Animal Welfare : प्राणी कल्याणाबाबत जागरूक होऊयात...

Awareness about Animal Welfare : दरवर्षी आपल्या देशात १४ ते ३० जानेवारी या कालावधीमध्ये प्राणी कल्याण पंधरवडा साजरा केला जातो. समाजातील विविध स्तरांंमधील नागरिक, तसेच मुलांना प्राणी कल्याण याबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे.
Animal Welfare
Animal WelfareAgrowon

Animal Care : गाय, बैल, म्हैस, गाढव, घोडे, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इत्यादी प्राणी कृषिपूरक व्यवसाय तसेच दुग्ध उत्पादन आणि कुक्कुटपालनासाठी पाळले जातात. श्वान, मांजर, विविध पक्षी हे सहचर म्हणून पाळले जातात. प्राणी, पक्षी मग तो पाळीव असोत की बेवारस असो, त्यांच्या प्रती अजाणतेपणी किंवा काही वेळा मुद्दाम क्रूरतेचे कृत्य केले जाते. त्यातून प्राणी व पक्ष्यांना त्रास होणे, इजा होणे, माणसांप्रती भीती निर्माण होणे अशा घटना घडतात.

प्राण्यांप्रती समाजातील नागरिकांमध्ये आदर, करुणा वाढावी म्हणून दरवर्षी आपल्या देशात १४ ते ३० जानेवारी या कालावधीमध्ये प्राणी कल्याण पंधरवडा साजरा केला जातो. समाजातील विविध स्तरांंमधील नागरिक, तसेच मुलांना प्राणी कल्याण याबाबत जागरूकता निर्माण करणे हा उद्देश आहे. नागरिक प्राणी कल्याणाबाबत जागरूक होऊन त्यांच्यामध्ये प्राण्यांप्रती आदर, दया व करुणा या भावना वाढाव्यात, हीच त्यामागची अपेक्षा ठेवून राष्ट्रीय प्राणी कल्याण बोर्ड, प्राणी कल्याण पंधरवडा साजरा करण्यासाठी प्रोत्साहित करते.

प्राण्यांप्रती क्रूरतेचे समूळ उच्चाटन करण्यासाठी प्राणी कल्याण पंधरवडा साजरा करण्यात येतो. क्रूरता कशाला म्हणायचे याबद्दलही नागरिक सुजाण असणे गरजेचे आहे. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० प्रमाणे प्राणी, पक्षी यांच्या प्रति विविध बाबींना क्रूरता म्हणून संबोधले जाते. प्राणी क्लेश प्रतिबंधक कायदा १९६० अन्वये खालील बाबींचा क्रूरतेमध्ये समावेश केलेला आहे.

जर एखादी व्यक्ती प्राण्यांना मारत असेल, लाथ मारत असेल, क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बसवत असेल, क्षमतेपेक्षा जास्त भार वाहून नेण्यास भाग पाडत असेल, अत्याचार करत असेल आणि त्यातून प्रभावित पशूला अनावश्यक वेदना किंवा त्रासाला सामोरे जावे लागत असेल.

Animal Welfare
Animal Welfare Committee : ‘प्राणी क्लेष’ समितीसाठी प्रस्ताव सादर करावेत

जर एखादी व्यक्ती आजारी किंवा जखमी किंवा अयोग्य प्राण्यास काम लावत असेल.

जर एखादी व्यक्ती प्राण्याला हानिकारक औषधे देत असेल.

प्रवासादरम्यान जनावरांना दाटीवाटीने वाहनात घेऊन जाणे.

प्राण्यांना लहान आकाराच्या पिंजऱ्यात ठेवणे.

श्वानांना आखूड तसेच जाड साखळीने डांबून ठेवणे.

बंदिस्त पाळीव श्वानांना व्यायाम देण्यास दुर्लक्ष करणे.

प्राण्यांना योग्य प्रमाणात चारा व निवारा देण्यास असमर्थ असणे.

एखाद्या प्राण्याला सोडून देणे ज्यामुळे त्याला भूक व तहान लागून त्रास होणे.

जाणूनबुजून एखाद्या आजारी किंवा संसर्ग झालेल्या प्राण्यास मोकळे सोडून देणे.

विकृती, उपासमार, गर्दी किंवा इतर वाईट वागणूक यामुळे वेदनेने बाधित प्राण्यांना विक्रीसाठी ठेवणे.

एखाद्या प्राण्याला विषबाधा किंवा इतर क्रूर पद्धतीने मारहाण करणे किंवा मारून टाकणे (भटके श्वान व इतर प्राणी).

एखाद्या प्राण्याला अशा पद्धतीने बांधून ठेवणे जेणेकरून तो प्राणी शिकार करण्यासाठी एक वस्तू म्हणून करमणुकीच्या दृष्टीने वापरता येईल.

जर एखादी व्यक्ती त्याची जागा प्राण्यांच्या झुंजीसाठी किंवा प्राण्यांच्या झुंजी किंवा शर्यतीवर सट्टा लावण्यासाठी देत असेल.

जर एखादी व्यक्ती बंदी किंवा कैद केलेल्या प्राण्यांवर फैरी झाडत असेल तर किंवा त्यासाठी पुढाकार घेत असेल तर त्यास क्रूरता म्हणून संबोधले जाते. दोषी व्यक्तीवर प्राणी क्लेश प्रतिबंध कायदा १९६० प्रमाणे कारवाई केली जाते.

कृषी व दुग्धव्यवसायात पशुपालन करत असताना काही वैज्ञानिक उपाययोजना किफायतशीर व्यवसायासाठी अमलात आणाव्या लागतात. काही अपवादात्मक परिस्थितीत ठरावीक पशूंना नष्ट करावे लागते. यामध्ये लहान वासरांमध्ये शास्त्रोक्त पद्धतीने शिंगकळ्या खुडणे, बैलांमध्ये वेसण घालणे, खच्चीकरण करणे, ब्रॅडिंग करणे इत्यादी बाबींना क्रूरता म्हटले जात नाही.

मोकाट श्वानांना प्राणघातक कक्षांमध्ये मानवतावादी किंवा सौहार्दपूर्ण पद्धतीने मारणे, अमलात असलेल्या कोणत्याही कायद्याच्या अधिकारात प्राण्यांना मानवतावादी पद्धतीने मारणे आणि कायद्याने विहित प्राण्यांची मांस उत्पादनासाठी मानवतावादी पद्धतीने कत्तल करणे या बाबींचा क्रूरतेमध्ये समावेश होत नाही.

Animal Welfare
Welfare State : कल्याणकारी राज्याची संकल्पना कालबाह्य का?

जनावरांचे व्यवस्थापन

उत्तम निवारा : त्यामध्ये पशूंना चांगल्या प्रकारचा सुरक्षा प्रदान करणारा निवारा उपलब्ध करून देण्यात यावा. ज्यामध्ये पशूंना हालचाल करण्यासाठी आवश्यक तेवढी जागा उपलब्ध असेल. तेथील वातावरण आल्हाददायक असेल.

उत्तम आहार : सर्वांत प्रथम कोणताही पशू तहान व भुकेने व्याकूळ होणार नाही यासाठी आहार व्यवस्थापन करण्यात यावे. पशूंच्या उत्पादकतेला अनुसरून योग्य तो संतुलित व पोषक आहार उपलब्ध करून देण्यात यावा.

उत्तम आरोग्य : पशूंचे व्यवस्थापन उच्चतम प्रतीचे असावे. पशू जखमा, आजार किंवा व्यवस्थापनातील त्रुटींमुळे होणाऱ्या वेदना या यांपासून मुक्त राहतील.

योग्य वर्तन : पशूंचे वय, उत्पादकतेचा टप्पा या बाबींना अनुसरून वर्तनात बदल दिसून येतात. पशूंना योग्यप्रकारे सामाजिक वर्तन आचरणात आणता यावे यासाठी व्यवस्थापनात आवश्यक गोष्टी अमलात आणणे गरजेचे असते. पशू आणि मानव यांचे नाते उत्तम प्रतीचे असावे, जेणेकरून पशू ताण विरहित आनंदी आयुष्य जगतील.

पशुपालन करताना पशुपालकांची जबाबदारी

कोणत्याही प्रकारचे पशुपालन करताना त्याला योग्य निवारा देणे, संतुलित आहार पुरविणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना अवलंबणे, आजारी जनावरांवर वेळेत उपचार करवून घेणे, पाळीव प्राण्यांची जबाबदार पद्धतीने काळजी घेणे, असाध्य आजाराने ग्रस्त पशूंना मानवतावादी पद्धतीने इच्छामरण देणे, मांस उत्पादनासाठी संगोपन केलेल्या पशूंना मानवतावादी पद्धतीने व शास्त्रीय पद्धतीचा अवलंब करून कत्तल करणे या बाबींवर लक्ष केंद्रित करून कोणत्याही प्रकारे प्राण्यांना इजा, वेदना किंवा त्रास होणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.

पशूंना उच्चतम कल्याणकारी व्यवस्थेत ठेवण्यासाठी सर्वप्रथम त्यांना तहान, भूक व कुपोषण यांपासून मुक्त ठेवले पाहिजे. त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास, वेदना, जखमा व आजारपण यांपासून स्वातंत्र्य दिले पाहिजे.

पशूंचे पालनपोषण अशा प्रकारे करावे, की त्यांना त्यांच्या जीवनशैलीला सहजपणे व्यक्त करता आले पाहिजे. पशूंचे संगोपन अशा पद्धतीने करावे की, ज्यामध्ये त्यांना भीती व कोणत्याही प्रकारचा त्रास यापासून मुक्तता मिळेल.

डॉ. रवींद्र जाधव, ९४०४२७३७४३ (पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, उदगीर, जि.लातूर)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com