
वर्धा : राज्यात काही ठिकाणी जनावरांमध्ये लम्पी या चर्मरोगाची (Lumpy Skin Disease) लागण आढळून आली आहे. जिल्ह्यात या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये, यासाठी प्रशासनाने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश खासदार रामदास तडस (Ramdas Tadas) यांनी दिले. विकास भवन येथे जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची सभा खासदार तडस यांच्या अध्यक्षतेखाली पार पाडली.
त्या वेळी त्यांनी सदर निर्देश दिले. बैठकीला आमदार रामदास आंबटकर, आमदार डॉ. पंकज भोयर, आमदार दादाराव केचे, जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे, उपवनसंरक्षक राकेश सेपट, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सत्यजित बढे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक विश्वास सिद यांच्यासह समितीचे अशासकीय सदस्य व सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ज्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे राहिले असतील ते तातडीने पूर्ण करून शासनाकडे निधीची मागणी करावी.
अनुदान प्राप्त झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात यावी. बँकांनी काही कारणास्तव शेतकऱ्यांचे खाते गोठविले असल्यास ते सुरू करण्याबाबत स्वतंत्र बैठक बोलविण्याच्या सूचना तडस यांनी बैठकीत दिल्या. काही शेतकऱ्यांचे अनेक वर्षांपासून वीज कनेक्शन प्रलंबित आहे. तसेच ग्राहकांना येणाऱ्या वीज देयकामध्ये तफावत आढळून येत असल्याच्या तक्रारी आहे. याबाबत देखील बैठक घेण्याच्या सूचना त्यांनी केली. अतिवृष्टीमुळे केवळ शेतीपिकांचेच नव्हे तर जिल्ह्यातील अनेक लहान-मोठ्या पुलांचे देखील नुकसान झाले आहे. यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असल्याने ही पुले तात्पुरती दुरुस्ती करून घेण्यात यावी.
ज्या पात्र लाभार्थ्यांना अद्यापही उज्ज्वला योजनेचा लाभ मिळाला नसेल त्यांना तो देण्यात यावा. प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची यादी तयार करावी. यासाठी सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे. या योजनेच्या जुन्या कामांसाठी प्राप्त झालेले पैसे तातडीने खर्च करावे. आणि नवीन कामांसाठी निधीची मागणी करावी, असे निर्देश यावेळी बैठकीत देण्यात आले. केंद्र शासनाच्या विविध कल्याणकारी योजना आहेत. या योजनांची जिल्ह्यात चांगली अंमलबजावणी झाली पाहिजे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.