Animal Health : शेणाच्या मूल्यमापनाद्वारे आरोग्य पडताळणी

Cow Dung Evaluation : गोठ्यामध्ये वावरताना गाई-म्हशींच्या शेणाचे नियमितपणे निरीक्षण करावे. या निरीक्षणानुसार गाई, म्हशींचे आहाराचे सेवन, पचनक्रिया, आरोग्य इत्यादी बाबींची प्राथमिक पडताळणी करता येते. आवश्यकतेनुसार पशुतज्ज्ञांची मदत घेऊन जनावरांच्या आरोग्य व्यवस्थापनाबाबत योग्य नियोजन करता येते.
Animal Care
Animal CareAgrowon
Published on
Updated on

डॉ. संजय भालेराव, डॉ. आनंद कापसे, डॉ. सुयोग क्षीरसागर

Animal Care : गाई-म्हशींच्या व्यवस्थापनामध्ये शेणाच्या मूल्यमापनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. दुभत्या जनावरांच्या शेणाचे मूल्यमापन केल्यामुळे त्यांचे सर्वसाधारण आरोग्य, रोमान्थिकेतील किण्वन आणि पचनक्रियेबद्दल माहिती मिळू शकते. एक जनावर दररोज ४० ते ५० किलो शेण उत्सर्जित करते. खाद्य आणि पाणी सेवन तसेच पचनमार्गात काही व्याधींमुळे व्यत्यय आल्याने उत्सर्जित शेणाचे प्रमाण वाढू किंवा कमी होऊ शकते. शेणाच्या मूल्यमापनावरून सेवन केलेल्या खाद्याचे पचन, किण्वन आणि आतड्याचे स्वास्थ्य यासंबंधी महत्त्वाची माहिती मिळते. साधारणपणे दुभत्या गाईने खाल्लेल्या बहुतांश खाद्याचे रोमान्थिकेत पचन होते. आणि बहुतेक पोषक तत्त्वांचे शोषण रोमान्थिका किंवा लहान आतड्यांमध्ये होते. जेव्हा रोमान्थिकेत खाद्य योग्यरीत्या अंबवले जात नाही, त्या वेळी काही न पचलेले पोषक घटक लहान आतड्यात पोहोचू शकतात. ही पोषकद्रव्ये पचली आणि शोषली जाऊ शकतात. परंतु खाद्य प्रमाण खूप जास्त असेल किंवा पचन प्रक्रियेचा दर वेगवान असेल, तर पोषकद्रव्यांचे लहान आतड्यांत पचन आणि शोषण न होता ती तशीच बाहेर शेणाद्वारे पडू शकतात. पोषक द्रव्यांचे पचन आणि शोषण होण्यासाठी शेवटचे स्थान म्हणजे मोठे आतडे. तथापि, दुभत्या जनावरांमध्ये असे पचन खूप कमी प्रमाणात होते. जेव्हा गायींना तंतुमय पदार्थ कमी असलेले किंवा शर्करा, ग्लुकोजयुक्त सहज पचनीय ऊर्जायुक्त आहार दिला जातो. त्या वेळी मोठ्या आतड्यांमध्ये किण्वन जास्त प्रमाणात होऊ शकते. याचा गाईचे आरोग्य आणि उत्पादनावर नकारात्मक परिणाम होतो.

अन्नाचे न पचलेले किंवा शोषलेले कोणतेही कण किंवा पोषकतत्त्व हे शेण आणि मूत्राद्वारे उत्सर्जित होतात. उत्सर्जित केलेल्या शेणाच्या मूल्यमापनाद्वारे दुभत्या जनावराच्या पोषणाबाबत सर्व प्रश्‍नांची अचूक उत्तरे मिळू शकत नाहीत. परंतु पशुपोषण तज्ज्ञ किंवा पशुतज्ज्ञांसाठी हे मूल्यमापन पशू आरोग्याशी संबंधित समस्या जाणून घेण्यासाठी एक उपयुक्त निदान साधन आहे. या उपलब्ध माहितीवरून तज्ज्ञांना पचन प्रक्रियेत नेमका काय बिघाड झाला याबाबत काही माहिती मिळते. जनावराच्या शेणाचा रंग, सुसंगतता किंवा पोषक घटकांवर दिलेल्या आहाराचे विशिष्ट प्रभाव बाबतच्या माहितीवरून शेणाच्या मूल्यमापनामध्ये जनावराचे पोषण आणि आरोग्य पडताळणीबाबत काही ज्ञात तथ्ये संकलित केली जातात.

Animal Care
Animal Health : जनावरांची आरोग्य तपासणी महत्त्वाची...

शेणाचे मूल्यमापन ः
१) रंग ः

- शेणाचा रंग मुख्यत: खाद्य प्रकार, पित्त प्रमाण आणि पचनसंस्थेतील पचन झालेल्या अन्न प्रवाह वेग या तीन गोष्टींमुळे प्रभावित होतो. सामान्यत: गाई-म्हशी ताजा चारा खातात, त्या वेळी शेण गडद हिरव्या रंगाचे असते.
- गाई-म्हशींच्या आहारात वाळलेले गवत अधिक दिल्यास शेण गडद तपकिरी ते पिवळसर हिरव्या रंगाचे असते.
- आहारात मोठ्या प्रमाणात धान्यांचा समावेश केल्यास किंवा टोटल मिक्स राशन दिल्यास, सहसा शेणाचा रंग पिवळसर असतो.
- हा रंग धान्य आणि चारा यांच्या संमिश्रणातून तयार होतो. धान्याचे प्रमाण आणि प्रक्रियेनुसार रंग बदलतो.
- जनावरास अतिसाराचा त्रास असल्यास शेण राखाडी रंगाचे होऊ शकते.
- वैद्यकीय उपचार सुरू असलेल्या आजारी जनावराचे शेण असामान्य रंगाचे असते. गडद किंवा रक्तरंजित शेण जुलाब, मायकोटॉक्सिन किंवा
कोक्सीडिओसिसमुळे पचन संस्थेतील रक्तस्राव दर्शवते.
- जनावरांना साल्मोनेला सारख्या जिवाणूंच्या संसर्गामुळे पातळ हगवण होते. त्या वेळी शेणाचा रंग हिरवा किंवा पिवळसर होतो.

Animal Care
Soil Health Card : शेतजमिनीची आरोग्य पत्रिका कशी काढायची?

२) सुसंगतता ः
- गाई-म्हशींच्या शेणाची सुसंगतता मुख्यत्वे पाण्याच्या प्रमाणावर अवलंबून असते. शेणातील पाण्याचे प्रमाण खाद्यातील आर्द्रता आणि पचनसंस्थेत खाद्य किती वेळ राहते यावर अवलंबून असते. सामान्य शेणामध्ये मध्यम लापशीसारखी सुसंगतता असते. साधारणपणे १ ते २ इंच उंच घुमटाच्या आकाराचा शेणाचा ढीग बनतो.
- विषबाधा, जंतुसंसर्ग, परजीवी किंवा कर्बोदकांचे मोठ्या आतड्यातील अति किण्वन आणि अ‍ॅसिडचे वाढलेले प्रमाण यामुळे अतिसार किंवा जुलाब होऊ शकतात.
- जास्त प्रमाणात प्रथिने सेवन केल्याने किंवा रोमान्थिकेत विघटन होणाऱ्या प्रथिनांच्या उच्च पातळीमुळे शेण थोडे पातळ होऊ शकते. मूत्रमार्गे जास्तीचा नायट्रोजन उत्सर्जित करण्याच्या प्रयत्नात पाण्याचा वापर वाढल्यामुळे हे होऊ शकते.
- उष्णतेच्या तणावाच्या काळात शेण पातळ होऊ शकते. पाणी किंवा प्रथिनांचे सेवन प्रतिबंधित केल्याने अनेकदा शेण घट्ट होते. पाण्याचे सेवन खूप कमी झाल्यास शेणाचे गोळे तयार होतात.

३) खाद्यघटक सामग्री ः
- शेणाच्या निरीक्षणाद्वारे खाद्याचे एकसमान पचन आणि पोषक तत्त्वांचे शरीरात योग्य शोषण होते का हे ओळखते येते. न पचलेले धान्य किंवा चाऱ्याचे लांब कण (०.५ इंचापेक्षा जास्त तुकडे) दिसले तर ते रोमन्थिकेतील किण्वन प्रक्रियेतील बिघाड आणि बरेचदा मोठ्या आतड्यातील किण्वन दर्शवते.
- गाई, म्हशींमध्ये मोठ्या आतड्यातील किण्वनपेक्षा रोमन्थिकेतील किण्वन महत्त्वाचे आहे. कारण पचन आणि किण्वन मोठ्या आतड्यांत होत असले, तरी गाई-म्हैशींला याद्वारे पोषणमूल्य कमी प्रमाणात मिळते.
- शेणातील चाऱ्याचे मोठे कण किंवा न पचलेले धान्य जनावरे व्यवस्थितरीत्या रवंथ करत नाहीत किंवा रोमन्थिकेतील अन्नपचन होण्याचा वेग वाढला असल्याचे दर्शवितात. आहारात तंतुमय पदार्थांचे कमी प्रमाण असल्यास असे घडू शकते. कारण हे पदार्थ रवंथ प्रक्रिया उत्तेजित करण्यात किंवा रोमन्थिकेतील सामू सामान्य राखण्यासाठी आवश्यक असतात. न पचलेल्या धान्याचे कण जास्त प्रमाणात आढळल्यास आहारात जास्त प्रमाणात धान्य योग्य प्रक्रिया न करता घातल्याचे लक्षात येते.

४) न पचलेल्या धान्याचे कण ः
- मोठ्या कणांमधील पोषक घटक रोमान्थिकेतील सूक्ष्मजंतूंना उपलब्ध होत नाहीत. वाळलेल्या शेणाच्या पृष्ठभागावर फिक्कट पांढरा रंग म्हणजे धान्यातील न पचलेला स्टार्च. शेणातील पांढऱ्या रंगाचे प्रमाण आहारातील स्टार्चच्या प्रमाणावर अवलंबून असते.
- शेणात जास्त प्रमाणात श्‍लेष्म असल्यास आतड्याच्या उतींचा जुनाट दाह किंवा दुखापत दर्शवते.

रोमन्थिकेत पचन व्यवस्थित सुरू असल्याचे कसे कळेल?
नियमितपणे गोठ्यामध्ये फिरून शेणाचे अनौपचारिकपणे निरीक्षण करणे महत्त्वाचे आहे. शेणामध्ये ०.५ इंचापेक्षा मोठे खाद्य कण खूप कमी प्रमाणात आढळणे, ओळखण्यायोग्य पचन न झालेले खाद्य (हिरवे गवत, धान्य इ) प्रमाण खूप कमी असणे. शेणाचा रंग, ढिगाची सुसंगतता यामध्ये थोडा फरक असणे सामान्य आहे. दिवसभरातील खाद्याच्या सेवनातील फरकामुळे आणि काही प्रमाणात दैनंदिन पशू व्यवस्थापनामुळे हा फरक होऊ होतो.
गाईंच्या शेणामध्ये मोठ्या प्रमाणात फरक दिसल्यास त्या दिलेला आहार पूर्णपणे खात नसून, ठरावीक खाद्य खात असल्याचे किंवा इतर काही आरोग्य किंवा व्यवस्थापन समस्यांनी ग्रस्त असल्याचे लक्षात येते. शेणामध्ये रक्त, जंत, कृमी आढळल्यास त्यानुसार आरोग्य किंवा व्यवस्थापन विषयक समस्यांचे निवारण त्वरित करावे.
------------
डॉ. संजय भालेराव, ९०९६३२४०४५, ९९२०९४६५४६
(सहायक प्राध्यापक, पशुपोषणशास्त्र विभाग,
क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ, जि. सातारा)


Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com