डॉ. सुधाकर आवंडकर
कोंबड्यांना संक्रमक कोराइजा आजार एव्हीबॅक्टेरिअम पैरागेलीनारम जिवाणूमुळे होतो. संक्रमक कोराइजा जगभर सर्वत्र दिसून येतो. आजार सर्व वयाच्या कोंबड्यांमध्ये दिसून येतो. मात्र वयस्क कोंबड्या जास्त प्रमाणात प्रभावित होतात. या आजारात कोंबड्यांची श्वसन संस्था बाधित होते. आजाराचा उष्मायान काळ एक ते तीन दिवसांचा असतो.
बाधित कोंबड्या जिवाणू संक्रमणानंतर एक आठवड्यानंतर लक्षणे दाखविण्यास सुरुवात करतात. आजारामुळे बाधित कोंबड्यांचे वजन कमी होते. अंडी देण्याची क्षमता १० ते ४० टक्के कमी होते. बाधित कोंबड्यांच्या गटात मृत्युदर २० टक्क्यांपर्यंत पोहोचतो. हिमोफिलस पैरागैलीनारम जिवाणू कोंबड्यांच्या शरीराबाहेर जास्त काळ जिवंत राहू शकत नाही. या जिवाणूचे तीन उपप्रकार आहेत. ए आणि बी हे उपप्रकार भारतात दिसून येतात.
प्रसार
बाधित आणि आजारातून बऱ्या झालेल्या कोंबड्यांपासून आजाराचा प्रसार होतो. या कोंबड्या आजाराचे वाहक म्हणून कार्य करतात. वाहक कोंबड्यांच्या संपर्कामध्ये आल्यामुळे आजार पसरतो.
विष्ठेत जिवाणू उत्सर्जित होतात.
दूषित खाद्य आणि पाण्यातून आजाराचा प्रसार होतो.
जिवाणू उत्सर्जनामुळे शेडमधील वातावरण दूषित होते. जिवाणू वातावरणातील आर्द्रतेत जिवंत राहतात. श्वसनावाटे त्यांचे संक्रमण शरीरात होते.
जास्त वय आणि वयस्क कोंबड्यांमध्ये आजाराची तीव्रता अधिक आढळून येते.
दूषित पिशव्या, चपला, कपडे आणि नित्य वापराच्या उपकरणांद्वारे आजाराचा प्रसार होतो.
आजाराचा प्रसार अंड्यातून होत नाही.
आजाराची लागण थंड आणि दमट वातावरणात जास्त प्रमाणात दिसून येते.
पाणथळ जागी येणाऱ्या पक्ष्यांमध्ये सुद्धा आजाराचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते.
लक्षणे
जिवाणू संसर्ग झाल्यानंतर आजाराचा उद्भावन कालावधी एक आठवड्यापर्यंत असू शकतो. बाधित कोंबड्या तीन ते चार महिने लक्षणे दाखवितात.
लक्षणे आजाराची तीव्रता आणि इतर आजारांचा प्रादुर्भाव यावर अवलंबून असतात.
आजार अतिशय वेगाने आणि कमी वेळेत पसरतो.
प्रभावित कोंबड्यांच्या चेहऱ्यावर सूज येते. डोळे आणि पापण्या सुजतात.
डोळ्यांच्या पापण्या एकमेकांना चिकटतात. डोळ्यांत पूमिश्रित स्राव साचते.
कोंबड्यांना श्वासोच्छ्वास करण्यास त्रास होतो. शिंका येतात.
श्वास घेताना कोंबड्या विशिष्ट आवाज करतात.
एका किंवा दोन्ही डोळे आणि नाकातून पाण्यासारखे दुर्गंधीयुक्त स्राव गळतो.
कोंबड्यांमध्ये मरतुक होते. अंडी देण्याची क्षमता कमी होते. वजन कमी होते.
पुल्लेटमध्ये अंडी देण्यास सुरुवात करण्याचा कालावधी वाढतो. बाधित कोंबड्यांचे खाद्य खाण्याचे आणि हालचाल करण्याचे प्रमाण कमी होते.
नैराश्य, क्षुधाभाव यासारखी लक्षणे दिसून येतात.
क्वचित हगवण दिसून येऊ शकते. श्वसन नलिका आणि फुफ्फुसात सूज येते. श्वसन नलिकेत शेंबूड साचून राहतो.
वायुकोश बाधित होतो. तसेच तुऱ्यावर सूज येते.
निदान
लक्षणे आणि व्याधीकीय परिवर्तानावरून आजार ओळखता येतो. निदानासाठी मृत्यू झालेले कोंबड्यांचे पशू वैद्यकाद्वारे शव विच्छेदन करावे.
प्रयोगशाळेत जिवाणू विलगीकरण आणि ओळख करून आजाराचे निदान करता येते.
जिवाणू विलगीकरण आणि ओळख करण्यासाठी श्वसन नलिका आणि फुफ्फुसाचा तुकडा इतर जिवाणूंचा संसर्ग होऊ न देता निर्जंतुक पात्रात गोळा करावा. नमुने बर्फावर ठेवून कमीत कमी वेळात प्रयोगशाळेत पाठवावेत.
प्रतिबंध आणि उपचार
उपचार करण्यासाठी अनेक प्रभावी प्रतिजैविके उपलब्ध आहेत. मात्र उपचार करताना पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा. प्रतिजैविके देण्याआधी संवेदनशीलता चाचणी करावी.
आजारी कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांपासून अलिप्त ठेवावे. आजारातून बऱ्या झालेल्या कोंबड्यांना निरोगी कोंबड्यांमध्ये मिसळू नयेत.
मृत कोंबड्या जाळून किंवा खोल पुरून टाकाव्यात.
प्रकोप झालेल्या शेडमधून सर्व कोंबड्यांना काढून टाकावे. उपकरणे आणि शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
शेडमध्ये जैवसुरक्षेचा अवलंब करावा. व्यवस्थापन चांगले ठेवावे.
कोंबड्या ठेवण्यापूर्वी शेडचे निर्जंतुकीकरण करून घ्यावे.
शेडमध्ये खाद्य आणि पाण्याची साठवणूक करू नये. कोंबड्यांची गर्दी होऊ देऊ नये.
शेडमध्ये जात असताना पाय निर्जंतुक द्रावणात बुडवून घ्यावेत. निर्जंतुक द्रावण दर आठवड्याला बदलावे.
वयाच्या आठव्या आठवड्यात पहिले आणि बाराव्या आठवड्यात दुसरे लसीकरण करावे. लशीमध्ये जिवाणूच्या ए आणि बी उपप्रकारांचा समावेश असावा.
लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी करावे. लस कातडीखाली टोचावी लागते. कोंबड्यांना ताण येणार नाही याची दक्षता घ्यावी.
लशीचे तापमान योग्य राखावे, बर्फाचा वापर करावा. लशीसोबत सेलेनिअम आणि जीवनसत्त्वे द्यावीत.
ऑल इन ऑल आउट पद्धतीचा वापर करावा.
डॉ. सुधाकर आवंडकर, ९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग, स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.