Glanders Disease : ग्लँडर आजारावर उपाययोजना

Horse Disease : ग्लँडर हा आजार प्राण्यांचे नाक, फुफ्फुसे आणि त्वचा यांना प्रभावित करतो. घोडे, गाढवे आणि खेचरांना होणारा संसर्गजन्य प्राणघातक आजार आहे. आजार केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून, तो माणसांनाही होऊ शकतो.
Glanders Disease
Glanders Disease Agrowon
Published on
Updated on

Animal Disease Management : सध्या लातूर परिसरात घोड्यांमध्ये ग्लँडर आजाराचा प्रादुर्भाव दिसत आहे. घोडे, गाढवे आणि खेचरे यांसारख्या खुरट्या प्राण्यांना होणारा एक अत्यंत संसर्गजन्य आणि प्राणघातक आजार आहे. हा आजार बर्कहोल्डेरिया मालेई या ग्राम-निगेटिव्ह जिवाणूंमुळे होतो.

हा आजार केवळ प्राण्यांपुरता मर्यादित नसून, तो माणसांनाही होऊ शकतो, म्हणून याला झुनोटिक आजार म्हणतात. भारतात ग्लँडर हा १८९९ पासून नोंदणीकृत आजार आहे. याच्या नियंत्रणासाठी भारत सरकारने कठोर नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे लागू केली आहेत.

प्राण्यांमधील लक्षणे

हा आजार प्राण्यांचे नाक, फुप्फुसे आणि त्वचा यांना प्रभावित करतो. आजार प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये दिसून येतो.

नाकाशी संबंधित प्रकार : नाकातून पिवळसर-हिरव्या रंगाचा किंवा रक्तमिश्रित स्राव येतो, नाकात जखमा किंवा व्रण दिसतो,गळ्याच्या खालील लसिका ग्रंथींना सूज येणे.

फुफ्फुसांचा प्रकार : फुफ्फुसांमध्ये गाठी किंवा फोड तयार होतात. खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे आणि ताप येतो.

त्वचेचा प्रकार : त्वचेवर गाठी, जखमा आणि पू असलेले व्रण दिसतात. विशेषत: पाय आणि ओटीपोटावर लक्षणे दिसतात. आजाराच्या प्रगतीनुसार तीव्र, दीर्घकालीन किंवा सुप्त स्वरूपात लक्षणे दिसतात.

Glanders Disease
Animal Health : दुधाळ जनावरांमधील लंगडण्याची समस्या

माणसांमधील लक्षणे

माणसांमध्ये ग्लँडर रोगाची लक्षणे अस्पष्ट असतात, ज्यामुळे निदान कठीण होते.

नाक, डोळ्यांचा प्रकार : नाकातून स्राव, डोळ्यांतून पाणी येते, नाकाची जळजळ होते.

त्वचेचा प्रकार : त्वचेवर फोड किंवा जखमा होतात. त्यामध्ये दीर्घकाळ पू होतो.

फुप्फुसांचा प्रकार : खोकला, श्वास घेण्यास त्रास, छातीत दुखणे आणि न्यूमोनिया होतो.

प्रसारित स्वरूप : रक्तातून प्रसार होऊन यकृत, प्लीहा आणि फुप्फुसांमध्ये फोड तयार होतात, ज्यामुळे सेप्टिसिमिया आणि उच्च मृत्युदर (उपचाराशिवाय ९५ टक्के) होऊ शकतो.

प्राण्यातील प्रसार

अन्न आणि पाणी : दूषित अन्न किंवा पाण्याद्वारे जिवाणूंचा प्रसार होतो.

थेट संपर्क : बाधित प्राण्याच्या स्राव, लाळ, पू किंवा रक्ताचा संपर्क.

उपकरणे : दूषित उपकरणे, कपडे किंवा पाण्याची भांडी.

मांस : मांसाहारी प्राणी (उदा. कुत्रे, मांजर) बाधित मांस खाल्ल्याने प्रादुर्भाव.

माणसातील प्रसार

संपर्क : बाधित प्राण्याच्या ऊती किंवा स्राव यांच्या संपर्कातून, विशेषत: त्वचेवरील जखमांद्वारे.

हवेद्वारे : बाधित धूळ किंवा कण श्वासाद्वारे शरीरात प्रवेश करू शकतात.

प्रयोगशाळा कर्मचारी : जिवाणू हाताळताना अपघाती संसर्ग होऊ शकतो.

आजाराचे निदान

कॉम्प्लिमेंट फिक्सेशन टेस्ट (CFT):‘ओआयइ’ने मान्यताप्राप्त चाचणी.

एलायझा (ELISA) : प्राथमिक स्क्रीनिंगसाठी, जिवाणू विलगीकरण.

पीसीआर : जिवाणू किंवा त्यांच्या डीएनएची पुष्टी.

नमुना संकलन : शीत साखळी (२ ते ४ अंश सेल्सिअस) मध्ये त्रिस्तरीय पॅकिंगद्वारे प्रयोगशाळांमध्ये पाठवणे.

नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स (हिसार) आणि केंद्रीय लष्करी पशुवैद्यकीय प्रयोगशाळा (मेरठ) येथे आजाराचे अंतिम निदान केले जाते.

Glanders Disease
Animal Health Management : संसर्गजन्य आजारापासून जनावरांचे संरक्षण

नियंत्रण आणि प्रतिबंध

भारत सरकारने ग्लँडर नियंत्रणासाठी राष्ट्रीय कृती योजना (२०१६, सुधारित २०१९) आणि ‘प्राण्यांमधील संक्रामक आणि संसर्गजन्य रोगांचे प्रतिबंध आणि नियंत्रण कायदा, २००९’ लागू केले आहेत. यात खालील उपाययोजना समाविष्ट आहेत.

नियमित तपासणी : दरवर्षी १० ते २० टक्के घोड्यांची रँडम तपासणी.

प्रादुर्भाव क्षेत्राची अधिसूचना : बाधित क्षेत्राच्या २५ किमी परिसरात अश्व जातीतील प्राण्यांची वाहतूक आणि मेळावे बंद करणे

बाधित प्राण्यांना दयामरण : आजाराचे सकारात्मक निदान झालेल्या प्राण्यांना शास्त्रीय पद्धतीने दयामरण देणे आणि परिसराचे निर्जंतुकीकरण.

जैवसुरक्षा उपाय : स्वच्छता, पाणी आणि अन्न व्यवस्थापन, आणि वेगळे खाद्य,पाण्याचे भांडे वापरणे. ५. आंतरराज्यीय वाहतूक : ३० दिवसांपूर्वी ग्लँडर निगेटिव्ह चाचणी प्रमाणपत्र आणि आरोग्य कार्ड बंधनकारक.

नुकसान भरपाई : बाधित प्राण्यांचा नाश केल्यास पशुपालकांना ‘ॲसकॅड’ योजनेअंतर्गत नुकसान भरपाई.

मानवी देखरेख : स्थानिक आरोग्य अधिकाऱ्यांद्वारे बाधित प्राण्यांशी संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची तपासणी.

पशुपालकांनी घ्यावयाची खबरदारी

आजारी प्राण्यांचे विलगीकरण ः ग्लँडरची लक्षणे दाखविणाऱ्या शंका असलेल्या प्राण्यांना त्वरित वेगळे करा. तातडीने नजीकच्या शासकीय पशुवैद्यकांना माहिती द्यावी.

स्वच्छता : गोठा, पाण्याची भांडी आणि खाद्यपात्रे नियमित स्वच्छ करा. १ टक्के सोडियम हायपोक्लोराइट, ७० टक्के इथेनॉल किंवा २ टक्के ग्लुटाराल्डिहाइड यांसारख्या निर्जंतुकांचा वापर करावा. ३. वैयक्तिक संरक्षण: प्राणी हाताळताना हातमोजे, मास्क आणि पीपीई कीट वापरावे. नियमितपणे हात स्वच्छ धुवावेत.

वेगळी हाताळणी : बाधित आणि निरोगी प्राण्यांसाठी वेगळ्या व्यक्ती नेमाव्यात.

मृत जनावरे निपटारा : पशुवैद्यक शासनाने विहित केलेल्या सूचनेनुसार मृत प्राण्यांना खोल खड्ड्यात पुरावे. शवविच्छेदन टाळावे.

जागरूकता : स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्कात राहावे. ग्लँडरच्या लक्षणांबाबत सतर्क राहावे.

माणसांसाठी खबरदारी

संपर्क टाळा : बाधित प्राण्यांच्या स्राव, जखमा किंवा उतींना स्पर्श करू नका.

वैयक्तिक स्वच्छता : हात, कपडे आणि उपकरणे नियमित स्वच्छ करावेत.

जोखीम गट : पशुवैद्यक, अश्व गटातील प्राणी हाताळणारे व्यक्ती आणि प्रयोगशाळा कर्मचारी यांनी विशेष काळजी घ्यावी.

तपासणी : बाधित प्राण्यांशी संपर्क आल्यास त्वरित वैद्यकीय तपासणी करावी.

- डॉ. गणेश निटूरे, ९९७०१२३२२०

(पशुधन विकास अधिकारी, रेणापूर,जि.लातूर)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com