Animal Care : ओळख आजारी जनावरांची

Identification of Animal Disease : जनावरांच्या सहवासात वावरणाऱ्या पशुपालकास आजारी जनावराची लक्षणे ओळखता येणे आवश्यक असते. यामुळे वेळीच पशुवैद्यकांची मदत घेता येऊन जनावरांतील मृत्यू टाळता येतात.
Animal
AnimalAgrowon

डॉ. सिद्दीकी एम. एफ. एम. एफ, डॉ. शेख एस.आर.

Disease Symptoms in Animal : आजार ओळखण्याची आणि नियंत्रणाची पहिली पायरी म्हणजे जनावर किंवा जनावरांचा समूह आजारी असताना ओळखणे. एखाद्या जनावरांच्या गटाच्या इतिहासातील माहिती संकलित करून, शारीरिक तपासणी करून आणि विशेष चाचणी (आवश्यक असल्यास) करून पशुवैद्य किंवा सरकारी निरीक्षक सामान्यत: एखाद्या स्थितीचे किंवा आजाराचे कारण ठरवू शकतात.

जनावरांच्या सहवासात वावरणाऱ्या पशुपालकास आजारी जनावराची लक्षणे ओळखता येणे आवश्यक असते. यामुळे वेळीच पशुवैद्यकांची मदत घेता येऊन जनावरांतील मृत्यू टाळता येतात.

जनावराची लक्षणे

जनावर नेहमी प्रमाणे खात नाही. हे सहसा पहिले लक्षण आहे. चारा खाताना किंवा पाणी पिताना चारा-पाणी तोंडावाटे बाहेर येते. रवंथ करण्याची क्रिया मंदावते किंवा बंद होते. कित्येकदा पोटातील चारा मिश्रित पाणी नाकावाटे बाहेर येते.

टाळी वाजवून अगर हाक मारून अशा जनावराचे लक्ष वेधले असता कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त करीत नाही, अंगास हात लावला असता कातडी थरथर करीत नाही.

काही वेळा आजारी जनावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करते, जसे दूर पळणे किंवा अंगावर धावून येणे इत्यादी. जनावरांची नजर, कानाच्या हालचालींवरून प्रतिक्रिया अजमावता येतात.

जनावरे अस्वस्थता दर्शविणाऱ्या हालचाली करतात, जसे सतत ऊठ-बस करणे, लाथ उडविणे, शेपटी उंचावून उभे राहणे, भिंत, झाड अगर जमिनीला टकरा मारणे, कोणताही पदार्थ चघळत राहणे इत्यादी.

Animal
Animal Care : जनावरांमध्ये होते कांद्याची विषबाधा

जनावर पाय लांबवून पडून राहते. उठविल्यास उठण्याचा किंवा उभे असल्यास चालण्याचा प्रयत्न करीत नाही. जनावर कर्कश किंवा हळू हंबरत राहते.

एखादा पाय उंचावून किंवा एकाच पायावर भार टाकून, पाठ वाकवून किंवा सतत कुंथत उभे राहते.

पाय ओढत, लंगडत, अडखळत चालते किंवा स्वतःभोवती गोल गोल फिरत राहते.

शरीरावरील केस ताठ होऊन कातडीची चकाकी नाहीशी होते. अंगाला खाज सुटते. जनावर झाड, भिंत अशा वस्तूवर अंग घासत राहते. कित्येकदा कातडीखाली वायू जमा होऊन दाबल्यास चरचर आवाज येतो. कातडीखालील ग्रंथी सुजल्याने त्या स्पष्ट दिसू लागतात.

श्‍वसनाची क्रिया अतिमंद किंवा अतिजलद होते. श्वासोच्छावास करताना पोटाच्या स्नायूंच्या हालचाली वाढतात. तोंड उघडे ठेवून तोंडावाटे श्‍वासोच्छ्वास केला जातो.

शेण अति घट्ट किंवा अति पातळ होते. शेणावाटे आव व रक्त पडते.

आजारी जनावर कळपातून वेगळे होऊन सुस्त उभे राहते. आडोशाला खाली, मान घालून उभे राहते.

डोळ्यांतून पाणी वाहते, डोळे निस्तेज होतात. नाकातून स्राव पडतो. काही आजारांमध्ये जनावरांच्या तोंडातून लाळ किंवा फेस गळत असतो.

नाकावरील ओलसरपणा जातो, त्वचा कोरडी होते.

लघवी बंद होते किंवा थेंबाथेंबाने होत राहते. लघवीचा रंग लालसर, अति पिवळा किंवा काळसर लाल होतो. शरीराचे तापमान पाहण्यासाठी कानाजवळील कातडीला हात लावल्यास कातडी गरम किंवा गार लागते.

Animal
Animal Management : आधुनिक पशू व्यवस्थापन हेच डेन्मार्कचे सूत्र

जनावरांचे व्यवस्थापन

कमी आहार घेणे, ताप, असामान्य स्राव, असामान्य वर्तन अशी लक्षणे दिसताच सतर्क राहावे.

आजाराचा संशय असल्यास तातडीने पशुवैद्यकाकडून उपचार सुरू करावेत.

संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव झाल्यास, आजारी जनावरास ताबडतोब निरोगी जनावरांपासून वेगळे करावे. नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात.

आजारी जनावराला कळपातून वेगळे करावे. शास्त्रीयदृष्ट्या आजारी जनावरांची व्यवस्था इतर जनावरांच्या गोठ्यापासून किमान २०० मीटर लांब करावी.

स्वतंत्र शेड उपलब्ध नसल्यास शेडच्या एका टोकाला जनावरांना शक्य तितक्या निरोगी जनावरांच्यापासून दूर बांधावे.

आजारी जनावरांसाठी मजूर आणि औषधोपचार साहित्य, पाणी, खाद्य भांडी वेगळी ठेवावीत.

प्रादुर्भाव झालेल्या भागातून येणारा चारा, पाणी, मजूर, वाहन, प्रवासी यांना प्रतिबंध घालावा.

आरोग्याचे विकार कमी करण्यासाठी स्वच्छ खाद्य आणि पाणी द्यावे.

नवीन खरेदी केलेली जनावरे आणि प्रदर्शनातून परत आलेली जनावरे क्वारंटाइन शेडमध्ये ठेवावीत.

नवीन खरेदी केलेले जनावर तीन दिवसांपर्यंत मुख्य कळपापासून दूर ठेवावे. त्याची व्यवस्था शक्यतो दूर अंतरावरच्या गोठ्यात करावी. त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवावे.

जनावराच्या रोग निदान चाचणी परिक्षा करून योग्य औषधोपचार करावेत. नियमित जंतनिर्मूलन करावे. मेलेले जनावर, प्रसूतीनंतर पडलेली वार जमिनीमध्ये खोल पुरून टाकावी.

शिफारस केलेल्या लसीचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळावे.

विलगीकरणात ठेवलेले जनावर पूर्णपणे बरे झाल्यानंतर निरोगी कळपात परत आणावे.

डॉ. शेख एस. आर., ८९८३१९५३०५

(पीएचडी. विद्यार्थी, पशू औषधवैद्यक शास्त्र विभाग, पशुवैद्यक व पशुविज्ञान महाविद्यालय, परभणी)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com