
डॉ. प्रवीण बनकर
कठाणी गोवंश प्रामुख्याने पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि चंद्रपूर जिल्ह्यात (झाडीपट्टी) आढळून येते. वैनगंगा नदीची उपनदी असलेली आणि गडचिरोली शहराच्या जवळून वाहणाऱ्या ‘कठाणी’ नदीवरून या गोवंशाचे नामकरण करण्यात आले आहे. मात्र स्थानिक गोंडी गोपालक या गोवंशाला ‘गावठी किंवा मुलखी गाय’ म्हणून संबोधतात.
शतकापूर्वी ब्रिटिशांनी चंद्रपूर जिल्ह्यात या गोवंशाची ‘तेलंगपट्टी’ म्हणून नोंद केल्याची दिसून येते. मध्यम आकाराचे या गोवंशाचे बैल शेतीकामासाठी उपयुक्त असल्याचे जिल्ह्याच्या गॅझेटियरमध्ये नमूद केलेले आहे. पूर्व विदर्भ हा जास्त पर्जन्यछायेचा प्रदेश असून येथील हवामान उष्ण व दमट असून भातशेतीसाठी पोषक असलेल्या शेतामध्ये कष्ट करण्यास अनुकूल अशी मध्यम आकारमानाचा कठाणी गोवंश येथे विकसित झाला.
विसाव्या पशुगणनेत पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली आणि भंडारा या जिल्ह्यात असलेल्या देशी गोधनांपैकी कठाणी गायीची संख्या अभ्यासकांनी सुमारे ५१ हजार इतकी नोंदविली आहे. पुणे येथील बाएफ संस्थेच्या पुढाकारातून राष्ट्रीय स्तरावर कठाणी गोवंशाची ५१वी गोधन जात म्हणून नोंद करण्यात आली आहे.
पशुपालक नैसर्गिक पद्धतीने रेतन करण्यास अधिक आग्रही आहेत मात्र पैदासक्षेत्रात प्रजननक्षम गोधनाची संख्यावाढ करवायची असल्यास कृत्रिम रेतन तंत्रज्ञानाचा अवलंब पशुपालकांनी करणे गरजेचे आहे. कठाणी गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थानिक पशुपालक ब्रीड सोसायटीच्या माध्यमातून सक्रिय होताना दिसत आहेत. तथापि, नव्याने नोंदणीकृत झालेल्या या गोधनाच्या संख्यात्मक वाढीसाठी, दुधाच्या उत्पादन क्षमतेस बळकटी देण्यासाठी आणि पैदासधोरणाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी युवकांनी जातिवंत कठाणी वळूचे संगोपन करण्यास पुढे येणे गरजेचे आहे.\
वैशिष्टे
भात शेतीच्या (धान) आणि लाल मातीच्या या परिसरात रंगाने मुख्यतः पांढरे (क्वचित काळ्या, पिवळसर राखाडी किंवा फिकट तपकिरी रंगाचे) आणि दिसायला अंगकाठीने गवळाऊ गोवंशापेक्षा भिन्न असल्याचे सहज लक्षात येते.
काळपट रंगाची शिंगे, लहान आकाराचे वशिंड, आटोपशीर लहान शारीरिक बांधा, लहानसा पण मजबूत पाय कठाणी गोवंशाला चपळता प्रदान करतात.
शारीरिक गुणधर्म जसे, काळेभोर डोळे, नाकपुड्या काळ्या तर क्वचित फिकट गुलाबी, उभट ठेवणीचे आखूड कान आणि गाजऱ्या रंगाची खुरे वेगळेपण दर्शवितात.
स्थानिक वातावरणास जुळवून घेत निकृष्ट चाऱ्याच्या मोबदल्यात सकस दूध देण्याची क्षमता कठाणी गोवंशात आहे. विशेष काही व्यवस्थापन न करता देखील दिवसाकाठी ४ ते ५ लिटर दूध देणाऱ्या कठाणी गायी गोपालकांच्याकडे दिसतात.
मध्यम आकाराचे चपळ असे कठाणी बैल देखील येथील विषम वातावरणात, धानाचे धांडे आणि पालापाचोळा खाऊन शेतीकामात उत्तमपणे मदत करतात. दिवसाला सरासरी सहा तास काम करण्याची विलक्षण क्षमता कठाणी बैलामध्ये असल्याने पशुपालक आणि शेतकऱ्यांची स्थानिक बाजारात कठाणी गोवंशाला विशेष मागणी असते. स्थानिक गोंड पशुपालक कठाणीच्या उमद्या बैलजोड्या बाजारात विक्री करताना दिसतात.
पारंपरिक पद्धतीने गोंड आदिवासी समुदाय कठाणी गोवंशाचे कळप राखतात. भाताचे तणीस, ज्वारीचा कडबा, सोयाबीन कुटार आणि गवत असा आहार या गोवंशाला दिला जातो. हिरवा चारा उपलब्ध नसताना, कुकुस, भाताचे तुसे आणि मोहफुले यांचा वापर पूरक खाद्य म्हणून केला जातो. साधारणतः गोपालक खनिज मिश्रण देत नाहीत. लाकडी डोंगीमध्ये आदल्या दिवशी साठवलेले शिळे अन्नपदार्थ, खाद्य, धानाच्या कुकुससोबत मिश्रण करून बैलांना आणि दुभत्या गायींना सकाळी अलप म्हणून खाऊ घालतात.
- डॉ. प्रवीण बनकर, ९९६०९८६४२९,
(सहयोगी प्राध्यापक, स्ना.प.प.संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.