

डॉ. परीक्षित कातखेडे,डॉ. सुधीर जिरापुरे
Summer Livestock Issues : उष्माघात झाल्याने जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक सहनक्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते. जनावर एका जागी उभे राहते, बैचेन होते, खाली बसते. ही लक्षणे दिसतात तातडीने उपचार करावेत. तसेच गोठ्यामध्ये प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात.
उन्हाळ्यामध्ये वाढत्या तापमानाचा परिणाम जनावरांच्या आरोग्यावर दिसत आहे. जनावरांच्या शरीराद्वारे वातावरणातील ही जास्त उष्णता शोषल्यामुळे किंवा शरीरातील उष्णता उत्सर्जित करण्याच्या प्रक्रियेमध्ये बाधा निर्माण झाल्यास अथवा शरीरामध्ये अतिरिक्त उष्णता निर्माण झाल्यास त्यांच्या शरीरावर या वाढलेल्या तापमानामुळे ताण येतो. त्यांचे शारीरिक तापमान (१०३ ते ११० अंश फॅरानाईट) वाढते. सध्या राज्यातील विविध भागात जनावरांच्यामध्ये उष्माघात दिसत आहे.
जनावरांची तापमान नियंत्रण करण्याची शारीरिक सहनक्षमता कमी पडल्यास शारीरिक तापमानात वाढ होते. जनावर एका जागी उभे राहते, बैचेन होते, खाली बसते.
उन्हामधील अतिरिक्त काम, पिण्याचे पाणी वेळेवर न मिळाल्याने उष्माघाताची लक्षणे दिसतात.
जनावरांना वेळेवर खुराक न देता त्यांच्याकडून उपाशीपोटी कामे करून घेतल्याने जनावरे थकतात.
गोठ्यामध्ये खेळत्या हवेचा अभाव, कोंदटपणामुळे जनावरे आजारी पडतात.
गाई, म्हशींना भर उन्हात रानात चरायला नेल्याने ताण येतो.
भर उन्हातून आलेल्या जनावरांवर लगेच थंड पाणी ओतल्याने परिणाम होतो.
लक्षणे
वाढलेले शारीरिक तापमान (१०३ -११० डिग्री फॅरानाईट ) हे उष्माघाताचे प्रथम लक्षण आहे.
हृदयाचे ठोके वाढतात, श्वसनाचा वेग वाढतो, धापा टाकते, तोंडावाटे श्वास घेतात.
त्वचा कोरडी व गरम पडते. जनावरे खुराक, चारा खाणे कमी अथवा बंद करतात.
सुरुवातीला अतिरिक्त घाम व तोंडातून सतत लाळ गळते.
जनावरास तहान लागते, जनावर हे पाण्याच्या स्त्रोताकडे जाते, पाण्यामध्ये बसण्याचा किंवा पाणी अंगावर घेण्याचा प्रयत्न करते.
शारीरिक तापमानात (१०७ डिग्री फॅरानाईट)वाढ होते. जनावर धाप टाकते. चालताना कोसळून खाली पडते.
घाम गेल्यामुळे व शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे शरीरातील पाणी, क्षार यांचे असंतुलन होऊन अशक्तपणा येतो.
सोडियमची कमतरता झाल्यास जनावरांमध्ये पाणी पिण्याची इच्छा कमी होते, शरीरातील पाणी कमी होते.
तीव्र उन्हाच्या चटक्यांमुळे पोटदुखीची लक्षणे दिसतात. जनावर उठबस करते, पाय झाडते, थेंब थेंब लघवी करणे, घट्ट शेण टाकते, ही दिसून येतात.
गर्भावस्थेत असणाऱ्या गाई, म्हशींमध्ये गर्भपाताची शक्यता असतो.
प्रतिबंधात्मक उपाय
छताच्या पत्र्यांना वरच्या बाजूस पांढरा तर खालच्या बाजूस काळा रंग द्यावा. यामुळे गोठ्यातील तापमान कमी होण्यास मदत होते.
छताच्या पत्र्यांवर शेतातील तुराट्या, पऱ्हाट्या, कडबा किंवा पालापाचोळा अंथरल्यास गोठ्यात तापमान कमी होते.
जनावरांच्या शरीरावर दिवसातून २ ते ३ वेळ थंड पाणी फवारावे.
शक्य असल्यास फॉगर यंत्रणेची मदत घ्यावी.
गोठ्यांमध्ये हवा खेळती राहावी यासाठी पंखा, कूलर यांची सोय करावी.
दुपारच्यावेळी वातावरणातील उष्णतेच्या झळा लागू नये म्हणून गोठ्यामध्ये पाण्याने ओले केलेले गोणपाटाची पडदे लावावेत. यामुळे गोठ्यातील वातावरण थंड राहील.
माजावर असलेल्या गाई, म्हशींना सकाळी किंवा सायंकाळी रेतन करावे.
दूध देणाऱ्या जनावरास दोन्ही वेळी दूध काढण्यापूर्वी थंड पाण्याने धुतल्यास शारीरिक ताण हा कमी होतो, दूध उत्पादनात वाढ होते.
आहारात नियमित ३० ते ५० ग्रॅम मिठाचे खडे किंवा खनिज क्षार मिश्रण द्यावे. जेणेकरून उन्हाळ्यात शरीराला आवश्यक क्षार उपलब्ध होतील.
उपचार
जनावरांना थंड हवेच्या ठिकाणी, सावलीत उभे करावे.
गोठ्यामध्ये थंड हवा खेळती असावी. शक्य असेल तर पंखा, कूलरची व्यवस्था करावी.
जनावरांना पिण्यासाठी थंडगार व स्वच्छ पाणी मुबलक प्रमाणात द्यावे.
पाठीच्या कण्यावरील बाजूस आणि अंगावर थंड पाणी ओतावे.
जनावर खुराक घेत नसल्यास त्यांना काही प्रमाणात गूळ चाटायला द्यावा.
उष्माघातावर वेळीच उपचार न केल्यास जनावर दगावण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपल्या पशुवैद्यकास त्वरित संपर्क करावा.
- डॉ. परीक्षित कातखेडे, ९३७३२१९३०१
( पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी-१, तिवसा जि.अमरावती )
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.