Animal Husbandry
Animal Husbandry Agrowon

Animal Husbandry : पशुपालनासाठी ‘केव्हीके‘ने करावा जिल्हानिहाय आराखडा

Animal Care : देशातील कोरडवाहू शेतकऱ्याला पशुपालनाने चांगली आर्थिक साथ दिली आहे. या क्षेत्रामध्ये दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे.
Published on

Pune News : देशातील कोरडवाहू शेतकऱ्याला पशुपालनाने चांगली आर्थिक साथ दिली आहे. या क्षेत्रामध्ये दरवर्षी गुंतवणूक वाढत आहे. हे लक्षात घेऊन कृषी विज्ञान केंद्रांनी शेती, फळपिकांच्या बरोबरीने पशुपालन आणि प्रक्रिया उद्योगाला गती देण्यासाठी जिल्हानिहाय स्वतंत्र आराखडा तयार करावा. संशोधनाच्या जलद विस्तारासाठी माहिती तंत्रज्ञानाची जोड द्यावी, असा सल्ला भारतीय कृषी संशोधन परिषदेचे माजी उपमहासंचालक(विस्तार) डॉ. किरण कोकाटे यांनी दिला.

पुणे येथील ‘अटारी‘ संस्थेमध्ये शुक्रवारी (ता. १४) राज्यभरातील पन्नास कृषी विज्ञान केंद्रातील पशुसंवर्धन विषय तज्ज्ञांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. कोकाटे यांनी मार्गदर्शन केले. चर्चासत्रामध्ये ‘माफसू‘चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील, संशोधन संचालक डॉ. एन. व्ही. कुरकुरे, विस्तार संचालक डॉ. अनिल भिकाने, ‘अटारी‘चे संचालक डॉ. एस. के. रॉय, ‘आयव्हीआरआय’चे प्रमुख शास्त्रज्ञ हरिप्रसाद एथल आदी मान्यवर उपस्थित होते.

Animal Husbandry
Animal Husbandry : खाद्य, आरोग्य व्यवस्थापनातून यशस्वी पशुपालन

या वेळी डॉ. कोकाटे म्हणाले की, पशुपालनामध्ये युवा शेतकरी आणि महिलांचा सहभाग वाढत आहे. गाय, म्हैस पालनासह शेळी, मेंढीपालन, व्यावसायिक तसेच परसबागेतील कोंबडीपालन आणि शेततळ्यातील मत्स्य पालनाला गती मिळाली आहे. हे लक्षात घेऊन आपल्या विभागातील लोकांची गरज लक्षात घेऊन जिल्हानिहाय पशुसंवर्धनाचा आराखडा तयार करावा. विशेषतः पशू आरोग्य, आहार, चारा पिकांच्या लागवडीवर भर द्यावा. प्रत्येक जिल्ह्यात चारा उत्पादन करणारी गावे तयार करावीत. यातून नवीन रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे.

‘माफसू‘चे कुलगुरू डॉ. नितीन पाटील म्हणाले की, राज्यातील शेतकऱ्यांच्या पशुपालन हा एक स्वतंत्र व्यवसाय झाला आहे. दरवर्षी यामध्ये वाढ होत आहे. आमच्या विद्यापीठाने विकसित केलेले तंत्रज्ञान कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी जिल्हानिहाय विशेष प्रशिक्षणांचे आम्ही आयोजन करीत आहोत. येत्या काळात जैवसुरक्षा, पशू उत्पादकता वाढ, सकस चारा आणि प्रक्रिया उत्पादनांच्यावर लक्ष केंद्रित करावे लागणार आहे.

डॉ. भिकाने म्हणाले की, पशुपालन करताना जातिवंत जनावरांच्या संगोपनासाठी पैदास धोरण योग्य पद्धतीने राबवावे लागेल. यासाठी लिंगवर्गीकृत रेतमात्रा, भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा आहे. संभाव्य आजारांची साथ लक्षात घेऊन ‘माफसू‘ने राज्यासाठी वार्षिक लसीकरणाचा आराखडा तयार केला आहे. तो कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून पशुपालकांच्यापर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

Animal Husbandry
Animal Husbandry : सुधारित तंत्रातून पशूसखी होताहेत सक्षम

डॉ .कुरकुरे म्हणाले की, पशुपालनासह कुक्कुटपालन हा राज्याचा महत्त्वाचा उद्योग आहे. व्यावसायिक कुक्कुटपालनासह महिलांच्या रोजगार निर्मितीसाठी परसबागेतील कुक्कुटपालनाला चांगली संधी आहे. देशभरातील संशोधन संस्थांनी कोंबड्यांच्या सुधारित जाती आणि व्यवस्थापन तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्यांच्या प्रसार कृषी विज्ञान केंद्रांच्या माध्यमातून

जलद गतीने करावा.

‘अटारी‘चे संचालक डॉ. एस. के. रॉय म्हणाले की, देशभरातील कृषी विज्ञान केंद्रांच्या समन्वयातून आम्ही पशुपालनातील तंत्रज्ञान प्रसाराला गती दिली आहे. विविध विषयातील तज्ज्ञांसाठी देशभरात प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक प्रकल्पांचे आयोजन केले आहे. चर्चासत्राचे सूत्रसंचालन ‘अटारी‘मधील प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. शाकीर अली सैय्यद, डॉ. राजेश टी. आणि तुषार आथरे यांनी केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com