Indigenous Cow Rearing : श्रीराम मोरे प्रगतिशील शेतकरी म्हणून ओळखले जातात. त्यांना आबासाहेब मोरे या नावाने सर्वत्र ओळखले जाते. चार पिढ्यांपासून मोरे कुटुंबीयांनी गोसंगोपन व संवर्धनाचे व्रत जपले आहे. आबासाहेब हाच वारसा पुढे चालवीत आहेत. पूर्वी कुटुंबाकडे डांगी, गीर व कपिला अशा तीन जातीचे देशी गोवंश होते. मात्र सुमारे १६ वर्षांपूर्वी आबासाहेबांनी ही जबाबदारी आपल्याकडे घेतली..
त्यानंतर शास्त्रीय पद्धतीने गोसंगोपनाचा अभ्यास सुरू केला. पथमेडा (राजस्थान), नागपूर, गुजरातेतील आदर्श गोशाळांना भेटी दिल्या. आज्जी शकुंतलाताई तसेच वडील गुरुमाऊली अण्णासाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गोशाळेचा विकास करण्याची प्रेरणा त्यांना मिळाली.आबासाहेब दिंडोरी येथील ‘श्री. स्वामी समर्थ कृषी विज्ञान व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट चे विश्वस्त देखील आहेत.
२५ जातीच्या गायींचे संगोपन
टप्प्याटप्प्याने गुंतवणूक व विस्तार करीत उभारलेल्या आपल्या ‘गोकूळ गोनिवासा’त आजमितीस जातिवंत व शुध्द वंशाच्या सुमारे २५ जातींच्या गायी आहेत, लहान-मोठ्या मिळून एकूण संख्या ८० पर्यंत आहे. यात गीर, सहिवाल, कांकरेज, थारपारकर, गवळाऊ, राठी, वेचुर, खिलार, डांगी, कपिला, देवणी, ओंगल आदी जातींचा समावेश आहे. यापैकी गीर, राठी, खिल्लार यांचे नंदी आहेत.
आदर्श, आखीव रेखीव अशी गोशाळेची रचना केली आहे. तणावमुक्त संगोपनासाठी मुक्त गोठा पद्धतीचा अवलंब केला आहे. दुभत्या, गाभण गायी, वासरे अशी प्रत्येक अवस्थेनुसार स्वतंत्र व्यवस्था आहे. स्वच्छता व निर्जंतुकीकरणाकडे विशेष लक्ष दिले जाते.
त्यादृष्टीनेही आजारी गायींनाही स्वतंत्र शेडमध्ये ठेवले जाते. सूर्यप्रकाश थेट गाडीपर्यंत पोचावा अशी व्यवस्था केली आहे. पाण्यासाठी स्वयंचलित यंत्रणा आहे. गाईसाठी आनंदी, प्रसन्न वातावरण तयार करण्यासाठी दररोज बासरी वादनाचे संगीत लावण्यात येते.
आरोग्यावर दिला विशेष भर
आर्युवेदिक पद्धतीनेच गायींचे आरोग्य जपणे व इलाज करण्यावर भर आहे. दृष्टीने सुमारे २४० वनौषधींची लागवड केली आहे. आवळा, हिरडा, बेहडा, शतावरी, सुंठ, हळद, सैंधव मीठ, खनिज द्रव्ये एकत्र करून व एकसारखे दळून त्यांचा आहारात समावेश केला जातो. त्यामुळे गाईंचे आजारी पडण्याचे प्रमाण कमी होऊन आरोग्य सुधारले आहे. खाद्य व्यवस्थापनात दोघा व्यक्तींची मदत मिळाली आहे. कृत्रिम रेतन संकलनासह उच्च गुणसूत्रे व अधिक दूध उत्पादनक्षम देशी गोवंश निर्मिती उद्देशाने शास्त्रीय पद्धतीने पैदास कार्यक्रम राबवण्यात येतो.
गोमय उत्पादनांचा विकास
दररोज ८० ते १०० लिटर दुधाचे उत्पादन होते. घरगुती पातळीवर त्याचा वापर करण्यासह दिंडोरी शहरात या स्वच्छ व निर्भेळ दुधाची प्रति लिटर ८५ रुपये दराने विक्री होते. शेण व गोमूत्र यांच्यापासून विविध ५० प्रकारची उत्पादने तयार केली जातात. यात पंचगव्य, गोमय गणेश, सिद्धासन, दिवे, अगरबत्ती, स्टीक धूप, कपधूप, जळाऊ सरपण, गोमय जपमाळ, गोवऱ्या, सात्त्विक रंग, कंपोष्ट खत, शाम्पू, साबण, केशतेल, विविध प्रकारचे बाम, नस्य घृत, उटणे आदी उत्पादनांचा समावेश आहे. त्यातून आर्थिक उत्पन्नाचे स्रोत तयार केले आहेत. गाईंचे शेण भरपूर प्रमाणात उपलब्ध होत असल्याने गोबर गॅस संयंत्र कार्यान्वित केले आहे. शेण,स्लरीचा वापर जमीन सुपीकता वाढीसाठी होऊन घरच्या सेंद्रिय शेतीला चालना दिली आहे.
गो पर्यटन संकल्पना नावारूपास
महाराष्ट्रात ज्याप्रमाणे ग्रामीण भागात कृषी पर्यटनाची संकल्पना उदयास झाली आहे. त्या धर्तीवर आबासाहेबांनी गो पर्यटनाची संकल्पना तयार करून ती प्रत्यक्षात देखील साकारली आहे. दर आठवड्याला सुमारे तीनशेच्या संख्येने गोपालक व पर्यटक येथे भेटी देतात. या ठिकाणी शास्त्रीय माहिती देण्यासाठी विविध फलक लावले आहेत.
गाईंचे मानवी जीवनात असलेले स्थान त्यातून अधोरेखित केले आहे. गोपालकांना प्रशिक्षण देण्यासाठीही आबासाहेबांचा पुढाकार असतो. त्यासाठी आज्जीच्या नावाने मातोश्री शकुंतलाताई कृषीभवन उभारले आहे. कृषी पाराशर, वृक्ष आयुर्वेद असे प्राचीन ग्रंथा येथे आहेत. त्यातील माहितीचा प्रत्यक्ष अवलंब येथे होतो.
अनेक वर्षांपासून आबासाहेब ॲग्रोवनचे नियमित वाचक असून या दैनिकाचे असंख्य अभ्यासपूर्ण लेख त्यांनी संग्रही ठेवले आहेत. त्यांची ३० ते ४० एकर शेती असून मुख्यतः चारा पिके असून अन्य हंगामी पिके व फळबाग पिके आहेत. सेंद्रिय पद्धतीनेच त्यांचे उत्पादन घेतले जाते. गोसेवेची आवड व व्यावसायिक दृष्टिकोन जपण्याबरोबर मूल्यवर्धित उत्पादने- विक्रीचे मॉडेल उभारण्यात आबासाहेब यशस्वी झाले आहेत. बहुवीध पिके, पूरक व्यवसाय, पर्यावरण संवर्धन, आरोग्य व अर्थकारण यांची सांगड घालून शेतीचे एकात्मिक मॉडेल त्यांनी उभे केले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.