Salmonella Gelinerum Bacteria : फाउल टायफॉईड हा कोंबड्या, बदक, गिनी फाऊल, कबुतर, मोर आणि टर्की यांच्यातील जीवाणूजन्य आजार आहे. परंतु याचा जास्त प्रादुर्भाव कोंबड्यांमध्ये वयाच्या तीन ते सहा आठवड्यांत दिसून येतो. आजार नवजात पिल्लांमध्ये सुद्धा दिसून येतो. मृत्यूदर लैंगिक परिपक्वता येण्यापर्यंत सुरु राहतो. मृत्यूदर ५० टक्क्यांपर्यंत पोहचू शकतो.
कारणे :
साल्मोनेल्ला गेलीनेरम या जीवाणूच्या संसर्गामुळे कोंबड्या आणि त्यांच्या पिल्लांमध्ये हा आजार होतो.
जिवाणू शरीराबाहेर तीन ते सहा महिन्यांपर्यंत जिवंत राहू शकतात.
दूषित अंडी तसेच दूषित वातावरणातून आजाराचा प्रसार होतो.
प्रसार :
बाधित कोंबड्यांच्या अंडाशयामधून उत्पन्न होणाऱ्या अंड्यांमध्ये जिवाणू संक्रमित होतात.
आजार अंड्यांद्वारे कोंबड्यांच्या एका पिढी पासून दुसऱ्या पिढीमध्ये पसरतो.
बाधित पिल्ले आजाराचे स्रोत बनतात.
हॅचेरीमध्ये अंडी उबवणुकीदरम्यान बाधित पिल्ले किंवा दूषित उबवणूक यंत्राद्वारे पसरतो.
ज्या अंड्यांमध्ये जिवाणू संक्रमित होते, त्यांचा उबवणुकीचा दर कमी होतो.
आजाराने बाधित कोंबड्या आणि बऱ्या झालेल्या कोंबड्या जिवाणू संक्रमणाचा स्रोत ठरतात.
बाधित पिल्लांच्या मल-मूत्रातून आजार पसरतो.
शेडमधील कामगारांचे पायताण, कपडे इत्यादिंमार्फत आजाराचा प्रसार होतो.
जिवाणू दूषित उपकरणे, गादी, खाद्य, पाणी आणि अस्वच्छ शेड आजाराच्या प्रसारास कारणीभूत ठरतात.
लक्षणे :
बाधित पिल्ले निस्तेज आणि सुस्त दिसतात. त्यांचे खाणे-पिणे कमी होते.
पिल्लांमध्ये हगवण लागते. विष्ठा पाण्यासारखी पिवळ्या रंगाची आणि चिकट होते. गुदद्वाराच्या आजूबाजूला पंखांवर विष्ठा चिकटलेली दिसते.
प्रभावित कोंबड्यांना ॲनिमिया होतो.अंडी उत्पादन कमी होते.
कोंबड्यांचे वजन कमी होते. पंखे विसकटतात. पंखांची वाढ योग्यरीत्या होत नाही.
तुरे आणि लोंब पिवळसर पडतात आणि सुकतात.
कोंबड्यांना जास्त तहान लागते.
आजाराने ग्रासित पिल्ले एका ठिकाणी गोळा होतात. फिरणे बंद करतात.
बाधित पिल्ले वेगाने श्वास घेतात. पिल्लांची वाढ खुंटते.
आतडे, मूत्रपिंडे आणि प्लीहेवर सूज येते.
यकृताचा रंग तांब्यासारखा होतो. त्यावर सूज येते. लहान आकाराचे क्षय चट्टे दिसून येतात.
फुफ्फुसावर भुऱ्या रंगाचे चट्टे दिसतात.
मृत कोंबडीमध्ये कावीळ दिसून येते.
निदान :
आजाराचे निदान लक्षणाद्वारे करता येते नाही. प्रयोगशाळेत जिवाणू विलगीकरण करून या आजाराची पुष्टी करता येते.
कोंबड्याचे रक्तजल गुठळीकरण परीक्षण करून निदान करता येते.
उपचार :
आजाराची लक्षणे दाखविणाऱ्या गटातील पिल्लांना खाद्यातून योग्य प्रतिजैविक द्यावे.
प्रतिजैविकाचा प्रकार, मात्रा आणि मात्रांचा कालावधी याबाबत पशुवैद्यकाचा सल्ला घ्यावा.
डॉ. सुधाकर आवंडकर,९५०३३९७९२९
(पशुवैद्यकीय सूक्ष्मजीवशास्त्र विभाग,स्नातकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.