
Latur News : मुख्यमंत्र्यांच्या शंभर दिवसांच्या सात कलमी कार्यक्रमांतर्गत सरकारने पशुगणना मोहिमेचा अंतर्भाव केला आहे. यामुळे मोहिमेला गती मिळाली असून ही मोहीम अंतिम टप्प्यात आली आहे. यात लातूरने उद्दिष्टाच्या ९७ टक्के काम तडीस नेत राज्यात आघाडी घेतली असून धाराशिव जिल्ह्यात ८२ टक्के काम पूर्ण होऊन जिल्ह्यात राज्यात आठव्या क्रमांकावर आहे.
दोन्ही जिल्ह्यात लवकरच पशुगणनेचे काम पूर्ण होण्याची आशा पशुसंवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. पशुगणना ही केवळ आकडेवारी न राहता, ती पशुधनाच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाची असते. शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी, पशुपालकांना अनुदान, तसेच विविध पशुसंवर्धन कार्यक्रमांसाठी अचूक माहिती मिळावी यासाठी पशुगणना अनिवार्य आहे.
प्रादेशिक पशुसंवर्धन सहआयुक्त डॉ. नाना सोनवणे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. श्रीधर शिंदे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. भूपेंद्र बोधनकर यांनी कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने मोहीम तडीस नेण्यासाठी प्रभावी कृती आराखडा तयार करून पाठपुरावा केला. यासोबत बैठकांतून पशुपालकांना प्रोत्साहन दिले. यातूनच पशुगणना यशस्वी होण्यासाठी सर्व पशुपालक, पर्यवेक्षक, प्रगणक आणि अधिकारी योगदान दिले.
सरकारच्या विविध योजनांचा लाभ थेट मिळण्यासाठी पशुगणना आवश्यक असल्याचे सांगून आपल्या गायी, म्हशी, शेळ्या, मेंढ्या आणि कुक्कुट पक्ष्यांची नोंदणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन पशुपालकांना करण्यात आले. यातूनच जिल्ह्यातील एक हजार १३९ पैकी एक हजार १०५ गावांमध्ये पशुगणनेचे काम ९७ टक्के पूर्ण झाले आहे.
मोहिमेत आतापर्यंत पाच लाख २३ हजार ६९७ कुटुंबांची नोंदणी होऊन पशुधन गणना, तसेच सहा लाख २२ हजार ५४४ कुक्कुट पक्षी नोंदणी करण्यात आली आहे. उर्वरित ३४ गावांतील पशुगणना लवकरच पूर्ण करण्याचे लक्ष्य असल्याचे उपायुक्त डॉ. शिंदे यांनी सांगितले.
धाराशिव जिल्ह्याचीही पूर्णत्वाकडे वाटचाल
२१ वी पशुगणना २५ नोव्हेंबर २०२४ ते ३१ मार्च २०२५ या कालावधीत पार पडत असून धाराशिव जिल्ह्यातील ८२टक्के पशुगणना पूर्ण झाली आहे. राहिलेल्या पशुपालकांनी आपल्या सर्व पशुधनाची अचूक माहिती प्रगणकांकडे नोंदवावी, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे. जिल्ह्यातील ८९८ गावे आणि शहरी प्रभागांपैकी ६७२ ठिकाणी पशुगणना पूर्ण झाली आहे.
उर्वरित गणना वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रशासनाने प्रगणक आणि पर्यवेक्षकांना सूचना दिल्या आहेत. पशुगणनेसाठी ११० प्रगणक आणि २४ पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत.घरोघरी जाऊन गणना करणाऱ्या प्रगणकांना पशुपालक, शेतकरी आणि नागरिकांनी सहकार्य करावे,तसेच ज्या पशुपालकांनी आपले पशुधन किंवा शहरी भागातील पाळीव प्राणी नोंदवलेले नाहीत, त्यांनी जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्यात संपर्क साधावा,असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.