावरांना लसीकरण केले जाते. त्याचा प्रभावी परिणाम होऊन आजार आटोक्यात येतो. अर्थात, असे काही आजार असतील ज्यामध्ये लसीकरण करणे प्रभावी नसेल, तर त्या वेळी टेस्ट आणि स्लॉटर पद्धतीचा अवलंब केला जातो.

- डॉ. धनंजय भोईटे, प्रकल्प प्रमुख, सेंटर फॉर एक्सलन्स, डेअरी, कृषी विज्ञान केंद्र, बारामती

‘लम्पी’चे मूळ आफ्रिकेत...

दिवसेंदिवस लम्पी स्कीन आजार गोवंशामध्ये वेगाने पसरतो आहे. या आजाराची सुरुवात आफ्रिका खंडातून झाल्याचे दिसून येते. दक्षिण आणि पूर्व आफ्रिकेतील देशांमध्ये या आजाराचा सातत्याने प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र १९७० मध्ये हा आजार पश्‍चिम आफ्रिकेतील देशांमध्ये पसरू लागला. साधारणपणे २००० पासून मध्य पूर्वेतील देश आणि २०१३ पासून टर्किसह अल्बेनिया, बोस्निया, हर्जेगोव्हिना, बल्गेरिया, क्रोएशिया, कोसोवो, मॉन्टेनेग्रो, उत्तर मॅसेडोनिया, रोमानिया, सर्बिया आणि स्लोव्हेनिया या देशांमध्ये लम्पी स्कीन आजाराने प्रवेश केला. अलीकडेच जॉर्जिया, रशिया, बांगलादेश आणि चीन या देशांमध्येही आजाराचा मोठा प्रादुर्भाव दिसून आला आहे.

आशियायी देशात शिरकाव

साधारणपणे २०२१ पासून बांगलादेश, भारत, पाकिस्तान चीन, नेपाळ, भूतान, व्हिएतनाम, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आणि मलेशिया या आशियातील देशांमध्ये या आजाराचा दरवर्षी प्रादुर्भाव वाढतोय. यंदा जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात पाकिस्तानमध्ये हा आजार वेगाने पसरला. येथील हजारो जनावरे आजाराने बाधित झाली आहेत. पाकिस्तान प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार आजपर्यंत पाच हजार जनावरे दगावली आहेत. अनेक जनावरे बाधित आहेत.भारतात लम्पी आजाराचा दृश्‍य परिणाम एप्रिल महिन्यात गुजरातमध्ये समोर आला. गेल्या काही दिवसांत गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश आणि जम्मू आणि काश्मीर या राज्यांमध्ये आजार वेगाने पसरत आहे. जुलै महिन्यापासून या आजाराने देशात थैमान घालायला सुरुवात केली. आजपर्यंत देशभरात सुमारे ६७ हजार जनावरे या आजाराने दगावली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे.

‘माफसू’चा प्रोटोकॉल

लम्पी स्कीन हा विषाणूजन्य आजार असल्याने प्रभावी उपचार उपलब्ध नाही. मात्र लक्षणांवर आधारित उपचार पद्धतीचा अवलंब करावा.

सुरुवातीपासून नियमितपणे प्रतिजैविके, ज्वरनाशक, अँटिहिस्टेमिनिक औषधे, प्रतिकार शक्तिवर्धक जीवनसत्त्व ‘अ’ व ‘ई’ आणि शक्तिवर्धक ‘ब’ जीवनसत्त्व तसेच त्वचेवरील व्रणासाठी अँटिसेप्टिक / फ्लाय रिपेलंट स्प्रे यांचा वापर करावा. योग्य उपचारामुळे ३ ते १० दिवसांत बहुतांशी जनावरे पूर्णपणे बरी होतात. जनावरांना मऊ, हिरवा चारा तसेच मुबलक पाणी उपलब्ध करून द्यावे. संतुलित आहार द्यावा. यामध्ये प्रामुख्याने खुराक आणि खनिज मिश्रणाचा समावेश असावा.

लम्पी स्कीन आजारामुळे अक्षरशः बेजार झालो आहे. माझ्या गाईला योग्य उपचार मिळत नसल्याने मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. लसीकरण व्हायच्या आतच गाईला आजार झाला. सुरुवातीला खासगी पशुवैद्यकाकडून उपचार करून घेतले. त्यानंतर शेजारच्या गावातील पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याला बोलावून घेतले. त्याने लम्पी झाल्याचे सांगितले. हे कळल्यानंतर दूध संघाच्या पशुतज्ज्ञाने औषधे लिहून दिली. औषधे घेऊन आल्यानंतर मात्र तो वैद्यकीय अधिकारी जनावरांना स्पर्श करत नव्हता. त्याने लांबूनच पाहून औषधे दिली. आजार कमी होत नसल्याने आम्ही आता होमिओपॅथिक उपचाराकडे वळलो आहोत. सरकारी पशुतज्ज्ञाला वारंवार फोन करूनही वेळेत न येणे, आला तरी जनावराच्या फार जवळ न जाता उपचार करणे आदी प्रकारांमुळे आम्ही हवालदिल झालो आहोत. दररोज सहा ते सात लिटर दूध देणारी गाय आता थांबली आहे. आमचे रोजचे दोनशे रुपयांचे आर्थिक नुकसान होत आहे. उपचारासाठी धावाधाव होत असल्याने मानसिक त्रास होत आहे. पशुसंवर्धन विभागाकडे पुरेसे पशुतज्ज्ञ नाहीत, त्यामुळे त्यांचा पशुपालकांशी फारसा संपर्क नाही. यामुळे लम्पी स्कीन आजारावर तातडीने उपचार होणे आव्हानात्मक ठरले आहे.

- संदीप पाटील, चिपरी,ता. शिरोळ, जि. कोल्हापूर

महत्त्वाचे मुद्दे ...

भटक्या जनावरांची संख्या, त्यांची कमी रोगप्रतिकारशक्ती, त्याचबरोबर उत्तर भारतातील गोशाळांमधील जनावरांची गर्दी, दुय्यम आरोग्य दर्जा यामुळे मोठ्या प्रमाणात गुजरात, राजस्थानमध्ये वेगाने प्रसार.

बाधित जनावरे विलगीकरणात ठेवा. बैलांकडे दुर्लक्ष करू नका.

थायलेरिअसिस, बबेसिओसिस अशा सहविकृतीसह जर लम्पी स्कीन आजार दिसला तर उपचार करताना सर्वंकष विचार करा.

लसीकरणानंतर प्रतिकार शक्ती निर्माण होण्यासाठी १५ ते २१ दिवस लागतात.

सामुदायिक नियंत्रणासाठी ग्रामपंचायत, नगर परिषदांनी पुढाकार घ्यावा.

पशुपालकांनी गोठा, जनावरांची स्वच्छता ठेवावी. डास, गोचीड, गोमाश्या, घरातील माश्यांचा प्रादुर्भाव वाढणार नाही याकडे लक्ष द्या.

- डॉ. व्यंकटराव घोरपडे ९४२२०४२१९५

(सेवानिवृत्त सहायक आयुक्त,

पशुसंवर्धन, जि. सांगली)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com