Animal Health : जनावरांची आरोग्य तपासणी महत्त्वाची...

दूध व्यवसायातील जनावरांमध्ये कृत्रिम रेतनाची योग्य वेळ आणि जनावर गाभण राहण्याचा दर वाढविण्यासाठी जनावरांतील माज ओळखणे गरजेचे असते. जनावरांतील माज ओळखण्याचा प्रत्यक्ष परिणाम हा त्या गोठ्यातील जनावराच्या वेतातील अंतर, दूध उत्पादन आणि महत्त्वपूर्ण आर्थिक उत्पादनावर होतो.
Animal Health
Animal HealthAgrowon
Published on
Updated on

डॉ.व्ही.एम.सरदार, डॉ.पि.व्ही.मेहेरे, व्ही.आर.पाटोदकर

पशुपालकांना जनावरांतील माज (Animal Heat) ओळखणे अतिशय महत्त्वाचे असते. कारण त्यांचे आर्थिक नियोजन त्यावर अवलंबून राहते. गाय किंवा म्हशी वयात आल्यावर प्रत्येक १८ ते २१ दिवसानंतर त्या पुन्हा माजावर येतात. जे जनावर योग्य वेळेवर माजावर येते, ते प्रजननास (Breeding) कार्यक्षम आणि जास्त दूध देणारे असते. जनावराचा माज ओळखण्याचा उद्देश जनावर योग्य किंवा अचूक वेळेवर माजावर येते का हे पाहणे किंवा बरेच दिवसांपासून माजावर येत नाही यावर लक्ष केंद्रित करणे असा आहे.

माज ओळखण्याच्या पद्धती ः

१) जनावराचे निरीक्षण ः

- माज ओळखण्याची ही प्रचलित पद्धत आहे. या पद्धतीत जनावराच्या वर्तणुकीकडे निरीक्षण केले जाते.

- योनीचा भाग सुजणे त्यात रक्तसंचित होऊन त्यातून चिकट पारदर्शक स्त्राव येतो. दुसऱ्या जनावरांना चाटणे.

- म्हशीमध्ये नर जनावरांना स्वीकारणे म्हणजेच तो योग्य माजाचा काळ आहे.

- दुसरे लक्षण म्हणजे दूध कमी होणे, खाण्याचे प्रमाण कमी होणे आणि अस्वस्थ राहणे.

२) गर्भाशयाद्वारे येणाऱ्या स्त्रावाचे परीक्षण ः

- इस्ट्रोजन संप्रेरकाच्या प्रभावामुळे जे जनावर योग्य माज काळामध्ये आहे त्यांच्या विशिष्ट स्त्रावांमध्ये सोडियम क्लोराईड चे स्फटिक आहेत. हे वीर्यातील शुक्राणू गर्भपिशवीकडे नेण्यासाठी उपयुक्त असतात. म्हणूनच या स्त्रावाला अर्बोरिझेशन म्हणतात.

- ही पद्धत म्हशीमध्ये वापरणे लाभदायक असते कारण म्हशी दुसऱ्या माजाची लक्षणे दाखवीत नाहीत.

३) खच्चीकरण केलेल्या वळूचा वापर ः

- आदर्श दुग्ध व्यवसायात गोठ्यातील जनावरांचा माज ओळखण्यासाठी खच्चीकरण केलेल्या वाळूचा वापर केला जातो. हा वळू माजावर असलेल्या जनावरांना ओळखतो. जनावर माजावर असेल ते वळूला अंगावर उडण्यासाठी थांबते म्हणजेच तो योग्य माजाचा काळ आहे असे समजावे.

- म्हशीमध्ये खच्चीकरण केलेल्या वळू हा माज ओळखण्यासाठी अतिशय महत्त्वाचा ठरतो कारण म्हशीमध्ये निरीक्षण आणि वर्तणुकीद्वारे माज ओळखणे कठीण असते.

Animal Health
Animal Care : सदोष चाऱ्यामुळे जनावरांना होणारे आजार

- गाय किंवा म्हैस माजावर येण्याची लक्षणे सकाळी दाखवीत असेल तर सायंकाळी कृत्रिम रेतन करावे. जर माजाची लक्षणे सायंकाळी दाखवीत असेल तर सकाळी कृत्रिम रेतन करावे. यामुळे जनावराचा गाभण राहण्याचा दर वाढतो.

- संशोधनानुसार असे शिफारस केले जाते की खच्चीकरण केलेल्या वळूला दिवसातून दोन वेळा (सकाळी किंवा संध्याकाळी) माजावर असलेली जनावर ओळखू द्यावीत.

१) गाईमधील माजाची लक्षणे ः

- गाय माजावर येण्याचा काळ सर्वसाधारण २१ दिवसांचा असतो. गाय उडण्याची वर्तणूक आणि ओहुलेशन या दोन घटकांमधील काळ सर्वसाधारण २५ ते २७ तासांचा असतो.

- गायीचा माज हा तिच्या विशेष वर्तुणकीवर आधारित असून तिचा परस्पर संबंध रक्तातील इस्ट्रोजन संप्रेरकाची पातळी वाढल्याचे दर्शवितो.

Animal Health
Animal Care : जनावरांतील घातक परजीवी : गोचीड

पहिल्या माजाची लक्षणे ः

- जेव्हा रक्तातील इस्ट्रोजनची पातळी वाढते आणि प्रोजेक्ट संप्रेरकाची पातळी कमी होते तेव्हा ही माजाची लक्षणे आढळतात. सर्वसाधारणपणे माजावर असलेली गाय तिच्या योग्य माजाच्या

काळात म्हणजेच पाच ते दहा वेळा वळूला प्रत्येकी पाच ते सात सेकंदासाठी अंगावर उडू देते.

दुसऱ्या माजाची लक्षणे ः

- ही लक्षणे माजाच्या सुरवातीच्या काळात, माजाच्या काळात किंवा माजाच्या नंतरच्या काळात आढळतात. उत्कृष्ट दूध व्यवसायात गायीच्या माजावर लक्ष केंद्रित करून हे निश्चित केले जाते की गाय दुसरी माजाची लक्षणे दाखविते.

- गाय किंवा म्हशी त्यांच्या पार्श्वभागाकडे लक्ष केंद्रित करून न्याहाळणे गरजेचे असते ते पुढील प्रमाणे.

Animal Health
Animal Health : जनावरांच्या आरोग्यासाठी दूर्वा, आघाडा फायदेशीर

- जेव्हा रक्तातील इस्ट्रोजेन चे प्रमाण वाढलेले असते आणि गाय माजावर येते तेव्हा गर्भाशयाच्या मानेचा भागापासून निघणारा स्त्राव योनी मार्गामध्ये जमा होऊन बाहेर येतो. हा स्त्राव लांब घट्ट चिकट आणि पारदर्शक असतो. बरेच वेळा हा स्त्राव पार्श्वभागावरून बाहेरून दिसत नाही परंतु कृत्रिम रेतन करताना स्त्राव बाहेर पडतो. हा स्त्राव शेपटीला, मांडीवर आणि योनीच्या पार्श्वभागावर पसरलेला आढळतो.

- माजामध्ये गाय सतत हंबरते. परंतु नेहमीच हंबरणे ही लक्षणे माजाचे नसू शकतात, तसेच ९० टक्के गाई या प्रसूती पूर्व पन्नास दिवस आधी आपला माज दाखवितात. यासाठी गायीचे नियमित निरीक्षण करून योग्य माज ओळखणे गरजेचा असते.

म्हशीमधील माजाची लक्षणे ः

- म्हशी ऋतुमानाप्रमाणे आपला माज बदलतात. म्हशी त्यांचा माज सप्टेंबर ते जानेवारी आणि सर्वाधिक ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्ये दाखवितात. सहसा म्हशी रात्री उशिरा अंधारात माजावर येतात आणि त्यांचा वीस ते तीस सेकंदाचा सर्विसचा काळ असतो.

लक्षणे ः

- वारंवार लघवी करणे, हंबरते, अस्वस्थ रहाते, शेपटी उंचावणे.

- गर्भाशयाचे मुख मोकळे होते. बीज कोशावर बिजांड्याची वाढ दिसून येते.

जनावरांचे योग्य व्यवस्थापन ः

१) चांगला पशुपालक, शेतकरी किंवा व्यावसायिक हा आपल्या गोठ्यातील सर्व जनावरांचे दररोज नियमित चांगले निरीक्षण करतो.

२) जनावरांचे दररोज १५ ते २० मिनिटे निरीक्षण करावे. उन्हाळ्यात सूर्योदयाच्या आधी आणि सूर्यास्तानंतर करावे आणि हिवाळ्यात दुपारी निरीक्षण करावे.

३) योग्य माज ओळखणे हे जास्त दूध उत्पादनासोबत जनावराची प्रजोत्पादन क्षमता वाढवू शकतो. योग्य माजामध्ये चांगल्या उत्पादित वळूचे कृत्रिम रेतन करून गोवंश सुधारणा शक्य आहे.

माज न ओळखल्याने होणारे परिणाम ः

१) माज न ओळखल्याने वेतातील अंतर वाढते. जनावरांतील त्यांच्या जीवनातील दूध देण्याचे प्रमाण कमी होणे आणि कमी वासरे जन्मास येणे.

२) वेळेवरचा माज न ओळखल्याने जनावरांतील कन्सेप्शन दर कमी होणे आणि चांगले जनावर गोठ्यातून बाहेर काढावे लागते.

३) माज न ओळखल्याने गाभण जनावरांना कृत्रिम रेतन केल्याने गर्भपात होण्याची शक्यता असते.

संपर्क ः डॉ.व्ही.एम.सरदार, ९९२२५११३४४

(पशुशरीरक्रिया शास्त्र विभाग, क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय, शिरवळ जि. सातारा)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com