Animal Health Care : पावसाळ्यात गायी, म्हशी आजारी पडू नयेत म्हणून काय करावे?

Animal Immunity : पावसाळ्यातील प्रतिकूल वातावरणामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. जनावरांची रोगप्रतिकार क्षमता वाढण्यासाठी, खुरे मजबूत ठेवण्यासाठी झिंक आणि बायोटीनयुक्त पशुखाद्यपूरक दररोज खाद्यातून द्यावे.
Animal Management
Animal ManagementAgeowon
Published on
Updated on

Animal Husbandry Update : उन्हाळ्याच्या तीव्रतेनंतर येणारा पावसाळा हा ऋतू वातावरणात अचानक बदल करतो. वातावरणातील आर्द्रता वाढते. गोठ्यातील माती, जनावरांची लघवी व शेणामुळे झालेला चिखल तसेच हानिकारक जिवाणू वाढल्यामुळे गाई, म्हशी आजारी पडतात.

गोठ्याची जास्तीची स्वच्छता करावी लागते. हे लक्षात घेता छतावरून पडणारे पावसाचे पाणी थेट गोठ्यात येऊ न देणे तसेच गोठ्यातील जमिनीला योग्य उतार देऊन पाणी साठू न देणे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विविध उपाययोजना करूनही काही वेळा गोठ्यात चिखल होतो.

प्रतिकूल वातावरणामुळे जनावरे आजारी पडण्याचे प्रमाण वाढते. मुक्त गोठा असेल तर या अडचणी अजून वाढतात. सगळीकडे काँक्रीट कोबा करणे सोपे नाही, तसेच त्याला खर्चही जास्त येतो. हे लक्षात घेऊन पावसाळ्यात विविध उपाययोजना करणे आवश्यक आहे.

संतुलित आहार नियोजन

१) पावसाळ्यात कोवळे गवत जनावरांना जास्त खाण्यास देऊ नये. कोवळ्या गवतात ८५ टक्क्यांपेक्षा जास्त पाणी आणि कमी तंतुमय घटक असतात. पचन सुकर होण्यासाठी तंतुमय पदार्थाची आवश्यकता असते. कोठीपोट पाण्याने भरले असेल तर पचनाला त्रास होतो.

२) साठवणूक केलेला चारा, खाद्यावर या काळात बुरशीचा प्रादुर्भाव होऊ शकतो, असे खाद्य जनावरांना खाऊ घातल्यास यकृतावर विपरीत परिणाम होऊन पचन व प्रजननावर विपरीत परिणाम होऊ शकतो.

३) पावसाळ्यात खाद्य, चारा कोरड्या जागेत ठेवावा. बुरशी लागली आहे का याची वरचेवर तपासणी करावी. या काळात टॉक्सीन बाईंइंडरचा खाद्यात वापर करावा जेणेकरून बुरशी मुळे होणारे परिणाम कमी करता येऊ शकतील.

Animal Management
Milk Production Of Cows: गायीचे दुध वाढण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा

४) पावसाळी वातावरणात गाई, म्हशी आणि इतर जनावरांना त्यांच्या शरीराचे योग्य तापमान राखण्यासाठी ऊर्जेची गरज असते. शरीरावरील केस ओले असतील, तर ऊर्जेची गरज अजून वाढते. पशुखाद्यात ऊर्जायुक्त घटक जसे मका १ किलो किंवा बायपास फॅट १०० ग्रॅम अतिरिक्त द्यावेत.

५) जनावरांची रोग प्रतिकारक्षमता वाढण्यासाठी, खुरे मजबूत ठेवण्यासाठी झिंक (जस्त) आणि बायोटीनयुक्त पशुखाद्यपूरक दररोज खाद्यातून द्यावे.

६) जनावरांच्या गोठ्याची दररोज स्वच्छता ठेवावी. पाणी साठून राहणार नाही याची काळजी घ्यावी. लघवी, शेणाची योग्य विल्हेवाट लावावी, नाहीतर त्याद्वारे रोग पसरू शकतात.

जनावरांचे व्यवस्थापन :

१) पावसाळी वातावरणात हवेतील आर्द्रता वाढते. जमिनीवरील ओलसरपणामुळे वेगवेगळ्या प्रकारच्या जिवाणूंची वाढ होते. जनावरांना जंताचा प्रादुर्भाव होतो. म्हणून पावसाळ्यात सर्व जनावरांना जंत निर्मूलन औषधे पशुवैद्यकाच्या सल्ल्याने द्यावे.

२) पावसाळ्यातील ओलसरपणामुळे गोठ्यात गोचीड, पिसवा यांचे प्रमाण वाढते. त्याद्वारे पसरणारे आजार वाढण्याची शक्यता असते. त्यांचे नियंत्रण महत्त्वाची बाब आहे.

३) उपद्रव देणाऱ्या माश्‍या, डास जनावरांचे लक्ष विचलित करतात. काही माश्‍यांच्या चाव्यामुळे जनावरांना वेदना होऊन त्याचा विपरीत परिणाम दूध उत्पादनावर होतो.

४) पावसाळ्यात कासदाहाचे प्रमाण वाढते, कारण जनावरे बसण्याची जागा कोरडी राहत नाही. दूध काढण्याअगोदर आणि नंतर जंतुनाशक द्रावणाने कास स्वच्छ करावी.

५) गोठ्यामध्ये जंतुनाशकाची फवारणी करावी. माश्‍यांचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घेऊन फवारणी करावी.

६) गोठ्यामध्ये काही ठिकाणी पाणी गळत असेल तर वेळीच डागडुजी करावी. गोठ्यात हवा खेळती राहील याची दक्षता घ्यावी.

७) गोठ्यामध्ये स्वच्छता ठेवावी, जेणेकरून लघवी व शेणावाटे निघणारे अमोनिया, मिथेन वायूमुळे जनावरांच्या डोळ्यांना त्रास होणार नाही.

८) वारा, थंडीपासून बचाव करण्यासाठी योग्य निवारा, गाभण गाई, म्हशींची योग्य व्यवस्था, आरामदायी व उबदार बसण्याची सुविधा तसेच शक्य तेवढे कोरडे वातावरण या काळात ठेवावे.

९) पावसाळ्यात जमीन ओली, भुसभुशीत झाल्यामुळे जनावर घसरून त्यांना इजा होऊ शकते. दगड व माती खुरांमध्ये जाऊन बसल्यामुळे जनावरांना जखमा होतात. यासाठी खुरांची नियमित तपासणी करावी.

१०) पावसाळ्यात ओलसरपणामुळे खूर खराब झाल्यास त्या वेदनांमुळे दुभत्या गाई, म्हशींच्या उत्पादनावर परिणाम होतो.

११) आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी वेळेवर लसीकरण करावे.

कोळशाच्या राखेचा बेड म्हणून वापर :

पावसाळ्यात गोठ्यात पाणी न साचणे, हानिकारक आजार पसरवणाऱ्या जिवाणूंची वाढ न होणे, जनावरे आजारी पडू नयेत यासाठी अतिशय सोपा व कमी खर्चाचा उपाय म्हणजे गोठ्यातील जमिनीत कोळशाच्या राखेचा वापर करावा. कोळशाची राख गोठ्यातील मातीत मिसळावी किंवा नुसता १२ ते १४ इंच उंचीची गादी गोठ्यात केल्यास फायदे आहेत.

बेड तयार करण्याची पद्धत :

१) गोठ्याच्या रुंदी इतका १२ ते १४ इंच खोल खड्डा करावा.

२) कोळशाची राख ट्रकमधून किंवा ट्रॅक्टरमधून आणल्यावर खड्ड्यात ओतताना पाणी मिसळावे. जेणेकरून त्याचा घट्ट बेड तयार होण्यास मदत होईल.

३) राखेमध्ये मातीचे मिश्रण करू शकतो, त्यामुळे पाणी जास्त लागणार नाही.

४) कोळशाच्या राखेमध्ये दोन प्रकार असतात. वजनाला हलकी असणारी फ्लाय अॅश आणि वजनाला थोडी जड अशी बॉटम अॅश. दोन्हींचे पन्नास टक्के मिश्रण बेडसाठी चांगले ठरते.

५) राखेचा बेड तयार करताना पाण्याचा योग्य वापर केल्यास, सुकल्यावर त्याला चांगला कठीणपणा येतो.

६) पावसाळा सुरु होणे अगोदरच असा राखेचा बेड बनवून घ्यावा.

Animal Management
Global Warming : भारतातील दुध उत्पादकांचे १५ हजार कोटींचे नुकसान

जनावरांसाठी फायदा :

१) राखेचा सामू १० ते ११ असल्यामुळे यात जिवाणूंची वाढ होत नाही.

२) राखेचा बेड पाणी शोषून घेत असल्याने गोठ्यात चिखल होत नाही.

३) जास्त ऊन असेल तरी राख थंड असल्याने जनावरांना गरम होत नाही.

४) कासेच्या आजाराचे प्रमाण नियंत्रित राहते.

५) जनावरांचे खुरे खराब होत नाहीत. पायांना आराम मिळतो.

६) कोरडी जागा बसण्यास उपलब्ध असल्यामुळे जनावरे रवंथ करण्याचे प्रमाण वाढते.

कासदाहाला प्रतिबंध :

१) पावसात गोठा ओला असल्याने गाई, म्हशी बसतात त्या जागेत जिवाणूचा प्रादुर्भाव जास्त असतो. मुक्त गोठ्यामध्ये बाहेरील मोकळ्या जागेत चिखल होऊन पाणी साठू शकते, अशा वेळी गाई, म्हशींना कासदाह होऊ शकतो. यामुळे सड कायम स्वरूपी खराब होण्याची शक्यता असते. हा धोका टाळण्यासाठी गोठ्यामध्ये कोळशाच्या राखेचा बेड करावा.

२) आहारात झिंक या खनिजाचे प्रमाण वाढवावे. जनावरांना कोरड्या जागेत बसू द्यावे. पोटात आम्लता होऊ न दिल्याने जनावरे आजारी पडत नाहीत. जनावर आजारी पडून उपचार करण्यापेक्षा नेहमी प्रतिबंधात्मक उपाय योजावेत.

संपर्क - डॉ. पराग घोगळे, ९८९२०९९९६९, (लेखक पशुपोषण आणि व्यवस्थापन तज्ज्ञ आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com