Animal Husbandry : सुधारित तंत्रातून पशूसखी होताहेत सक्षम

Govind Foundation NGO : फलटण (जि.सातारा) येथील गोविंद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून महिला पशूपालकांच्यासाठी विशेष उपक्रम राबविले जातात. यामध्ये मुक्त संचार गोठा, आहार व्यवस्थापन, जातिवंत पैदास, स्वच्छ दूध निर्मितीबाबत नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्यात येत आहे.
Activity of Animal Husbandry
Activity of Animal HusbandryAgrowon
Published on
Updated on

Special Activities for Animal Husbandry : फलटण (जि.सातारा) येथील गोविंद फाउंडेशन या स्वयंसेवी संस्थेच्या संचालिका श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर या अभ्यासदौऱ्यासाठी हॉलंडमध्ये गेल्या होत्या. याठिकाणी आधुनिक पद्धतीने व्यवस्थापन असलेल्या गाईंच्या गोठ्याला त्यांनी भेट दिली होती. या ठिकाणी एक महिला सुमारे २५० जनावरांचे व्यवस्थापन करत होती. या आधुनिक गोठ्यामध्ये सर्व गाईंना जागेवरच खाद्य दिले जाते. गाईंच्या धारा स्वयंचलित यंत्राने काढण्यात येतात. जास्तीत जास्त यांत्रिकरणांचा वापर करून या महिलेने गाईंचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला होता.

यातूनच प्रेरित होऊन त्यांनी फलटण भागातील पशुपालन करणाऱ्या महिलांच्यापर्यंत नवीन तंत्रज्ञान पोहोचविण्यास सुरवात केली. या प्रयोगशील ४५ महिला पशुपालकांनी पंजाब राज्यामध्ये आधुनिक पद्धतीने पशू आणि गोठा व्यवस्थापनाचा अभ्यासदौरा केला. या माहितीच्या आधारे स्वतःच्या गोठ्यामध्ये या तंत्रज्ञानाच्या अवलंबास सुरवात केली आहे. आत्तापर्यंत संस्थेच्या माध्यमातून १२०० हून अधिक महिलांनी प्रशिक्षण घेत पशुपालन आर्थिकदृष्टया सक्षम करण्यास प्राधान्य दिले आहे.

संस्थेचे विविध उपक्रम

संस्थेने महिला पशुपालकांच्या साथीने मुक्त संचार गोठा व्यवस्थापनाला प्राधान्य दिले आहे. यामुळे गाईंचे आरोग्य चांगल्या प्रकारे राहिले आहे. कष्ट कमी होऊन दुग्धोत्पादनास चालना मिळाली आहे.

चारा टंचाईच्या काळात हिरव्या चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी संस्थेने महिलांना मूरघास निर्मिती प्रशिक्षण दिल्याने पुरेसे पोषक खाद्य उन्हाळ्यातही उपलब्ध झाले आहे.

संस्थेच्या माध्यमातून गोठ्यामध्ये जातिवंत दुधाळ गाय, कालवड तयार होण्यासाठी उच्च गुणवत्तेची लिंगवर्गीकृत रेतमात्रा आणि भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येत आहे. यामुळे सुमारे ७,५५९ हून अधिक उच्च गुणवत्तेची वासरे गोठ्यात तयार होत आहेत.

उपलब्ध शेणापासून प्रॉम खत निर्मिती संस्थेच्या माध्यमातून चालना मिळाली आहे. यामुळे शेतीसाठी गुणवत्तापूर्ण खत उपलब्ध झाले आहे. सध्या ८६५ महिलांनी प्रॉम निर्मितीला सुरवात केली आहे.

संस्थेच्या माध्यमातून महिला पशुपालकांना आत्तापर्यंत ५,२२५ बायोगॅस युनिटचा पुरवठा झाला आहे. यामुळे शाश्वत इंधनाची सोय झाली, खर्चामध्ये बचत झाली तसेच शेणस्लरीच्या माध्यमातून सेंद्रिय खताची उपलब्धता वाढली आहे. यातून जमीन सुपीकतेला महिला शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे.

Activity of Animal Husbandry
Animal Husbandry : खाद्य, आरोग्य व्यवस्थापनातून यशस्वी पशुपालन

अभ्यास दौऱ्यात गवसले नवे तंत्र

पंजाबमधील शेतकरी कमी मजुरांच्यामध्ये जनावरांचे व्यवस्थापन करतात. कमी खर्चातील यांत्रिकीकरणाकडे त्यांचा कल आहे. १०० ते १५० गाईंचे व्यवस्थापन २ ते ३ मजुरांमध्ये केले जाते. मुक्तसंचार गोठ्यामध्ये उंच हवेशीर शेड, प्रत्येक गाईला फिरण्यासाठी मुबलक जागा उपलब्ध आहे. आरामशीरपणे चारा खाता येईल अशी गव्हाण आणि स्वच्छ पाण्याची उपलब्धता असते. गाईंना बसण्यासाठी मऊ आरामदायी जागा आहे. गोठ्यामध्ये गाभण गाई, नुकत्याच व्यायलेल्या गाई, जास्त दूध देणाऱ्या गाई, आजारी गाई तसेच वासरांच्या वयोमानानुसार पाळणा घर, ग्रोअर, हिफर असे विभाग आहेत. उन्हाळ्यात शेडमधील तापमान नियंत्रणासाठी फॉगर्स, पंख्याची सोय आहे.

गाईंना गुणवत्तेचे संतुलित खाद्य दिले जाते. सकस चारा दिल्याने दुग्धोत्पादन, आरोग्य, प्रजनन चांगले राहते. उत्पादन खर्च कमी येतो. येथील पशुपालक कमी पशुखाद्य आणि अधिक गुणवत्तेचा भरपूर हिरवा चारा देतात. हिरव्या चाऱ्यामध्ये मका, ओट आणि द्विदल चाऱ्यामध्ये बरसीमचे प्रमाण अधिक आहे. एकदल चारा मुरघासाच्या माध्यमातून दिला जातो. बरसीम हे नेहमीप्रमाणे दिले जाते. बीट पल्पचा पशू आहारात वापरकरून खर्च कमी केला जातो. खाद्य देताना मुरघासासोबत गव्हाचे काड मिसळले जाते. गरजेप्रमाणे संपूर्ण मिश्र आहार दिल्याने जनावरांना आवश्यक तंतुमय पदार्थ मिळतात.

जनावरांना दिवसातून १ किंवा २ वेळा भरपूर आहार दिला जातो. दुसऱ्यावेळी ज्यावेळी आहार दिला जातो, त्यावेळी थोडा अगोदरचा आहार शिल्लक असतो. आहारात मिक्सर वॅगनचा वापर करून दूध देण्याच्या क्षमतेप्रमाणे संपूर्ण मिश्र संतुलीत आहार (टिएमआर) दिला जातो. यामध्ये ओला चारा,मुरघास, सुका चारा,पशुखाद्य, खनिज मिश्रण आणि खाद्यपूरक एकाचवेळी मोठ्या मिक्सर वेगनमध्ये चांगल्याप्रकारे मिसळून तयार करतात. जनावराच्या गरजेप्रमाणे आवश्यक वेगवेगळे अन्नघटक वापरले जातात. पूर्ण आहार असल्याने कोठी पोटाचे आरोग्य चांगले राहते. पचनही चांगले होते.२४ तास स्वच्छ पाणी दिले जाते.

लहान वासरांना पुरेसे दूध पाजले जाते. त्यानंतर गरजेप्रमाणे मिल्क रिप्लेसर, काल्फ स्टार्टर, काल्फ ग्रोव्हर, हिफर ग्रोव्हर खाद्य गरजेप्रमाणे देतात. योग्यवेळी जंतनाशक, लसीकरण करतात, त्यामुळे चांगली वंशावळ असलेली वासरे ९ ते ११ महिन्यात योग्य वजन मिळवून माजावर येतात. पहिल्याच वेतात प्रति दिन ३५ ते ४० लिटर दूध देतात.

पंजाबमधील शेतकरी खर्च कमी करण्यासाठी यांत्रिकीकरणावर भर देतात. मुक्तसंचार गोठ्यामध्ये शेण गोळा करणारे यंत्र, मिल्किंग पार्लर,स्वयंचलित ग्रुमिंग ब्रश, तापमान नियंत्रणासाठी स्वयंचलित फॉगर्स, टोटल मिक्स राशन यंत्र, कुट्टी यंत्र, चारा कापणी यंत्र, मशागत यंत्र, मुरघास निर्मिती यंत्राचा वापर केला जातो.

Activity of Animal Husbandry
Animal Husbandry Business : जनावरांसाठी पौष्टिक झाडपाल्याचा वापर

जातिवंत पैदाशीवर भर

पंजाबमधील पशुपालक जातिवंत दुधाळ वंशावळ तयार करतात. त्यासाठी वंशावळीचा आराखडा तयार असतो. यामध्ये कोणत्या गुणधर्माची गाय आहे, होणारे वासरू कोणत्या गुणधर्माचे मिळवायचे आहे, त्यानुसार वळू निवड केली जाते. उच्च गुणवत्तेच्या रेतमात्रा आयात करून गरजेप्रमाणे वापरल्या जातात.

वळूच्या मातेच्या दूध उत्पादनाच्याबरोबरीने गुणवत्ता, आजारी पडण्याचे प्रमाण, विण्याच्या वेळी अडचण नसणारी, कासेची चांगली ठेवण, पोटाचा चांगला आकार, कोणत्याही वातावरणात सहनशीलता तपासली जाते. परिपूर्ण अभ्यास करून कृत्रिम रेतनासाठी रेतमात्रा उपलब्ध असतात.

पशुपालक फक्त कालवड होणाऱ्या रेतमात्रांचा वापर करतात. बरेच पशुपालक विक्रीसाठी जातिवंत कालवड तयार करतात. त्यांच्याकडे कालवडींची अगाऊ नोंदणी असते.

गोविंद फाउंडेशनच्या माध्यमातून महिला पशूपालकांच्यासाठी प्रशिक्षण आणि राज्य, परराज्यात अभ्यासदौरे सुरू केले. त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत. ५० गाईंचा गोठा व्यावसायिक पद्धतीने सांभाळणाऱ्या महिला पशुपालक तयार झाल्या आहेत.
श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर, संचालिका, गोविंद फाउंडेशन
मुक्तसंचार गोठा, मुरघास, उच्च वंशावळ आणि घरगुती उपचाराबाबत आम्हाला प्रशिक्षण मिळाले. आम्ही नुकताच पंजाब राज्यातील पशुपालक आणि संशोधन संस्थांना भेट दिली. हे तंत्रज्ञान आमच्या गोठ्यात वापरण्यास सुरवात केली आहे.
सौ. स्वाती पवार, मुंजवडी प्रतीक्षा खेतमाळीस ९५२९०३६१३२ (प्रकल्प अधिकारी, गोविंद फाउंडेशन,फलटण,जि.सातारा)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com