Milk Production Of Cows: गायीचे दुध वाढण्यासाठी संतुलित आहार महत्त्वाचा

दूध उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा चारा- खाद्यावर होत असतो. गायीच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून आजही बहुतांश पशुपालक या तंत्रज्ञानापासून किंवा यातील बारकाव्यांपासून कोसो दूर आहेत.
Dairy Business
Dairy BusinessAgrowon
Published on
Updated on

डॉ. भास्कर गायकवाड

दूध उत्पादनामध्ये (Milk Production) भारत जगामध्ये अग्रस्थानी असला तरीही प्रतिगाय दूध उत्पादनामध्ये मात्र आपण फारच पिछाडीवर आहोत. प्रत्येक वेतामध्ये १२ ते १५ हजार लिटर दूध देणाऱ्‍या गायी परदेशात असताना;

आपल्या देशात मात्र हेच प्रमाण फक्त २००० ते २५०० लिटरच्या दरम्यान आहे. १९५० च्या दरम्यान ऑस्ट्रेलियामध्ये भारतातील साहिवाल जातीच्या गायी नेऊन तेथे चांगल्या जातीचा गोवंश तयार करून भरपूर प्रमाणात दुधाचे उत्पादन घेतले जाते.

ब्राझील आणि अमेरिकेनेही भारतातील गीर ही जात नेऊन तेथे चांगल्या प्रतीच्या गायींची निर्मिती केली. भारतात मात्र आपल्याकडे असलेल्या चांगल्या गो-वंशावळीचा विचार न करता परदेशी वळूंच्या वीर्याचा वापर करून संकरीकरण केले आणि त्यातून धवलक्रांती झाली.

सुरुवातीच्या काळात उत्पादनात वाढ झाली. परंतु जसजसे परदेशी गायीच्या रक्ताचे प्रमाण वाढत गेले तसतसे उत्पादनात वाढ तर झालीच नाही याउलट गायींच्या आरोग्याचे गंभीर प्रश्‍न निर्माण झाले.

देशातील प्रत्येक राज्यात व प्रत्येक भागात तेथील हवामानात अनुकूल अशा प्रकारच्या भारतीय वंशाचे गोधन होते. ज्यांची दूध उत्पादन क्षमता, दुधाची प्रत तसेच प्रतिकूल वातावरणात तग धरून ठेवण्याची क्षमता त्यांच्यात होती.

तसेच उपलब्ध चारा आणि व्यवस्थापनावरही त्यांची उत्पादकता चांगली होती. धवलक्रांतीला ५० वर्षे होत असताना मात्र शाश्‍वत दुग्ध व्यवसायावर गांभीर्याने विचार करण्याची वेळ आलेली आहे.

Dairy Business
Milk Meter In Dairy : मिल्कोमीटर वापरणे झाले बंधनकारक; दूध उत्पादकांची लूट थांबणार?

दुग्ध व्यवसायामध्ये योग्य प्रकारचे संकरीकरण करून चांगले उत्पादन देणाऱ्‍या गायीची उपलब्धता करणे, संतुलित आहार व्यवस्थापनातून दूध उत्पादन तसेच दुधाची प्रत सुधारणे आणि गायींच्या गोठ्याचे व्यवस्थापन करणे या तीन मूलभूत बाबी महत्त्वाच्या आहेत.

सद्यःस्थितीला दुग्ध व्यवसाय शाश्‍वत करायचा असेल तर सर्वांत महत्त्वाचा विषय हाती घ्यावा लागेल तो म्हणजे गायींचे संतुलित आहार व्यवस्थापन. दूध उत्पादनाच्या एकूण खर्चापैकी ६० ते ७० टक्के खर्च हा चारा- खाद्यावर होत असतो.

गायीच्या अन्नद्रव्ये व्यवस्थापनावर एवढ्या मोठ्या प्रमाणात खर्च करून आजही बहुतांश पशुपालक या तंत्रज्ञानापासून किंवा यातील बारकाव्यांपासून कोसो दूर आहेत.

गायीच्या वाढीसाठी, दूध उत्पादन आणि चांगल्या प्रतीसाठी, तसेच एकूणच गायीचे आरोग्य उत्तम ठेवून चांगले प्रजनन होण्यासाठी गायीच्या आहारात कर्बोदके, प्रथिने, स्निग्ध पदार्थ, सूक्ष्म अन्नद्रव्ये आणि जीवनसत्त्वे यांचा संतुलित वापर होणे महत्त्वाचे असते.

विशेषतः ज्या वेळी आपण जास्त उत्पादन देणाऱ्‍या गायीचे संगोपन करतो त्या वेळी त्यांना संतुलित आहार दिला नाही, तर त्याचा परिणाम दूध उत्पादन आणि प्रजननावर होऊन मोठ्या प्रमाणात नुकसान होते.

जास्त दूध देणाऱ्या गायीला विण्यापूर्वीचे तीन ते चार आठवडे आणि विल्यानंतरचे चार ते आठ आठवडे या काळात मोठ्या प्रमाणात ऊर्जेची गरज असते. या काळात तिचे योग्य पोषण झाले नाही तर तिच्या शरीरात साठविलेल्या ऊर्जेवर काही दिवस राहते आणि नंतर शरीरामध्ये मोठ्या प्रमाणात ऊर्जेची तूट निर्माण होऊन दुधाच्या उत्पादनावर, तसेच प्रतीवरही अनिष्ट परिणाम होतो.

प्रजननक्रियेवरही अनिष्ट परिणाम होऊन गाय गाभण राहत नाही. या काळात गायी जास्त प्रमाणात कोरडा चारा खात नाहीत. त्यामुळे या काळात ऊर्जा वाढविण्यासाठी योग्य ती काळजी घेणे गरजेचे असते.

जनावरांच्या आरोग्यासाठी तसेच दुधाचे उत्पादन आणि गुणप्रत वाढविण्यासाठी प्रथिनांचा वापर जास्त प्रमाणात करावा लागतो. प्रथिनांचा वापर जास्त प्रमाणात करत असलो, तरी त्याचा प्रत्यक्ष किती उपयोग होतो आणि किती वाया जातो याचाही विचार होणे गरजेचे आहे.

गायीला लागणाऱ्‍या अनेक अन्नद्रव्यांपैकी एक अन्नद्रव्य म्हणजे क्रोमिअम. क्रोमिअममुळे गायीच्या शरीरातील अ‍ॅण्टिऑक्सिडंट वाढविल्यामुळे तिची प्रतिकारक्षमता तसेच कार्यक्षमता वाढते. यामुळे बदलत्या वातावरणातही जनावरे आजारी पडत नाहीत.

गायीच्या दूध उत्पादनामध्ये ऊर्जेला फार महत्त्व आहे. ही ऊर्जा रक्तातील ग्लुकोज आणि फॅटी अ‍ॅसिड वाढल्यामुळे मिळते.

गायीच्या शरीरामध्ये इन्सुलिनचे प्रमाण संतुलित ठेवल्यामुळे रक्तातील ग्लुकोज वाढण्याला मदत होते. यामुळे गायीला जास्त प्रमाणात ऊर्जा मिळून दूध उत्पादन वाढते. विशेषतः ज्या वेळी गायीच्या शरीरात ऊर्जेची कमतरता होते. त्या वेळी क्रोमिअमचा वापर केल्यास त्याचे चांगले निष्कर्ष मिळतात.

यामुळे जनावरे कोरडा चाराही जास्त खातात. शरीरामध्ये तयार झालेल्या ऊर्जेचा कार्यक्षम वापर करण्यासाठी क्रोमिअम महत्त्वाचे कार्य करते. विशेषतः जास्त उत्पादन देणाऱ्‍या जनावरांसाठी तर फारच उपयुक्त आढळून आले आहे.

गायी विण्याच्या आधी तीन आठवडे आणि विल्यानंतर तीन ते चार आठवडे क्रोमिअमच्या वापरामुळे तिच्या शरीरात संतुलित ऊर्जा राहिल्यामुळे दूध उत्पादन वाढते. त्याचबरोबर प्रजननक्रिया चांगली राहून गाय लवकर गाभण राहते. चिलेटेड स्वरूपातील क्रोमिअम दिले तर त्याचा जास्त फायदा होतो.

Dairy Business
Sharad Pawar Letter On Dairy Import: केंद्र सरकारला आठवली तूप आणि लोणी आयातीची अवदसा; दूध उत्पादकाचं कंबरडं मोडणार?  

गायीच्या आहारामध्ये मुख्य अन्नद्रव्ये, तसेच सूक्ष्म अन्नद्रव्यांबरोबरच जीवनसत्त्वांचा वापर करणे गरजेचे असते. तसेच प्रो-बायोटिक्स, टॉक्झिन बाइंडर किंवा इतर तंत्रज्ञान ज्याचा वापर अत्यंत कमी प्रमाणात असतो. परंतु त्याचे फायदे मोठ्या प्रमाणात मिळतात.

गायीला संतुलित आहार देत असताना खाद्याचे सर्व अन्नघटक तसेच सर्व ओला, वाळलेला चारा चांगला एकत्रित करून दिवसातून दोनदाच खाऊ घातला तर त्याचा दूध उत्पादन आणि गाईच्या आरोग्यावर चांगला परिणाम होतो. टोटल मिक्स रेशन (टीएमआर) किंवा परिपूर्ण आहार या संकल्पनेचा वापर करून भविष्यात गायीच्या दुधाची उत्पादकता, दुधाची गुणवत्ता वाढविण्याबरोबरच त्यांचे आरोग्य चांगले ठेवू शकतो.

जनावरांना वर्षभर एकाच प्रकारचा संतुलित आहार दिला, तर त्यांच्या पोटामधील जिवाणूंची चांगली वाढ होऊन कार्यक्षमता वाढते. यामुळे दिलेल्या आहाराचा परिपूर्ण वापर करून जनावरांची कार्यक्षमता वाढते. ओल्या चाऱ्यासाठी मूरघासाचा वापर वाढविणे आवश्यक आहे.

वाळलेल्या चाऱ्याचा विचार केला तर चांगल्या प्रतीचा वाळलेला चारा तयार करून वापर केला तर त्यामुळे दुधाच्या उत्पादनाबरोबर गुणवत्ता वाढविण्यास मदत होते. वाळलेल्या चाऱ्‍यामधील पचनीय तंतुमय पदार्थ हे जनावरांमधील ऊर्जा वाढविणे आणि त्याची कार्यक्षमता वाढविणे यासाठी अत्यंत महत्त्वाचे कार्य करते.

गायीचे संतुलित आहारातून चांगले पोषण करत असताना त्यांना २४ तास शुद्ध पाण्याची उपलब्धता करून देणे महत्त्वाचे आहे. मुक्तसंचार पद्धतीचा गोठा हा यासाठी एकमेव पर्याय आहे.

भविष्यात निर्माण होणाऱ्या प्रश्‍नांचा विचार करून तसेच ग्रामीण भागात रोजगार निर्मितीचा विचार करून दुग्ध व्यवसायामध्ये मोठ्या प्रमाणात बदल करणे गरजेचे आहे. या अनेक बदलांमध्ये जनावरांच्या संतुलित आहाराचा शास्त्रोक्त पद्धतीने विचार करून त्याचा अवलंब केला तर निश्‍चितच हा व्यवसाय जास्त किफायतशीर आणि शाश्‍वत होईल.

(लेखक -शेतीप्रश्नांचे अभ्यासक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com